गुरुवार, ३० जून, २०११

उशीर

"उद्या सकाळी या. ५:३० ला बरोब्बर. ओके? ", हसत तो ड्रायव्हरला म्हटला.
ड्रायव्हर प्रयत्नपुर्वक हसला. आणि "ओके साहेब. गुड नाईट!" म्हणून गाडी पार्क करायला निघाला.
"आजचा कार्यक्रम लांबला म्हणून उद्याची वेळ चुकवणं बरोबर नव्हे! ५.३० म्हणजे ५.३०!" त्याने ठरवलं होतं.
तो लिफ्टकडे निघाला. वॉचमन स्टुलवर पेंगत होता. अधुनमधुन चांगला घोरत बिरत होता.
" झोपेच्या वेळी झोपणारच. माणुस तो शेवटी. " त्याच्या मनात आलं.
"कामाच्या वेळी झोपा काढतोय हा!" वगैरे विचार दुरुनसुद्धा मनाला शिवुन गेला नाही. आज तरी.
एकोणचाळिसाव्या मजल्यावर पोहोचायला काही क्षणच लागले असतील. किती क्षण? धुंदीत आज लक्षातच आले नाही. एरव्ही कधी हाच वेळ जाता जात नसे. मग मोबाईलमधे उगाचच मेसेज बघ वगैरे घडे. पण आज तसं नव्हतं. क्षणात घर आलं!
हातात़ला मोठ्ठा बुके सांभाळत त्याने घराचा दरवाजा उघडला. "१००-१०० गुलाबांचा बुके आपण चित्रपटातच बघत असु. सुंदर नट्यांना त्यांच्यामागे फिरणारे, गाणारे-नाचणारे नट देताना बघितलं होतं. सगळं खोटं वाटे.
आज प्रत्यक्ष आपल्याला असा बुके मिळाला!"
कितीही म्हणा, तो हरखुन गेला होता; हरवुन गेला होता.
मिळालेला बुके सोफ्याच्या एका खुर्चीत ठेवुन तो शेजारच्या खुर्चीत बसला.
गुलाबांचा गंध पसरलाच जवळपास.
अचानक खिशातला मोबाईल वाजला.
"अभिनंदन! असेच छान काम करत रहा. तुम्हाला अशाच चांगल्या भुमिका मिळत राहोत! शुभेच्छा! " - मेसेज.
"आभारी आहे!" त्यानं लगेचच उत्तरही पाठवलं आणि मोबाईल ठेवला.
काही तासांपूर्वीच झालेला आजचा "गौरव सोहळा" त्याला परत एकदा आठवला. त्यानं परत मोबाईल हातात घेतला. त्यात अभिनंदनाचे संदेश भरुन पडले होते. हा अजुन एक आला होता..
समारंभातले काही फोटो मोबाईलच्या कॅमेर्‍यातुन त्याने घेतले होते. ते परत बघावेसे वाटले. त्या मोठ्या स्क्रीनवर स्वतःचा फोटो काढुन घेतला होता त्याने. इतक्या वर्षांचं त्याचं स्वप्न आज सत्यात रुपांतरित झालं होतं...
चेहेर्‍यावर समाधानाचं हसु उमटलं.
* * * * * * * * *
"टींग..... टींग..... "
घड्याळाचे बरोब्बर दोन ठोके झाले आणि अचानक त्याला जाग आली.
लक्षात आलं, खुर्चीतच झोप लागली होती. दिवाही चालुच होता आणि त्यामुळेच घड्याळ रात्री वाजलं होतं.
"आधी मेक-अप उतरवायला हवा!" म्हणत त्याने मेक-अप उतरवायला सुरुवात केली. सुट अजुन काढला नव्हता.
"आर्टीस्ट्ससाठी सगळ्यात चांगले आणि सगळ्यात वाईट काय असेल, तर तो 'मेक-अप!' " असं खुद्द मेक-अप करणार्‍या स्टार-सुजाताने सांगितल्यामुळे त्याला लवकरात लवकर त्यापासुन सुटका करुन घ्यावीशी वाटली आणि त्याने सुरुवात केली.
चेहेरा नीट स्वच्छ धुतला. थोडंसं कोमट पाणी चेहेर्‍यावर लागल्यावर परत तजेलदार वाटलं.
मेक-अप उतरला. आणि तो परत येउन सोफ्यावर बसला.
समोरच, मगाशी तो बसला होता ती सोफ्याची एक खुर्ची आणि दुसरीवर तो गुलाबाचा बुके.
