शनिवार, २ जानेवारी, २०१०

रेइको लॉज (रहस्यकथा)

रात्री कंपनीतून निघताना अमितच्या मनात गुदगुल्या होऊ लागल्या होत्या..
पण लगेचच "आज लवकर येतो" सांगुन आपण "दुसर्‍या दिवशी रात्री घरी यायला निघालो आहे!" हे आठवुन वैतागच आला... "झक मारली आणि आय टी मधे आलो.." परत मनात तोच विचार आला... "बायकोचा भांगडा आहे परत आज!", मनात म्हटला आणि त्याचं त्यालाच हसु आलं.... समोरचे जपानी, हातातले मोबाईल बाजुला ठेवुन त्याच्याकडे पाहु लागले.. अमितला मात्र त्या ड्रायव्हरला, "रे ड्रायव्हरा, लेका तुझी ट्रेन जरा जोरात पळव साल्या.." वगैरे म्हणायचं होतं, पण मुळात ती ट्रेन! त्यातुन ड्रायव्हर जपानी! तो कुठला नियम तोडायला? सोडा..

"उद्या सकाळी सकाळी बर्फात फिरायला घेऊन जातो" वगैरे प्रॉमिस करुन आला होता, पण त्याला असा उशीर झाल्याने "ते काही आता खरे नाही.. न्यु ईयर ला घरीच...." असंच मानसी समजून चालत होती. त्याला काहीही बोलायचं नाही असं ठरवून पुस्तक वाचणं चालू होतं... उगाच आपण काहीतरी बोलतो आणि नंतर हा सगळ्यांना "भांगडा केला" वगैरे काहीही सांगतो..." त्याचे मित्रही तसलेच.. नंतर किती दिवस आपण गिर्‍हाईक होऊन बसतो... "अजिबात बोलायचं नाही!"

तेवढ्यात लॅचचा आवाज आला.. धावत पळत अमित आत आला... गुलाबाचा बुके हातात घेऊन म्हणाला, "हॅप्पी अ‍ॅनिव्हर्सरी डार्लिंग!!!" "सॉरी!" "म्हणजे, मी कालच येणार होतो. काल होती अ‍ॅनिव्हर्सरी.. "पण डिलिव्हरी इतकी खराब झाली की..." "रिअली सॉरी.." "आणि पॅकिंग केलं आहेस नव्हे??"

"काय?" मानसी जवळजवळ ओरडलीच!
"मला वाटलं नेहेमी प्रमाणे कॅन्सल!", ती म्हणाली...
"नही डार्लिंग!" अमित म्हणाला, "ये अ‍ॅनिव्हर्सरी की बात है! फर्स्ट अ‍ॅनिव्हर्सरी मुबारक हो!"
"राहुदे हिंदी!" हसत मानसी म्हणाली, "पण पॅकिंग कुठे केलंय?"
"जमेल तेवढं करुया. उरलेलं घेऊ विकत... "स्कीईन्गचे कीट" तिकडेच "रेन्टल"वर मिळेल... अमित.

गेली तीन वर्षं जपानमधे असल्यानं, प्रत्येक "न्यू ईयर" ला "बर्फात कुठेतरी" फिरण्याचा त्याने आणि त्याच्या ग्रुपमधल्या लोकांनी पायंडाच पाडला होता... तिन्ही वर्षं हे सगळे लोक जवळच्याच "निईगाता" किंवा "नागानो" प्रिफेक्चरच्या डोंगरात जात असत. सगळे आय टी वाले लोक असल्याने "शेड्युल्स टाईट"! त्यामुळे रिझर्व्हेशन्स वगैरे ऐन वेळीच होत असत..

ग्रुप मधले इतर सगळे लोक "कंपनी आहे!", "इंडिया ट्रीप" अशा काही ना काही कारणाने यंदा येऊ शकणार नव्हते त्यामुळे अमित आणि मानसी असे दोघेच निघणार होते.. अशीही "अ‍ॅनिव्हर्सरी" असल्याने बाकी लोक नाहीत याचं अमितला बरंच वाटलं होतं....

