शनिवार, १६ ऑगस्ट, २००८

" भजंन " करावं??

बरेच दिवसांनी आज सुट्टी मिळाली.
शनिवार, रवीवार... कसली सुट्टी ? क्लायंटचं नुकसान होइल ना नाहीतर..

अशा सगळ्यात आजचा दिवस उजाडला..
"सकाळ"ची "संध्याकाळ" कशी झाली, कळलंच नाही... आराम चालू होता...

बाहेर गैलरीत आलो...
थोड्याच वेळापूर्वी बाहेर शांत निवांत आसमंत होतं ...
आणि आता पाहतो तर काय?
"पा - उस असा ~ रुण - झुण ♪ ता~"

आपले संदीप-सलिल गात होते.. एकदम धो धो गात होते...
आपली कोणी सखी नाही, पैन्जणे कोठली स्मरता?

सखी जाऊ द्या.... आज तर रक्षाबंधन! पण इथे नारळी भात कुठे मिळायला??
मी म्हटलं, चला! आपण आपलं " भजंन " करावं??
असंही पाउस आयता आलेला आहेच....

आईन दिलेलं डाळिचं पीठ काढलं... बरोबर होता:- ओवा आणि खाण्याचा सोडा !!!
मग काय?
चिरला कांदा, भिजवलं पीठ...
तापवलं तेल आणि पहिलं भजं केलं...
खावुन पाहिलं!!
कसं होतं ??
"भजं" झालं होतं...

उत्साहात तिखटच घालायचं विसरलो होतो...
"पा - उस असा ~ रुण - झुण ♪ ता~"

खेकडा भजी करायचा पिलान होता, पण या खेकडयाने आधीच का नांगी टाकली आहे??
नंतर कळलं , कारण मी पीठ भिजवताना त्याच्याशी ज़रा जास्तीच कुस्ती केली होती...

दूसऱ्या lot ला जास्ती न छळता, प्रेमाने भिजवलं गेलं...
त्यामुळे दूसरा lot जास्ती त्रास नं देता निघाला....

भांडं ज़रा मोठं घ्यायला हवं होतं....
एका वेळी तीनच भज्या...

पाणी जरा जास्ती झालं होतं..
पीठ वाढवा...

कोरडं झालंय...
कांदा वाढवा...
असं करत, दीड तासाने भजं झालं!

फ़क्त एकदाच चटका बसला..
ते म्हटलं आहे ना?

आधी हाताला चटके, मं गं ...
मं गं मिळतं रे ~ 

”भजं ” ^_^





मंगळवार, ५ ऑगस्ट, २००८

|| संस्कृती ||

प्रत्येक देशाची एक संस्कृती असते..
संस्कृती म्हटलं की त्यात बरेच उप प्रकार येतात..
वेशभूषा संस्कृती!
भाषा संस्कृती!!
खाद्य संस्कृती!!! ( अरे, ही तर आद्य संस्कृती... )

आपल्या भारताची जशी ४ हजार वर्षांपूर्वीची संस्कृती आहे, तशीच इथली, अर्थात
जपानचीही आहे...

पण त्यात घुसणे म्हणजे ते महानगर पालिकेच्या उंदीर मारण्याच्या विभागातल्या शिपायाने अनुयुद्ध टाळण्यावर मत मांडल्यासारखं होईल.... त्यामुले आपण आपलं, जे सध्या दिसतं आहे, त्यावर थोड़ा "प्रकाश पाडो~ का ना~ " तो ओमोत्ता वाके देस ने ..... (असं वाटलं इतकंच...)

सुरुवात करताना आद्य संस्कृती, खाद्य संस्कृती पासून सुरुवात करावी का?

तर ही मागच्या आठवड्यातली गोष्ट आहे... आमच्या प्रोजेक्ट मधला एक जण प्रोजेक्ट वरून मुक्त झाला!
त्याची बाय बाय नोमिकाई होती...

पहिला थोड़ा वेळ प्रोजेक्ट बद्दलच्या फालतू गप्पात गेला....
तेवढ्यात आर्डर आली.... "कोकसान!"

कोणीतरी पुकारा दिला , " जय जपान!!" लगेच जवाब आला, "जय कोकसान!!"
"कान पाय! "
आणि ...पाट...वाहू...लागले...

(साधारण अर्ध्या तासाने...)
"काय सांगू भाऊ?? " तो मित्र म्हणत होता... मागच्या आट्टवड्यात मी एक होटेलात गेल्तो...
तित्तं काय मायती का???
"काय?"
"पण खरं सांगतो भाऊ ..."
"काय?"
" नंतर कळलं बगा... की "उंदीर", बर का.... "उंदीर" ही काय खायची वस्तु नाय... "

जपानी भाषा शिकायला लागल्यावर माझी अणि माझ्या काही मित्रांची "जय जपान" अशी काहीतरी अवस्था झाली होती.. त्यात काही जपानी मित्र-मैत्रिणी भेटले आणि मग काय? पुण्याच्या रस्त्यावरून फिरत आम्ही "किती बैड लक... पुण्यात साधी सुशी मिळत नाही.." "शी!!" वगैरे म्हणत फिरत असायचो...
- देव सारं काही पाहत असतो... त्याने बरोबर आम्हा सार्यांची विच्छा पूर्ण केली, आणि आम्ही जपानात आलो...

राइनिची (जपानला यायचं करणे) करणारया उमेद्वार लोकांना एकंदरीत असं होत असावं :-
सोबा, उदोन, वासाबी॥
तेंपुरा, सुशी, तेरियाकी॥
थाकोयाकी आणि याकिसोबा ॥
बाकी आता मला काई नको बाबा॥

नव्याची नवलाई, ३-४ महिन्यानी का होइना, संपली आणि या पदार्थांचा कंटाला येवू लागला!!
सुरुवातीला शेड्यूल ठीक असल्याने घरी जेवण तयार करणे चालू होतं.. नंतर ते जमेनासं झालं आणि जपानच्या खाद्य संस्कृतीची ओळख व्हायला सुरुवात झाली....

२४ तास सुरु असणारी कोंबिनी( Convnient Stores)!! यातून मिळणारा ओबेन्तो, तो घरी येवू लागला....
"एकदा तयार केलेले जेवण २ दिवस चांगले राहते. (थंड वातावरणात)!! "वरील तत्त्वावर असलेले ओबेन्तो गिर्हैकाने विकत घेतले, की "गरम करून पायजे का?(साहेब)" असं विचारलं जातं... मग ते जेवण गरम करून खायचं... "आयडिया चांगली आहे!"
सहज कंटेंट बघावे म्हटलं, तर "खाद्य पदार्थाचा एक घटक म्हणुन समाविष्ट" या यादीत "डुक्कर", "डुक्कर-तेल ", "कोम्बडि" आणि "सन्त्रं !"

म्हणजे, एखाद्या "जपानी" "खाना-खजाना" मधे काय सांगत असतील, तर :

पदार्थ : "दम डुक्कर" किंवा "डुक्कर दो प्याजा"
थोडी भाजी घ्या..
ती अशी लाम्ब लाम्ब चिरून घ्या...
एक माध्यम आकाराचे डुक्कर घ्या....
देशी डुक्कर चांगलं...
...
...
ते मंद आचेवर तलुन घ्यायचं॥
"तेल, कुठलंही चालेल का?"
"लक्षात ठेवा,यासाठी शुद्ध देशी डुक्कर तेलंच घ्यायचं, नाहीतर घर के जेवण का स्वाद येत नाही!!"

दूसरा एखादा "पुलाव" करताना, तिथली एखादी बाई सांगेल,
"सर्व्ह करताना त्यावर थो-डंसं डुक्कर भुरभूरा!! "
किंवा
डुक्कर :- "चवीपुरतं"

"जपानी लोकांचं मुख्य अन्न हे भात असून, त्यांच्या आहाराताले सारे पदार्थ, हे समुद्रजन्य असतात।" - असं आपण "जपानी भातशेती" या टैपच्या शालेय धड्यात शिकलोच... आजच्या घडीला मात्र हे पूर्णपणे खरं नाही असं म्हनावं लागेल.. अमेरिकन कंपन्यान्नी केलेल्या मार्केटिंग मुळे आणि जपानी लोकांच्या ऊँची वाढवाण्याच्या इछेमुळे असं झालं म्हणे! तर आजकाल टिपिकल फॅमिली रेस्तराँ मधे काय मिळेल तर:-
१) ताजं अमेरिकन बीफ आणि (चिकट) जपानी भात!
२) ताजं ऑस्ट्रेलियन बीफ आणि (चिकट) जपानी भात!
३) ताजं इटालियन चीज आणि (इटालियनच) नुडल्स! इत्यादि इत्यादि..
बरोबर "ड्रिंक-बार" हवंच!
"२५० येन मधे हवे तेवढे (सॉफ्ट) ड्रिंक प्या!!" इति ड्रिंक-बार..
त्यामुले, नवशिक्याला "ड्रिंक-बार" पहिल्यांदा बघितला, की "(चायला), आपल्या भारतात पण ड्रिंक-बार सिस्टिम यायला पायजे असं हमखास वाटतं!
काही जणांना कंसाताल्या "सॉफ्ट" शब्दाचा भारी राग येतो! पण फॅमिली रेस्तराँ असल्या कारणाने, त्यांना अपेक्षित असलेली "शिष्टिम" तिथे नसते..