खुर्चीमागे लावलेला मोठ्ठा उभा आरसा. घराबाहेर पडताना संपूर्ण माणुस दिसेल अशा उंचीचा. आता बसुनही तो स्वतःला नीट पाहु शकत होता.
त्यानं गुलाबांकडं बघितलं. पुरस्कार घेतानाचा तो क्षण कधी न विसरणारा! तो परत जगुन घ्यावासा वाटला आणि तो उठला. गुलाबाचा बुके हातात घेत तो रुबाबात, थोडासा तिरका उभा राहिला.
आरशाच्या अर्ध्या भागात तो, तर उरलेल्या अर्ध्या भागात पुरस्कार देणारे, दिग्दर्शक श्री. .... !
त्यांनी म्हटलेलं "अभिनंदन!" त्याला आत्ताही ऐकु आलं. "आसंच काम करत राहा~" म्हटले होते.
आरशातल्या त्यांच्याकडे बघुन "धन्यवाद!" तो बोलला आणि हसला.
प्रत्यक्ष समारंभात तीन-चार क्षणच मिळाले असतील पण आता मात्र मिनीटभर तो तिथे उभा राहिला.
"सर, तुमची भुमिका खरेच छान झाली होती. काय हॅण्डसम दिसला आहात!" असं कितीतरी जण, आणि किती जणींनी म्हटलेलं त्याला आठवलं.
चेहेर्‍यावर परत हसु आलं. तो परत उठुन उभा राहिला. आरशात बघत राहिला. बसावेसे वाटेचना.
त्याने डीम लाईट सुरु केला आणि मोठा लाईट बंद करुन आरशात स्वतःला न्ह्याहाळु लागला.
त्या अंधुक निळ्या प्रकाशात, त्याला गालावरची एक सुरकुती दिसली. हसल्यावर अजुनच गडद होणारी!
क्षणात त्यांचं हसु मावळलं. चेहेरा सरळ झाला.
कारण ती सुरकुती एकटी नव्हतीच! जोडीला अजुन दोनेक तरी दिसल्याच! रोज मेकअपच्या जोरावर नाहीशा होत पण आत्ता मात्र त्याने पटकन मोठा लाईट लावला. त्या उजेडात त्या सुरकुत्या कुठल्या कुठे नाहीशा झाल्या. तो सुखावला. हसला.
पण परत जाणीव झालीच सत्याची. डीम लाईटच खरा वाटला. जवळचा वाटला.
विरळ होत चाललेले केस. त्यांचा रंगही चंदेरी होऊ लागला आहे.
आता कुठे कामाची सुरुवात आहे आणि ... इथे ह्या क्षेत्रात असेल, तर सुंदर-रुबाबदार दिसणं फार महत्वाचं.
आता त्या डीम लाईटची त्याला भिती वाटु लागली. परत तो मोठा लाईट खरा समजावासा वाटला.
आरशात बघताना डोळे हळुहळु ओलसर होऊन गेले.
"मी असल्या कोत्या मनाचा नाही खरा. " त्याच्या मनात आलं. " पण मनात येणार्‍या विचारांना कसं थांबवु? "
"देवा. आज सगळं दिलंस! माझ्या इतक्या वर्षांच्या कष्टाचं फळ मिळालंय!"
माफ कर देवा, पण आत्ता क्षणभर वाटलंच ते सांगतो. प्रामाणिकपणे..
"मी पहिल्या दिवसापासुन असेच कष्टाने काम करतो आहे.
पूर्वीचा रुबाब आता तितकासा नाही राहिला त्यामुळे आता आणतो ते आवसान. आत्ताच्या समारंभातही तेच होतं, लोकांना भावलं पण बहुधा..
आज वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षी हे सगळं मिळायला लागलं आहे. आता कुठे सगळं सुरु होतंय.
हेच सारं अजुन थोडंसं आधी झालं असतं तर...
वाढत्या वयाच्या काही खुणा चेहेर्‍यावर दिसल्या आणि तो थोडासा खिन्न झाला.
आरशात पहात पुटपुटला, " देवा.. थोडा उशीर झाला का रे देवा!!! "

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: