रविवार, ७ मार्च, २०१०

तात्पर्य काय??

"थंडी कमी होऊ लागलीये नाही ह्या आठवड्यापासुन?"
कालच मनात म्हटलं.. "आता काही याची गरज नाही." आणि हीटर बंद केला.
रात्रीचे १२:३०होऊन गेले होते.
तीन महिने झाले. रोज हीटर चालु ठेवुन झोपतोय. "हीटर" कसला? "सुर्यच" तो. हा पहा: -

हा "रात्रीचा सुर्य" (दिवे बंद करुन)


हा "दिवसाचा सुर्य" (दिवे लावुन)


तर "सुर्य" बंद केला आणि गादीवर पडलो.
बरेच दिवसांपुर्वी आश्यानं ते "आय-फोन" वर "गजराचं घड्याळ लय भारी आलंय.." सांगितलं होतं ते आठवलं.
ऑनलाईन डाउनलोड करुन घेतलं लगेच. (१००येन.)
या घड्याळाची बरीच काही खासियत आहे.
ते आपली झोप मॉनिटर करतं...
म्हणजे बघा, आपण शांत निद्रा घेतली की स्वप्नामधे खेळत बसलो, हे आपल्या हालचालीवरुन त्याला कळतं म्हणे.. आणि याचा उपयोग करुन ते सकाळी आपल्याला अशा वेळी उठवतं की जेव्हा उठणं आपल्या एकंदर दिवसासाठी उत्तम असतं.... मला तर आयडीया आवडली! म्हणुनच तर घेतलं.

सकाळी ६:३० चा गजर केला आणि ताणुन दिली.
६:३० ला घड्याळ उठेल. "गजर" करेल.
त्याला "स्नुझ" करत "०७:०० पर्यंत उठु.." असा विचार होता....

सकाळी ६ लाच गजर उठला. ही काय भानगड?
अजुन जरा वेळ पडु म्हटलं.. पडल्या पडल्या लोळत राहिलो.
डोळे मिटुन पडुन राहिलं की झोप येते म्हणे... ७ ला उठु, ठरल्याप्रमाणे..
डायरेक्ट ०८:३०! खोली बेक्कार थंड पडली होती.
रात्री "सुर्य" चालु असता, तर गरम होऊन जाग आली असती नेहेमीप्रमाणे...
आत्ता आजुबाजुला बघितलं तर सर्वत्र "उजेड" पडला होता. माझ्या "तेजाचा उजेड."
काल रात्री जे "अकलेचे तारे" तोडले होते, त्याचाच हा "उजेड" होता.

ताडकन उठलो. खोलीतुन बाहेर आलो, तर रुममेट भाऊसाहेब अंग विसळायला गेले होते.
"भावा??" मी विचारलं..
"१०" तो म्हणाला.
याचा अर्थ अजुन "२०"मिनीटं बाकी आहेत.
रोज अर्धा-अर्धा तास काय अंघोळ करतो माणुस मला कळत नाही...

आता प्रसंग मोठा "बाका" आला होता.
पण "जो डर गया, समझो मर गया"... गब्बरच्या पवित्र स्मृतीचं स्मरण झालं.
पण गब्बरचा आणि आंघोळीचा काय संबंध?
"शोले" वरुन तरी असं काही वाटत नाही.... पण ते जाऊदे..

भानावर आलो आणि घाईघाईत फडताळात शोधु लागलो.
आय्ला.. पण इथं जपानमधे कुठलं आलंय फडताळ?
मग बॉक्स शोधले. भाऊसाहेबाला विचारलं.
कुठेही मिळाली नाही: - "अंघोळीची गोळी"
तोही मार्ग बंद झाला मग.

गोळीच कशाला हवी? कॅप्सुलही चालते. पण तीही नव्हती.
मग मला लिक्वीड औषध आठवलं....
बरोब्बर! आजकाल तो "डिओ स्प्रे!" म्हणुन फेमस आहे.

"डिओ स्प्रे" तर मिळाला. पण गणित काही केल्या सुटेना..
'एका सामान्य माणसाला एका वेळच्या आंघोळीला १२ लिटर पाणी लागते.
त्याच सामान्य माणसाला तेवढ्याच आंघोळीच्या बदल्यात किती लिटर "डिओ" वापरावा लागेल?? '
जाउदे. गणित कच्चंच आहे आपलं...

फटाफट कपडे बदलले. थोडंफार आवरलं..
तेवढ्यात भाऊसाहेब बाहेर आले.
माझ्याकडे बघत म्हणाले, "काय?"
"काय?" मीही म्हटलं.
"आंघोळ झाली वाटतं" .. भाऊसाहेब.
"नाही. कशी होईल??" मी.
"पण रोजच्यात आणि आत्तामधे काही फरक वाटत नाहीये..." भाऊसाहेब...

सकाळी सकाळी भाऊसाहेबांनी "मस्त घाणघाण शिव्या" मिळवल्या.
भाऊसाहेब तोंड वाकडं करत परत आंघोळीला गेले..
मी बाहेर पडलो.
मग धावतपळत स्टेशनवर पोहोचलो.
ट्रेन आलेली दिसत होती म्हणुन अजुन जोरात पळत आत चढलो.
मी आत शिरलो आणि ट्रेन निघालीच.