भारतात असल्यापासूनच जपानी जेवणात फार रस होता.. बर्याच पदार्थांची माहिती मिलवली होती..
ती वर लिहिली आहेच! "पण त्यातले आपण खाऊ शकणारे पदार्थ खायचे असतील तर ते "इनाका" (खेड्या!) मधे जाउनच!" अशा टैपचा चंग बांधल्यामुले, बरेच महीने त्याची प्रतीक्षा करावी लागली ..
शेवटी एकदाचा तो दिवस उजाडला.. इनाकात गेलो..
जपानी सोबा(बकव्हीट) पासून बनवलेले "सोबा नुडल्स", "सोबाच्या (च्या = चहा )", आणि शेवटी
"सोबा आइस क्रीम" सुद्धा! वाह!!! खरंच छान दिसत होता हा सोबा!!!

"जपानी सोबाची काही लोकांना अलेर्जी असते.. काही लोक सोबा खाऊन लगे मरतात सुद्धा !!!"
तिथल्या होस्ट साहेबांनी आम्हाला वाढता वाढता पुढीलप्रमाणे माहिती पुरवली!!
"ओ घ्या की, लाजायलाय काय?!" हे होतंच!!!
त्यांना चार पाच घास खाताना पाहून मग आम्ही चालू केलं..

त्यांच्या खाण्याच्या पद्धतीकडे पाहून प. पु. फरीदा जलाल यांनी दिलेला "सुर्र के पीओ!" हा संदेश, जपानी लोकांनी कुठे ऐकला, याचा मी विचार करू लागलो.. "खुप सार्या सोबाच्या पाण्यात लांबच लांब सोबा नुडल्स टाकलेल्या असतात! " अशा त्या नुडल्स एक तर काड्यान्नी उचलायच्या! आणि त्या तोंडाने आवाज करत, "सुर्र के आत ओढून खाओ!" असा हा प्रकार.. काय माहित? ट्रांसलेशन मधे थोड़ा "पी" चा "खा" झाला असावा असा आपला एक अंदाज.. सोबाची चव मात्र ब्येष्ट!

"नॉन वेज न खाणार्या लोकांचं काय?" चं उत्तर ठिकठिकाणी असलेल्या "इन्दो-र्यौरीयासान" अर्थात "भारतीय पद्धतीच्या खाणावळीत" मिलतं... (त्या खाणावळी नसून होटेल्स आहेत हे माहीत आहे, पण खाणावळी शब्द वापरायचा म्हणुन... माफ़ी असावी) अशा या इन्दो-र्यौरीयासान मधे हमखास बघायला मिलनारे दृश्य म्हणजे एखादा भारत प्रेमी जपानी मनुष्य, हा आपल्या ओळखीच्या एखाद्या इन्दोजिनला (भारतीय माणसाला) घेउन जेवायला आलेला असतो.. असा हा मनुष्य सहसा आपल्या तरुणपणी (तेव्हा अविकसित / विकसनशील!?!?) अशा आपल्या देशात येउन गेलेला असतो. तेव्हाचे दिवस आठवून, भारतीयाला "सांग सख्या रे, आहे का तो अजुन तैसा! साधा - सुंदर.." असं काहीतरी विचारित असतो...
(क्रमशः)

शनिवार, १४ जून, २००८

यात्रा भाग : २

अं? हे काय अचानक? भाग : २??

इथे वाचा : )
यात्रा भाग १

(यळगुड सेंटेड) दूध पिउन झालं आणि ब्यैग आमच्या गाडीत ठेवायला जाऊ लागलो...
"साहेब... मुम्बई आहे काय?? क्षशे रुपये... लगेच सुटणार..." इति :- एक ट्रैवल्सवाला....
"नाही.."
"साहेब, ३ शीट ना ? कमी करतो की!! लगेच सुटणार..."
"अरे सुट की मग, नाई यायचं सांगितलं ना एकदा ?", बाबा वैतागुन म्हणाले...
देशात पाउल ठेवल्या ठेवल्या मला परत पाठवायला पेटले होते लोक....

"गुलाबजाम" केले आहेत...
"कोफ्ता करी" केली आहे..



रात्री लाईट काहीतरी करुया...

उदया सकाळी श्रीखंड.. ( दही तान्गून ठेवलंय.. )
रात्री मिसळ...
परवा मावशीकडे बोलावले आहे... " आमची आई !
"खा खा आणि खा....", दोन तीन दिवस असेच गेले... अर्थात मधे मधे "जा" होतंच...

बदलान्बद्दल मला जे कुतूहल आहे (म्हणजे ?? वाचा यात्रा भाग १ :p ) त्याबद्दल एक मोठा बदल म्हणजे आमच्या घरी ब्रौड़बैंड इंटरनेट आलं होतं!! "जिंकलायस भावा !!!"
तिथून जेव्हा ओ र कु आणि एक्सेस केलं तेव्हा कुठे चैन पडली...