"ट्रेन बुकींगचं काय पण? ते कसं करणार?" या मानसीच्या प्रश्नाला "जानी... जिनके पास गाडी होती है, वो ट्रेन से नही जाते.. " असा डायलॉग त्यानं मारला. "म्हणजे? गाडी घेतलीस?" मानसी..
"नाही गं.. एवढं कुठलं आलंय??" वैतागत अमित म्हणाला..
"रेन्ट करायची..." "आपले आपण फ्रीली ड्राईव्ह करत असलो की बरं नाही का?"
"बरोब्बर शरलॉक.." "जेवा आता. सकाळी बर्फात जायचंय..." मानसी हसत म्हणाली....

दोघेही टोक्यो पासुन ठरल्याप्रमाणे सकाळी ६:३० ला निघाले.. "जनरल लोक ४ तासात पोचतात.. आपण २.५ तासात तरी पोचायला हवं.." मानसीकडे बघत अमित म्हणाला... "मी तुला 'शरलॉक' म्हटलं, 'शुमाकर' नाही!" मानसी म्हणाली आणि अमितपण जोरात हसु लागला.....

या वेळीही "नीईगाता प्रिफेक्चर" मधेच जायचं होतं. रात्री आल्यानंतर अमितने ईन्टरनेटवर लॉज शोधले पण कुठेही जागा शिल्लक नव्हती... एकच ठिकाण होतं, पण तिथे 'रिझर्वेशन सिस्टीम' नव्हती, त्यामुळे काही कळत नव्हतं.. "मिळेल अगं जागा... मागे आम्ही 'निक्को'ला गेलो होतो तेव्हाही असेच गेलो होतो आणि इतकी मस्त जागा मिळाली बघ..." अमित मानसीला म्हणत होता...
......
"'निक्को'लापण जाउया गं.." आधी हे तर होऊ दे... वैतागत अमित म्हणाला आणि नंतर स्वतःही मानसीबरोबर हसु लागला होता...
काहीतरी शोधत असताना काही विचारलं की चिडण्याची त्याची सवय माहीत झाल्यापासुन बरेचदा मानसीही त्याला चिडवत असे...

जागेचं नाव होतं "आकाकुरा".. अमितने शोधल्याप्रमाणे "चार-साडेचार" तास लागणार होते.. रस्ता
शोधणे वगैरे प्रकार नव्हताच, "थँक्स टू जी. पी. एस. सिस्टीम"!! त्यामुळे दोघेही निवांत होते... दोन-एक तास झाल्यावर थोडा थोडा बर्फ दिसु लागला आणि मानसी म्हणाली, "जरा थांबव ना गाडी.. पाच-दहा मिनीटं थांबु, चहा वगैरे घेऊ आणि निघु परत... मला चहा हवा आहे.. "
त्यावर, "अगं पण!" म्हणता म्हणता थांबुन, "बरं, पुढच्या मोठ्या हायवे हॉटेलवर थांबवतो", अमित म्हणाला....
आपला जपानमधे ड्रायव्हींगचा पहिलाच अनुभव असल्याने, दर थोड्या थोड्या वेळाने ती आपल्याला थांबवते आहे हे त्याला समजलं होतं..

चहा झाला... दोघं परत गाडीत बसले..
"इथुन पुढे फार बर्फ पडतो आहे", "हे बघ 'जी. पी. एस.' " अमित म्हणाला..
"मी बघुन काय करु? मला कुठे तुझं जपानी येतं?" असं मानसीनं म्हटल्यावर,
"अगं, चित्रं तर समजतात ना??" अमित परत वैतागला...
"बर!"
या "बर!" चा मात्र अमितला अतिशय चांगला अनुभव असल्याने लगेच
"सॉरी! चुकलो! " वगैरे रडणं, गयावया करणं चालु केलं ....

अर्ध्या तासातच "जी. पी. एस." गुरुजींचं भाकित खरं ठरेल अशी चिन्हं दिसु लागली... समोरुन येणारी वाहनं, टपावर "एकेक फुटाचा बर्फ" घेऊन येताना दिसायला लागली.. अमित, मानसी, दोघांनीही एकमेकांकडे बघितलं.. "घाबरलीस??" परत चिडवत अमित म्हणाला.. " किमान बर्फाला तरी मी घाबरत नाही.. "डिस्ट्रीक्ट लेवल स्कीईंग चँपीयन होते मी..." "बघुया आज कोण किती फास्ट आणि स्मुथ स्कीईंग करतो ते.." मानसी म्हणाली...

"आणि भुत आलं तर??" अमित म्हणाला..
"तु आहेस की... म्हणजे, भुताला घाबरवायला..." हसत मानसी म्हणाली..
"बर बर..", अमित.
मानसीला भुतांच्या गोष्टी, भुतांचे चित्रपट वगैरे फार आवडतात, पण नंतर एकटी असताना घाबरते यावरून तो सतत तिला चिडवत असे.. त्यातलाच हा पुढचा अध्याय होता...

थोडा वेळ गेला, आणि "जी. पी. एस." चा सिग्नल थोडा वीक होऊ लागला आहे, असं अमितला जाणवलं..
"काय त्रास आहे?", "एक तर इतका बर्फ पडतोय.. त्यात हा सिग्नल वीक..." "पण मानसी, इतका बर्फ पडत नाही या दिवसात... "मिड जॅन", किंवा "फेब स्टार्ट" ला पडतो.. आत्ता पडणं म्हणजे झेत्ताई ओकाशीई आहे... आय मीन 'वेरी स्ट्रेंज' यु सी... ", अमित म्हणाला...

पुढच्याच वळणावर गाड्यांची मोठी रांग पाहुन अमितच्या कपाळावर आठ्या पडल्या..
"हे काय आता?" , मानसी..
"मला काय माहित? मी पण आताच आलो आहे ना?" आता मात्र अमित खरंच चिडला होता...
तेवढ्यात एक पोलिस शेजारी आला...
"ओहायो~ गोझाईमास. नानिका आरिमाश्ता का?" ("गुड मॉर्निंग. काही प्रॉब्लेम आहे का?"), अमित म्हणाला...
"चोत्तो जिको गा आत्तानो देस केदो..."(एक अ‍ॅक्सिडँट झाला आहे..") पोलिस म्हणाला..
"एनी कॅज्युल्टीज??", अमितने पोलिसाला विचारलं..
"हो.. दोन.." "तुम्ही उजवीकडुन जा, रस्ता थोडा मोकळा करतो आहोत आम्ही.. तसदीबद्दल क्षमा करा..."
तेवढ्यात गाडी नेमकी अपघाताच्या अगदी जवळच थांबली. एक सेकंदच... नेमकी मानसीच्या डाव्या बाजुलाच ती जागा होती.. अमित "एक सेकंद" थांबुन तिथे डोकावुन पाहतो आहे हे दिसल्यावर तिनेही पाहण्याचा प्रयत्न केला पण त्या बर्फावर पडलेले रक्ताचे डाग दिसताच, "अमित!!", ती ओरडली.. तिच्या ओरडण्याने भानावर येऊन लगेच अमित गाडी चालवण्याकडे लक्ष देऊ लागला..


अपघाताचं वर्णन, कॅज्युल्टीज आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणावरुन जाणे या सगळ्यामुळे मानसीच्या चेहेर्‍यावरचा रंग चांगलाच उडाला होता... अमितने भुताचा विषय काढुन आधिच थोडा मूड ऑफ केला होता, त्यात हे..
कधी एकदा ते होटेल, ते "रेइको लॉज" येईल याचीच ती वाट बघत होती...

"रेइको लॉज"! खरं तर इथेही बुकींग वगैरे काही झालं नव्हतं, पण दोघांच्याही मते हे एकदम "बेस्ट चॉईस" होतं... कारण म्हणजे हे काही "चेन ऑफ हॉटेल्स" पैकी एक नव्हतं.. त्यामुळे ते टिपीकल "प्लास्टिक स्माईल्स" नसतील असं दोघांचंही मत होतं... अमितच्या भाषेत, " जोपर्यंत 'ईनाका' ( खेडं ) मधे जात नाही ना आपण तोपर्यंत खर्‍या खुर्‍या जपानची ओळखच पटत नाही बघ..." एरवी अमितला जपानमधल्या भारी भारी गोष्टींची फार हौस असली तरी त्याच्या मते, "संस्कृती" चा प्रश्न आला, की "ईनाका" ला पर्याय नव्हता... तिलाही उगाचच "हाय क्लास" हॉटेलचं आकर्षण नव्हतं. त्यातुन हे एक छोटं हॉटेल. "फार लोक नसतील..." त्यांना वाटलं..
"नावावरुन म्हातारा म्हातारीचं असावं", अमित म्हणाला होता, "कारण रेईको हे मुलीचं नाव असतं आणि ते बर्‍याच जुन्या काळात होतं.. आजकाल असली नावं नसतात असं आमच्या कंपनीतला जपानी म्हणत होता..."
"आणि आम्ही दर वेळी गेलो की असेच कोणीतरी म्हातारा म्हातारी असतात, आणि मजा येते अगं.. त्यांना भारताचं आकर्षण असतं... आपलं खुप कौतुक करतात का नाही बघ... " अमित म्हणाला होता..
म्हणुन "रेइको".


"अजुन 'अर्धा पाऊण' तास.. फार तर 'एक'. आणि मग पोचु आपण..." 'जी. पी. एस.'कडे बघत अमित म्हणाला.. ते 'जी. पी. एस.' आता शेवटच्या घटका मोजु लागलं होतं.. धुसर काहीतरी दिसत होतं...
अपघात झालेल्या ठिकाणापासुन बर्फाचा जोर मात्र वाढतच चालला होता.. मानसीला त्याला थांबवायचं होतं पण लवकरात लवकर हॉटेलमधे पोहोचायचंही होतं.. कधी एकदा ते हॉटेल येईल याचीच ती वाट पहात होती...


जी पी एस ने अगदीच काही दगा दिला नाही आणि दोघे पाऊण तासातच पोहोचले. "हॉटेल रेइको" चा बोर्ड सर्वात आधी दिसला आणि गाडी त्या वळणावर निघाली... रस्ता बराच निर्जन होता.. अजुन पंधरा वीस मिनीटे गाडी चालवल्यावर शेवटी एकदाची गाडी इष्ट स्थळावर येऊन पोहोचली...


"रेइको लॉज." बाहेरुन बघता तसा बरा होताअ... एखाद्या घरासारखाच.. पण बाहेर काही गाड्या वगैरे दिसत नव्हत्या.. थोडं साशंक अवस्थेतच अमित उतरला आणि लॉजमधे घुसायला लागला... मागोमाग मानसीदेखिल आलीच. तिला गाडीत एकटं काही बसवत नव्हतं..

" आह! ओक्याकुसामा!" "ना-न दा!?", रेइको लॉज चा मालक उद्गारला., " अरे! कस्टमर्स!" "असे न कळवता?" "हाई हाई, दो-झो..", "या. बसा....चहा आणतो.. बाहेर फार थंडी असेल.. " वगैरे, आत जाता जाता तो म्हणाला..


"अरे! तरण्याचं दिसतंय हॉटेल.. अंदाज थोडा चुकलाच..", तो आत गेल्यावर अमित म्हणाला, "पण 'आदरातिथ्य' बघितलंस ना?"