आत आलो.
फार हलकं हलकं वाटत होतं. फार म्हणजे फारच.
कसला तरी फा-र मोठा भार हलका झालाय असं वाटत होतं...
सहज खिसा बघितला..
बरोबर. "पाकिट" विसरलो होतो.

"खिशात पाकिट नाही!" म्हणताच पहिला विचार मनात आला, तो "जपानी पोलिसांचा"...
इथल्या पोलिसांना फार हौस आहे शायनिंग मारायची.
ते काय करतात, स्टेशनच्या बाहेर दडुन उभे रहातात आणि आपण दिसलो की हॉलीवूड चित्रपटांसारखं एकदम समोर येऊन, "एस्क्युज मी प्री-ज. दीस इज जापान पोरीस. मे आइ शी युवा पासुपो-तो?"
तेही आपला "बॅज" फ्लॅश करत. फुल्ल "हाय, धीस इज एन. वाय. पी. डी." टाईप...
जणु काय मी यांच्या देशात गुन्हे करायलाच आलोय..

पण आज ती भिती नव्हती. "सुट" मधे असलो की सहसा पोलिस विचारत नाहीत असा अनुभव आहे.
त्यामुळे जरा बरी परिस्थिती होती...
*कोणाचंही लगिन नव्हतं. इथे उगाचच रोज सुटमधे हापिसात जायचं असतं...

बाकी सोडा. पण हे पाकिट विसरणं ओळखीचं का वाटावं?
मला ते "पिछले जनम मे..." टाइप चित्रपट आठवायला लागले.
पण नाही. मागच्याच महिन्यात हे केलं होतं.
"हट" स्वत:वरच चिडत म्हणालो....

ट्रेनमधे शिरलो खरा.. पण बसायला जागा नव्हती.
सगळीकडे नजर टाकली.
तिथे कोपर्‍यात जरा गर्दी कमी होती म्हणुन तिकडे गेलो.
तीन जणांची सीट होती. २ मुली आणि एक मुलगा बसला होता.
त्यांच्या समोरच्या मोकळ्या जागेमधे जाऊन उभा राहिलो.

...आणि अचानक तिघेही उठले. मी दचकलोच!
पोरीनं अचानक डोळ्यात औषधच घातलं..
दुसरी पोरगीही उठली. तिनं एकदम लिपस्टीक काढली आणि ओठाना लावायला लागली.
पोरानंही बॅगेतुन "लिपस्टीक" का "मुव्ह" का "क्रॅक गार्ड".. "नाही "लिप गार्ड" बाहेर काढलं..
आणि ओठाला लावलं.
आपापल्या...
तिघेही झोपेतुन उठले होते...
पण झोपेतुन उठल्यावर माणुस असं काही करतो??

मी बाजुला सरकुन उभा राहिलो. तेवढ्यात परत ते पाकिट पुराण आठवलंच
पण आज बरोबर "पास्मो" होतं. (पास्मो म्हणजे ट्रेन च्या प्रवासात वापरायचे कार्ड.
हे रिचार्ज करता येतं. ठराविक दुकानात त्यावर खरेदीही करता येते...)
"त्यात पैसेही आहेत. म्हणजे जेवायचे वांदे नाहीत." मनात म्हटलं आणि मनापासुन खुश झालो.
सकाळी सकाळी जेवण दिसु लागलं.
"बरोबरचे जपानी लोक आग्रह करुन करुन त्या "करी शॉप" मधे घेऊन जातायत.." मला जायचं नसतानाही.
"डुक्कर खात नाही हा तो.." आपापसात माझ्याबद्दल कॉमेंटरी....
मीही मग "डुक्कर बाजुला करुन" करी-भात पोटात सारु लागलो..

तेवढ्यात स्टेशन आलं.
घाईघाईत ट्रेनमधुन बाहेर पडलो.
दुसर्‍या ट्रेनमधे चढायचं होतं.
मी चढलो खरा, पण एकजण अचानक उतरायला लागला.
त्याचा धक्का लागला. मी आत चढलो मात्र....
अचानक हातातलं पास्मो गळुन ट्रॅकवर पडलं...

तसाच बाहेर पडलो.....
आता कसली "करी", कसलं डुक्कर आणि कसलं काय.....
मी डुकराला खाली ठेवत त्या स्टेशन मास्तरला विचारलं..
"काय हो मास्तर? माझं 'पास्मो' रुळावर पडलंय.
मी पटकन खाली जाउन ते घेऊ का??"
त्यानं "डोक्यावर पडलाय का साहेब" अशा दृष्टीनं माझ्याकडं पाहिलं.

"साहेब... आज आंघोळ न करता आलाय काय? " मास्तर.
"काय?" मी.
"नाही हो, म्हणजे... असं कसं पडावं??" मास्तर हसत म्हणाला.

मी त्याला एक चाम्पाडित लावणार होतो पण...
"थांबा साहेब. म्हणत त्यानं खिशातुन एक दोरी काढली. त्याला मागे एक बटण होतं.
ते दाबताच त्याची काठी झाली. त्याचं पुढचं टोक "चिकट" होतं का काय माहित?"
त्याला चिकटुन "पास्मो" बाहेर आलं.
मास्तराकडं बघुन मी "जय जपान" म्हणालो, आणि डुकराला कडेवर घेतलं
आणि पुढच्या ट्रेनची वाट पाहु लागलो.

पण "पास्मो" मिळालं नसतं तर?
"जपान्यांकडुन उधार घेतले असते!!! "
नाही! ते शक्य नाही.. मला ती "पिझ्झा-कथा" आठवली..
मागच्याच वर्षी मी एकदा घरी पिझ्झा ऑर्डर केला होता.
भाऊसाहेब(रुममेट) म्हणाले होते, "मी येतो १० मिनीटात."
नेहेमी पिझ्झावाले ३० मिनिटं लावतात. त्या दिवशी नेमका पिझ्झा-वाला हिरो २०व्या मिनीटाला हजर.
आणि भाऊसाहेब अजुन आले नव्हते..
भाऊसाहेबांची आठवण इतक्याकरता, की माझ्याकडे पिझ्झावाल्याला द्यायला पैसे नव्हते..

"जरा थांबा हं" त्या पिझ्झ्याला बोलुन मी दार लावलं होत. साहेबांना फोन लावला. लागला नाहीच.
सारं घर शोधुन झालं. अडचणीला म्हणुन ठेवलेले असे पैसे कुठेही सापडले नाहीत.
बरोबरच आहे. ठेवले तर सापडणार.
आता परिक्षा आली. चांगले मार्क पडावे वाटतात. पण अभ्यास केला तर ना?
इतकी वर्ष शाळेत गेलो. तरी नाही कळलं. आज काय उजेड पडणार होता अजुन?(एक पाडला आहे म्हणा आज)
शेवटी पाकिटात असलेली ती दोन हजार येनची 'दुर्मिळ नोट' त्याला दिली.

पैसे घेउन तो वळला. आणि मागे "भाऊसाहेब!"
"अरे. मी इथेच होतो. इथल्या इथे कशाला पैसे वाया म्हणुन फोन उचलला नाही." हसत भाऊसाहेब.
"लेका, आपल्याला स्किममधे फुकट कॉलिंग आहे!" मी..
"आयला विसरलोच. सॉरी हं....." भाऊसाहेब...
आणि मी हे गम्मत म्हणुन त्या जपान्यांना सांगितलं..
अजुनही ते मला पिझ्झाबॉय म्हणुन चिडवतात...
त्यामुळं त्यांना पैसे मागणं अशक्यच झालं असतं..

असो. दिवस सारा कामात गेला.
पास्मोमधे बरोब्बर १००० येन होते.
सकाळापासुन रात्री घरी येईपर्यंत पुरले.
त्यात "१०" येन उरवुनच घरी यायला निघालो.
"यही होता है मुनाफ... इसे कहते है बिजनस.." ......... "गुरुभाईला" प्रणाम केला.
"उर" भरुन आलं होतं. ते "पास्मो" उराजवळच्या खिशात ठेवायला गेलो, तर तिथे सुटाच्या आतल्या खिशात पाकिट! काल रात्री यायला थोडा उशीर झाला तेव्हा गर्दी होती.
म्हणुनच पाकिट वरच्या खिशात ठेवलं होतं..
मग नकळतच डोक्याला हात लावला गेला.

स्टेशनमधुन बाहेर आलो. हलका पाऊस पडत होता.
थंडी वाजु लागली होती.. दुकानात एक चहा घेतला.
चहा घेत घेत घरी आलो.

सकाळपासुन जे काही झालं त्याचा विचार चालु केला.
कारण सगळी गोष्ट तर झाली, पण "तात्पर्य" पाहिजे ना?
लहानपणी एक पुस्तक वाचलं होतं. "लहान मुलांसाठी गोष्टी"
त्याचे चार भाग होते. एकुण १००कथा.
आणि प्रत्येकात काहीतरी "तात्पर्य"!
त्याला स्मरणं आलं..

तर.. हां...
अ) रात्री "सुर्य" बंद केला.
ब) नवीन घड्याळावर जास्ती विसंबुन राहिलो.
ब-१)पर्यायी घड्याळाची सोय केली नाही
ब-२) उशीरा उठलो.
क) "पास्मो" पाडलं..
ड) "पाकिट आहे" हे विसरलो.
आणि हो! इ) आंघोळ केली नाही.

आता, अ) पासुन ड) पर्यंतच्या गोष्टी, ह्या मी इ) केलं काय आणि नाही केलं काय?
काही फरक पडणार होता काय? नाही. जे व्हायचं ते होणारच...
आजच्या गोष्टीचं 'वैशिष्ट्य' काय, तर "करुन न करुन काही फायदा नाही", अशी एक गोष्ट आज नव्यानं समजली होती..
"तात्पर्य" काय?
"उद्यापासुन आंघोळ बंद!" :)