"भारत स्वतंत्र झाला! स्वातंत्र्यपूर्व भारतात असणारी संस्थाने भारतात विलीन झाली..
"राजे महाराजे" वगैरे काही राहिले नाहित..."
कोण म्हणतं?? साधारण एक वर्षानंतर सुट्टीवर आलेला मी, स्वतंत्र भारतातला राजाच झालो होतो...

"अरे, तू कशाला.... तू बैस...."
"नको नको...."
"तो आता झोपलाय... नंतर या..."
"अरे खा रे... तिकडे कुठे मिळणार आहे??"

"काम ना धाम... नुसता आराम.. ", असा मी "रजेवर आलेला राजा" झालो होतो...
स्वातंत्र्यपूर्व भारतात जसे असंख्य राजे होते, तसे आजकालही रजेवर आलेले असंख्य राजे पहायला मिळतील..
कंपनीच्या कृपेने "यात्रा" स्वस्त झाल्याचा परिणाम... त्यामुळे आत्ताची ही कथा अशा सगळ्या राजांची आहे...

असाच एक राजा..कुठल्या एका संस्थानाचा...
असाच बोलता बोलता म्हणाला, सुट्टीवर गेलं की काही लोक उगाचच घरी येतात...."
"काही घरी बोलावतात..."
"दोन आठवडे काय ती सुट्टी.. त्यात कोणाकोणाला भेटायचं?"
"लोकांना कळत कसं नाही?" वगैरे ....
त्या राजाला त्यामागचं प्रेम, त्यामागची आपुलकी कळलीच नसावी..
"आपण विशेष काही न करता लोक आपल्याला घरी बोलावून चांगलं खायला प्यायला
देतात.. चांगलं कौतुक करतात... यात चिडायचंय कशाला??"

"अतिशय सुंदर साबूदाणा वडे!
कोल्हापुरी मिसळ!
जबर्‍या चिवडा (पार्सल, देश सोडताना म्हणून)!
मस्त शंकरपाळ्या !(पार्सल, देश सोडताना म्हणून)! "
असं सगळं चांगलं चांगलं खाताना आपल्या लहानपणीच्या चांगल्या चांगल्या आठवणी काढणारे चांगले असे किती लोक असतात? दुर्दैव महाराजांचं... "अय कंबखत तुला समजलंच नाही!"

बरंच विषयांतर झालं... मुळ विषय यात्रा होता... तर आत्तापर्यंत हजारदा (बर, १०० वेळा) केलेली "कोल्हापुर - पुणे यात्रा", ती परत करायची होती... काही कामं होती...

सकाळी सातची कोल्हापूर पुणे एशियाड पकडली.. गाडी रिकामीच होती. "डाव्या बाजूची मधली"( सर्वात सुरक्षित असते म्हणे! तर ती) शीट मिळाली..उजविकडची शीट पण रिकामीच होती.. सहज लक्ष गेलं तर त्याच्या खाली "कासव छाप" पडलेली होती..अर्धवट जळलेली.च्या मायला बंड्या... हे काय म्हणायचं?

रात्रीची गाडी.. झोप लागावी म्हणून लोक "वातावरण-निर्मिती" करतात... ऐकलं होतं..माझा एक मित्र झोप यावी म्हणून सर्दि वगैरे नसूनही आयोडेक्स लावतो.. असं काही असावं असा मी अंदाज केला...


गाडी सुरू झाली... थोडिशी झोप लागायला लागली होती. अचानक कानाजवळ घुंग-घुंग असा आवाज आला..."डास ?! " " एस टी मधे "डास ?!" "

देंग्यु, मलेरिया, टयफ़ाईड, प्लेग... सग्ळं एका सेकंदात आठवलं...

मोठे मोठे डास बघून थोडं चुकीचंच आठवलं, पण तरी काय...

आता डासांपासून वाराच वाचवेल असं वाटलं... "खिड़की खोलो, डास भगाव॥"

सेफ्टी बिगिन्स @होम म्हणत मी माझी खिड़की उघडायला गेलो तर मागच्या शीटवरचा कोणीतरी एकदम खाकरला...

"डास आहेत..खिड़की उघडुया म्हणजे जातील..."

"वाट" तो म्हणाला..

"तेच की... वाट आहे..."

"वाट यु सेड??"

"ओपन दी विंडो. मोस्किटो "

"ओह...वोके॥"

तेवढ्यात कंडक्टर आला.."काय साहेब? " "तुमच्या एशटीत डास?" मी मजेत म्हणालो..

वारं आलं आणि डास कुठे गेले...

अतीतला जाग आली... मस्त वडा पाव खाल्ला...

गाड़ी एकदम वेगात चालू होती त्यामुले परत झोप लागली...

अचानक घुंग घुंग आवाज आला...

मागच्या शीट वरून येत होता... तिथला "वाट" गायब होवून तिथे एक "नवतरुण" आला होता...

तोच गुणगुणत होता...

कंडक्टर परत आला... मगाशी मी चेष्टा केल्यापासून तो सारखा ये जा करत होता, आणि खुन्नस देत होता.

माझे तिकिटाचे उरलेले पैसेही त्याने दिले नव्हते...

उगाच बोललो वाटलं.. त्याची काय चुक म्हणा

गाडीतून उतरताना पैसे न मागता उतरलो..

"साहेब, पैसे.. गाडी धुवून घेतो काय..."

"सॉरी...पण चांगलं वाटतं काय?", मी...

"बरोबराय.. मीच सॉरी साहेब.." एका

एका पसिंजरला गाड़ी लागली बगा...

"बर, ठीक आहे..."

"गाड़ीत बसून" "गाड़ी लागणे जरा विचित्र आहे ना?

मला एकदम मी विमानात पहिल्यांदा बसलो ते आठवलं..

आपल्या शीटसमोर असलेल्या कप्प्यातुन आतली कागदी पिशवी मी बाहेर काढली होती..

नंतर समजलं, विमान "लागलं" तर "वापरायची" असते...

पुण्याला पोचलो आणि थेट मित्राच्या रूमवर ...वर्षभराने सगळे भेटणार आहेत..... आता सगळे कामावर गेले असतील पण "विद्या अर्जन" करणारे काही लोक होते! ते तरी भेटतील...

कुलुप ?? खोलीला कुलुप???

मग आठवलं... त्या लोकांनी रूम बदलली होती...आता ती मोठी बैग घेउन एक चौक पुढे त्यांच्या

घरी चालत जाणे आलं.. (क्रमशः )

शुक्रवार, ६ जून, २००८

चला.... नोमिकाई !

"तू मेरा भाई है॥"
"हिन्दी जापानी भाई भाई !!! "
"यू आर माई ब्रदर..."

ही वाकये हिन्दीत आहेत असं समजा, बाकी आजुबाजुला भरलेले जग दिसतीलच ...
काहीतरी कारण काढून परत एकदा फूलपात्र भरायाची आणि म्हणायचं "कान-पाय !"

नोमिकाई म्हणजे "आपली" दारू पार्टी!
कान-पाय म्हणजे "आपले" चिअर्स !!

दोन महीने झाले या प्रोजेक्टवर...
पहिल्या दिवसापासून म्यानेंजर म्हणत होता... माफ़ करा तुमचं "वेरुकामु" करायचंय हं ...
सारखं चालूच होतं...

शेवटी तो "दिनु" उजाड़ला आणि आम्हाला बोलावण आलं, "आज यायचं हं..."

नेहेमी १२-१२ पर्यंत काम करणारे हे जपानी, त्या दिवशी बरोब्बर ६.३० ला सगळे जमले...
सर्वांनी एका सुरात "जय जपान" म्हटलं, आणि पहिलं "कान-पाय" करण्यात आलं ...

"आपण जी "-साके" पितो, ती आपण पीत नसून, आपल्या मुखाद्वारे साक्षात भगवन प्राशन करत असतात!", अशी कल्पना जपानी पुराणात लिहिली आहे... बरं, पुराणात नसली, तरी त्यांच्याच जपानी पुस्तकात मी वाचली आहे.. त्यामुले "ओ-साके" आणि "वारुई" हे शब्द एका वाक्यात येऊ शकत नाहीत!
ओ-साके म्हणजे दारू ! आणि वारुई म्हणजे
वाईट ! पण या शब्दातला "साके" म्हणजे "दारू" साठीचा शब्द असून, "" हे "आदरार्थी" प्रिफिक्स आहे.. (प्रिफिक्स ला आपल्या मराठी मधे काय म्हणतात कोणीतरी सांगा मला, आणि माफ पण करा...) त्यामुले "आमच्या देशात दारू पीत नाहीत फारशी", असं सांगितलं, की "काहुन जी?" असं विचारलं जातं...

जपानमधे स्त्री-पुरूष असा भेदभाव अजिबात नाहीये... कधीकधी स्त्रीया पुरुषांना मागे टाकतानाही दिसतात...
परवाच आमच्या टीममधल्या एका ताईन्ना त्याच म्यानेंजर ने विचारलं, "काल लवकर गेल्ता घरला... काय पेशल पोग्राम होता का काय??(हाहा हाहा हसत)"
त्या : "तसं काई नाइ बगा... नेहेमी
सारकंच आपलं.. शालेतली एक मैतरिन आल्ती... तिच्याबर्बर आपलं जरा ओसाके नोमिनी इत्तेमाशिता...(प्यायला गेल्ते..) "
म्यानेंजर : मग काय फ्रेंच उइसुकी (म्हणजे आपली इसकी हो...)
वगैरे का काय?"
त्या : "नाय नाय.. काल आपली देशीच... (कोकसान:- देशात बनवलेली.. कोकू : देश आणि सान : बनलेली)"


