बुधवार, १८ जानेवारी, २०१७

स्वप्नी आले काही...

लहान-लहान म्हणून तीची कधी गंमत करावीशी वाटते, तर कधी एऽक रट्टा द्यावासा वाटतो आणि बर्‍याचदा दिलाही जातो. आईने रट्टा दिला, की "आईने वाऽऽ केलंऽऽऽऽ". "आईने वाऽऽ केलंऽऽऽऽ" करत बाबांकडे जावं. बाबांनी रट्टा दिला की आई आहेच जवळ घ्यायला. कधीकधी नुसतं ओरडलेलंही पुरतं, लगेच भोकाड पसरावं.  क्षणात हसावं, क्षणात रडावं. पण रडल्यावर बर्‍याचदा पुढच्या पाच मिनिटात सगळं विसरून परत जवळ यायला बाई तयार.

हल्ली मोबाईलमधले कॅमेरे इतके सुटसुटीत झाले आहेत, त्यामुळे मोबाईलमधे तिचे फोटो/ व्हिडीओज शेकडोंच्या संख्येने आहेत. हॉस्पिटलमधला अगदी पहिला फोटोसुद्धा  आहे. कधी तिच्या आज्जीआजोबांनी तिचे जुने फोटो पाठवले की वाटतं, "बापरे, किती मोठी झाली!" पण खरं सांगायचं तारा फार फरक पडला नाहीये असंच वाटतं. अजून तशीच आहे - चिडकी..

थोडंथोडं वय वाढेल तसं रांगणं, बोलणं, चालणं सुरु झालं..  गाण्यांमधून, पुस्तकामधे चित्रे दाखवून नवे नवे शब्द शिकावे. त्याचे उच्चार करतानाची मजाही आहे. हल्लीच्या बहुतेक मुलांप्रमाणे मोबाईलचं आकर्षणही योग्य वयात सुरु झालंय.

वॅक्सिनेशनसाठी डॉक्टरांकडे जातानाची गंमत वेगळीच. पहिलं इन्जेक्शन दिलं होतं, त्या संध्याकाळी घरी आल्यावर, झोपेपर्यंत एक गूढ शांतता पाळली गेली होती; म्हणजे अगदी विश्वासघात झाल्याची भावना. #Backstabbing!

घरच्या टीव्हीवर आता दोनच चॅनल्स. बेबी टीव्ही आणि झी-मराठी. नाहीतर मग 'फाऊन्टनची" गाणी. किलबिल किलबिल, चिमणा चिमणीचं लगीन, माकडाचं दुकान, इवली चांदणी, एक होता बेडूक अशी सगळी गाणी. स्वप्नांमधेही मग हे सगळे आले नाहीत तरच नवल. मग अचानक रात्री ओरडावं, "छुटकी.. छुटकी.. ",  "उस्ताद उस्ताद, कचाव कचाव". "भीम.. "

आता रात्री झोपताना गोष्ट हवी. त्यात छूटकी, उंदीरमामा हवेच. आणि सगळे मिळून पेपा पिग, जॉर्ज, डायनासोर, ममी पिग, डॅडीपिग वगैरेंना भेटून सगळ्यांनी जेवण केलं की मग सगळे एकत्र जोजो करणार, आणि मगच बाई झोपणार.  
 

Youtubeवर कधी एखादं गाणं पहावं म्हटलं, तर हिस्टरी मधे सगळी फाऊन्टनचीच गाणी. मग बाईंना "ते बघ तिकडे काय!" असं म्हणून पटकन आपल्याला आवडेल ते गाणं सुरू करावं. असं करता करता एकदम "गेरुआ लाव" अशी ऑर्डर ऐकून "आँ???????" होतं.  मग ते "गेरुआ" सुरु केलं की बाईंचंही जमेल तितपत नाच आणि   गुणगुणणं सुरु! Netflixवर होम अलोन, किंवा इतर क्रिसमसवाले पिक्चर पहाताना डोळ्यात येणारी चमक, "मेरी किश्मश!!१" म्हणून जोरात ओरडणं ऐकून वाटतं की अजून लहानच आहे. सगळी मजा, गंमत आवडते, बाकी काही कळत नाही.

आज मात्र गंमत झाली. Netflixवर पाहिलेला Snowman नावाचा २०-२५ मिनिटांचा अ‍ॅनिमेटेड पिक्चर पाहिला आणि लगेच ऑर्डर आली "अजून एकदा लावू?" अजून एकदा बघून, जेवण करून आता जोजो करायची वेळ झाली तर परत "Snowman लावू?". फारच दंगा घातल्यावर फार रात्र झाल्यामुळे आता रट्टा नको असे म्हणत   "शेवटचा"  म्हणून Snowman लावला. पिक्चर संपता संपता बाईंच्या डोळ्यात अगदी पाणी!!! आईला चिकटून "श्नोमॅन श्नोमॅन..." करत जोरजोरात रडणं सुरू. त्या पिक्चरमधे त्या छोट्या मुलाला भेटलेला Snowman, रात्री त्याच्याशी खेळतो, त्याला आपल्या राज्यात घेऊन जातो आणि मग त्याला त्याच्या त्याच्या घरी नेऊन सोडतो. ह्या शेवटामुळेच अगदी रडू फुटत होतं.  आम्ही दोघे एकमेकांकडे बघतोय...

श्नोमॅन   https://www.youtube.com/watch?v=3dYQNAl48E0

नव्या दिशांचा माग दिसे, प्रकाश भवताली..
पंखांमध्ये बळ आले, घेउ द्या भलाली