तर वेरुकामु नोमिकाई साडेसहा ला चालू झाली आणि तासाभरात नुसते "कोकसान" चे नुसते पाट वाहू लागले..
आपल्याकडे जे जेवणात होतं ना:-
पंगत बसली आहे.. घरातली कर्ती सवर्ती बाई सगल्या आल्या गेल्याचं बघते आहे.. लोकांना आग्रह करते आहे.. "अहो घ्या हो... घरी काही नहीं आहे जेवण वगैरे आज... "
आजुबाजुचे लोक (उगाचच) "अहो
वाढा त्याला..त्याला आवडते !"
तो : "अहो नको, आधीच खुप बासुंदी पीली(/प्यायली) आहे..."
घाई घाई करून त्याला बासुंदी वाढली जाते..
सगले हसतात आणि परत "कान पाय" केलं जातं ..." सगळे खुश!

अरे? कान पाय?? बरोबर.. या सगल्यात "बासुंदी"च्या जागी "दारू" वाचा..
"कर्ती बाई" च्या ऐवजी एखादी (अति) पुढे पुढे करणारी बाई वाचा .. झालं .... बाकी सगलं तेच....



जपान
मधे "सीनियर-जूनियर" वगैरे फार असतं.. सर्वसाधारण सीनियर "माज आणि फक्त माज" करतो...
सर्वसाधारण जूनियर नुसती "हांजी हांजी" करतो... आणि दोघे मिलून १२-१२ पर्यंत रात्रि जागवत बसतात..
शनिवारी पण शुक्किन अर्थात कंपनीत कामाला येणे करतात...
मैत्रीच वातावरण फारसं नसतं...
कम्युनिकेशन सहजसाध्य नसतं...


अशा वातावरणात गोष्टी पुढे तर सरकायला हव्यात? अशा वेळी उपयोगी पडते ती नोमिकाई !
एक दोन प्याले प्याले की सीनियर आणि जुनियर:-
"तू मेरा भाई मै तेरा भाई" होऊन जातं , आईस ब्रेक होतो आणि कम्युनिकेशन होऊन जातं..
नोमी च्या निमित्त्याने हे कम्युनिकेशन होतं, त्याला जपान मधे म्हणतात नोमीनिके-शन!!!


(क्रमशः नोमिकाई ची दूसरी बाजू :D )

सोमवार, ५ मे, २००८

गोल्डन-वीक ट्रिप

"गोल्डन वीक ची काहीतरी भारी ट्रिप करुया... " , गोल्डन वीक च्या महीनाभर आधी सगळे जण म्हणंत होते...

"दोन दिवस राहिले...आता तरी ठरवा नाहीतर घरात बसायला लागेल..."

पटापट फोनाफोनी झाली...काही लोकांना अचानक काम आल्याने येणं जमलं नाही.
बाकी लोकांनी "ओके" केलं आणि "डन... ताकाओसान अर्थात माउन्ट ताकाओ " वर जायचं ठरलं !!!!!
"चार मे, मिदोरिनो ही" अर्थात (जपानमधल्या ) झाडांचा दिवस च्या शुभ-मुहुर्तावर गिर्यारोहण करायचं ठरलं..


१." सकाळी ०७:१५ ला ताकाओसानगुचीला पोहोचुन ताकाओसान-आरोहण चालू करायचं"
२. "उतरून येउन १२:३० ला शिन्जुकू मधे भारतीय जेवण"
३. "संध्याकाळी मिझुए - देशपांडे स्पा वर लौजिंग बोर्डिंग.. "
- असा ३ कलमी फक्कड़ पिलान-A बनवण्यात आला...

सकाळी आठची ताकाओसानची गाड़ी पकडली... साडेनऊला ताकाओसानला पोहोचलो आणि अर्थातच

पिलान-A रद्द झाला...

नवीन (पिलान-B) असा होता:

१. "पोचलो की" ताकाओसान-आरोहण चालू करायचं

२. "टोकियोला पोचलो की" मिझुए - देशपांडे स्पा वर लौजिंग बोर्डिंग

भाग एक:- "ताकाओसान-आरोहण"

भाग एक साठी कृपया वाट पहा, अर्थात (क्रमशः)

भाग दोन:- "मिझुए - देशपांडे स्पा वर लौजिंग बोर्डिंग"

जेवण झालं आणि सगळे स्पा कडे निघालो. ""कुठे जायचं??" याबद्दल बरेच प्रस्ताव, प्रवाह असताना देशपांडे (काकुं)कडून खालीलप्रमाणे प्रस्ताव आला होता..आमंत्रणच होतं म्हणा...

"गिर्यारोहण झालं की एक दिवस मिज़ुए देशपांडे स्पा वर एक वेळचं रिज़र्वेशन अव्हेलेबल आहे..

फेसिलिटीस अवेलबल: लोजिंग बोरडिंग, ब्रेकफास्ट, ..., उनो!(कंपल्सरी) इत्यादी..

बरोबर त्यांची मुलं!! वय वर्षं २ आणि ७.

आमची फारशी ओळख नसताना मी श्री. मिलिंद तथा गा.दु. ला त्यांच्याबद्दल विचारल्यावर, "अरे, ते बेस्ट कपल आहे" आणि त्यांची मूलं?? आई-शप्पथ!!! जबरदस्त!!! त्यांच्याशी ओळख झाल्यावर पटलं, " मिलवा चं म्हणणं खरं होतं.. "सोला आने सच!!!" "बेस्ट फॅमिली च म्हणावं लागेल.."

त्यांच्या घरी पोचलो आणि "पहिला चहा" झाला... "काय करायचं जेवायला?" "आत्ताच दुपारचं जेवण झाल्या" मुळे आणि ते "लय हेवी" झाल्यामुळे "साधी खिचडी" करावी असा प्रस्ताव आला आणि यथावकाश त्यावर शिक्कामोर्तबही झालं.. पुरूष वर्ग "पोलिटीक्स, क्रिकेट" इत्यादी "महत्त्वाच्या" गप्पा मारण्यात गुंतला आणि स्त्रीवर्ग स्वैपाकात ...

मिश्टर सिड(वय वर्षं २) आणि त्यांच्या ज्येष्ठ भगिनी, मिस शेंडी ( वय वर्षं ७) यांनी हे सगळं चालू असताना आपापल्या अनुक्रमे कळा कला दाखवल्या...

मिस शेंडी यांनी "ताकाओसानचे" चित्र काढले.. "दो. रे. मी. ♪♪♪♪" अर्थात जपानी "सारेगामा" वाजवुन

दाखवलं. श्री सिड यांनी खुर्चीवरून पडून दाखवलं... थोडं रडून दाखवलं...

अर्थात, मिश्टर सिडच्या अंगात नुसत्याच कळा नसून तितक्याच कलाही आहेत हे त्याने गायलेल्या "कोई-नोबोरी ♪" इत्यादी इत्यादी जपानी गाण्यांमधुन सिद्ध झालं...

थोड्याच वेळात वाढायला घेतलं गेलं, आणि खिचडी, पापड, तळलेली मिरची, दही-बुंदी, चटणी आणि संत्री(!) असा मेनु पुढे आला! अत्यंत चविष्ट असं जेवण झाल्यावर "गुलाबजाम" पुढे आले.. "आता काही झोप लागत नाही लवकर..." असा विचार चालू असताना मग "पत्ते" बाहेर आले. "UNO(उनो)" नावाचा एक वेगळा पत्त्यांचा कॅट होता. अधूनमधून खाणं-पिणं चालूच होतं..पत्ते खेळत खेळत किती वेळ गेला कळलंच नाही. UNOचा खेळ हा इतका भारी आहे, की आपण तो तासनतास खेळू शकतो.

बाकी खेळताना गप्पा, गाणी, चीडवणं अगदी जोरात चालू होतं..

मला लहानपणीची आठवण झाली.. आम्ही सातारला असताना तसंच सुट्टीमधे तिथं गेलं की आत्त्याच्या घरी ५-५ , ६-६ तास हा खेळ खेळायचो .. मधे मधे अर्थातच आई - आत्त्या- काकू "खायला" आणून द्यायच्या.. त्यांना कधी सांगायला लागायचं नाही.. खाणं हे अगदी वेळेवर, भरपूर आणि आवडीचं पुरवलं जायचं... असा "UNOचा गेम" होता..

आता मोठं झाल्यापासून भावाबाहिणिंबरोबरची ती मोठी सुट्टी तर नाहीच, पण सगळ्यांना

एकदम सुट्टी नसल्यामुळे पत्ते खेळणंच कमी झालं असताना अचानक जपानमधे हा UNOचा गेम

फार छान वाटला....


सकाळी उठालो तेव्हा ९:३० झाले होते. उठल्या-उठल्या चहा हजर झाला. परत तीच लहानपणची आठवण झाली.. मिस शेंडी यांनी परत UNOचा डाव मान्डण्याचा हट्ट केल्यामुळे त्यांच्याशी खेळून (आणि हारून) झालं तोवर "स्पेशल साबुदाणा खिचडी" आमची वाट पहात होती. दोन प्लेट खिचडी खाउन , तृप्त होवून

बाहेर पड़ता पड़ता, मिश्टर सिड यांनी "सगळे चालले" वर थोडं रडून दाखवलं... "देशपांडे स्पा" चे मालक मिझुए स्टेशनवर सोडायला आले. बरेच वर्षांनी इतकी भारी मजा आल्यामुळे, लहानपणीचं ते "ही सुट्टी सम्पुच नये" वालं फिलिंग येवुन घराबाहेर जायला पाय निघत नव्हता...

बाकी "स्पा" मधून बाहेर पडताना सहसा एक सर्विस बद्दलाचा "फीड बैक फॉर्म" असतो. घरगुती स्पा वर तो तेवढा नसल्यामुळे, ब्लॉगवर असा फीडबैक ...

शेवटी फक्त एवढंच : - धन्यवाद, पुढच्या सुट्टीमधे नक्की बोलवा!!!

मंगळवार, १५ एप्रिल, २००८

पारिजातक.... फुलांचा सडा !

खुप कन्टाळा आलाय.. उशिरा पर्यंत काम संपतच नाही...
रात्री उशिरा यायचं ..
सकाळी परत आहेच...

पुढचा प्रोजेक्ट चांगला असेल..(काय माहिती?)
मान खाली घालून चाल्लो होतो..


खाली मस्त सुंदर जांभळी फुलं दिसली... छान वाटलं॥

"देवा, फुलं बनवल्याबद्दलही धन्यवाद! "



नुकताच साकुराचा सिझन होउन गेला होता. साकुराला मार्चच्या पहिल्या -दुसरया आठवडयात खुप फुलं येतात. फ़क्त तेवढंच.... नंतर सारी फुलं गळून पडतात.. पण रस्ताभर पसरलेली साकुराची फुलं... तेही दृष्य फार सुरेख दिसतं आणि आज तिथंच बाजूला होती ही जांभळी फुलं... रस्ताभर फुलांचा पाउस पडल्यासारखं दिसत होतं, "पारिजातकासारखं..."


"जपान इतका सुंदर का आहे ?" परत प्रश्न पडला...  
सीजन बदलला, की बरोबर वेळेवर इथे वेगवेगळी फुलं येतात..
कमालच आहे.. कितीतरी रंगांची फुलं...

नीट बघितलं तर ही जांभळी फुलं "झेन्डूची" होती!!!"





अरे??? " मग लक्षात आलं... बहुतेक इथेही काहीतरी गडबड आहे॥

"दिसतं तसं नसतं !!!", जपानी म्हण असावी ही कदाचित...
"जपानमध्ये चौकोनी कलिंगड असतं.." वगैरे पेपर मधे बघायचो.
त्याचाच (चिच) हा (ही) भाऊ(/बहीण) असावा(वी)...




नंतर मित्राशी सौदान(डिस्कशन) केल्यावर कळलं:- "इथे वेगवेगळ्या देशातली फुलं आणतात आणि ती रात्री कधीतरी बदलून टाकतात." आणि सकाळी आपल्याला दिसतात:- "ऋतुप्रमाणे बदलणारी फुलं!"
खरंच का काय माहिती नाही, असेलही कदाचित!!!
सहज वाटलं..जपानच्या लोकांना विविधतेची / नाविन्याची फार आवड आहे.
त्यासाठी काय वाटेल ते करायची तयारी आहे..
कदाचित म्हणून जपान सुन्दर आहे!

मग जपानला येऊन दीड वर्षानंतर मी पुन्हा स्वतःलाच म्हटलं, "यो~ कोसो!"










अर्थात,


"जपानमध्ये स्वागत असो!!!"





पारिजातक.... फुलांचा सडा !

रविवार, १३ एप्रिल, २००८

इतकी वर्षं मी जिची वाट पाहिली, आज ती मला भेटली...



प्रेम



शाळेत असल्यापासून ती मला आवडायची..

पण धीर होत नव्हता.

आज इतक्या वर्षांनी ती परत दिसली..

इंटरनेटवर..



धीर केला...

आणि.. आणि.. आणि..


आणि..

ती चक्क "हो" म्हणाली...

आनंदाला पारावार राहिला नाही..

कोणाकोणाला सांगू!!

"इंटरनेट वर प्रेम जुळतं♪ ♪" म्हणतात ना, ते असंच बहुतेक..

.

.
.

शाळेत असतानापासून मला गियर ची सायकल आवडायची."

"एवढी भारी सायकल कधी-कुठे चालवणार.."
"शाळेच्या पार्किंग मधे लोक वाट लावतील.."
बरीच कारणं..

जपानमधेही सायकालच्या चोर्‍या होतात..
पण इथे आपल्या देवांच्या भरवशावर "शेवी"(Shevy) घेतली...

वा उस्ताद!!!!! क्या साइकील है।

माफ करा..

पण गोविंदाच्या आणि मुख्य म्हणजे नितीन मुकेश च्या नावाने हे गाणं म्हणतो॥

♪ "सोने की साइकील... चांदीकी सीट... ♪"  




पहिला लुक!




लाजली हो... ♪

( LOL!! )







"सुंदरा-सुंदरा!! "
"सुंदरा-सुंदरा!! "