तेवढ्यात मालक 'चहा' घेऊन परतला.. गरम गरम 'जपानी ग्रीन टी' बघुन अमित तर खुष झालाच पण मानसीनेही अगदी हसत 'आरिगातो', 'धन्यवाद' म्हणत तो हातात घेतला.. एरवी तिला तो कधीही चालला नसता पण या वेळी आणि अशा थंडीत त्याला पर्याय नव्हता...

दरम्यान अमितने मालकापाशी "माफ करा, न कळवता आलो. पण तुमचा फोन बंद होता, आणि बाकी रिझर्वेशन्सही मिळेनात.. आणि खरं सांगायचं तर आम्हाला तुमचं हॉटेल जास्ती आवडलं म्हणुन कसंही करुन इथेच नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा करायचा म्हणुन इथे आलो आहे. त्यातुन अगदीच शक्य नसेल तर आम्ही फक्त थोडा वेळ इथे थांबतो. जरा बर्फ कमी झाला की निघु." असं बोलणं चालु केलं होतं...

"इइए इइए...ओक्याकुसामा...", "नाही नाही साहेब.." "तुम्ही इतक्या लांबुन आला आहात, आणि बाहेर इतके घाण हवामान... तुमची काही खास सोय करता येणार नाही आता ऐन वे़ळी पण आम्ही जे काही खाणार असु, त्यातलेच तुम्हीही खाणार असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही... रुम्स तर आहेतच... ", मालक.
अमित थोडा हसु लागलेला पाहुन काहीतरी पॉजिटीव आहे एवढं मानसीनं ओळखलं होतं.

"ओके देस!" ओनेगाई शिमा-स.", "चालेल. आम्ही चेक इन करतो मग आत्ताच. ", अमित म्हणाला...
"आणि तुमच्या इथे 'स्कीईंग रीझॉर्ट' आहे का जवळ? आम्हाला स्कीईंग करायचं आहे."
"हो.", मालक म्हणाला, "गाडीने २० मिनीटे लागतील.. मीच सोडलं असतं, पण मला मागच्या महिन्यातच एक छोटा अ‍ॅक्सिडँट झाल्याने मी बाहेर जात नाही आहे सध्या.. त्यामुळेच या वर्षी हॉटेल मधे बुकिंग्स पण घेतली नाही आहेत. "
"ओह, आय सी.", अमित म्हणाला..
"म्हणुनच आत्ता माझी 'रेइको चान' (मुलगी) आणि 'योमेसान' (पत्नी) काही खरेदी करायला बाहेर गेले आहेत.. आत्ता मी आणि आमची हेल्पर मुलगी दोघेच आहोत घरात. पण अजुन दोन एक तासात ते येतीलच, मग संध्याकाळी जेवण वगैरे करुच." मालक, "तुमचे 'स्कीईंग कीट' आहे ना??"
"अ‍ॅक्चुअली, आम्ही रेंटल घेणार होतो..." अमित म्हणाला.
"ओह.. कोमात्ता ना...", 'अरे.. आता काय करायचं??' आमच्याकडे आमचं पर्सनल कीट आहे, पण तेवढंच.. रेंटल मिळेल, पण..." "एनीवे.. आमचंच घेऊन जा.. ते ठेऊन तरी काय करु? या वर्षी स्कीईंग नाही करु शकणार आम्ही... माझे आणि माझ्या बायकोचे ड्रेस आहेत. तेच घ्या... " मालक हसत म्हणाला, "सगळे मिळुन तीन मान येन (३०००० येन) इतके पैसे द्या, म्हणजे झालं...
"चालेल.. आम्ही फ्रेश होतो आणि निघतो... दोन एक तासात येऊ बहुतेक.. बाहेरुनच खाऊन येऊ.." पैसे देत अमित म्हणाला...


"ओके.", "तिथे खाली जा. उजवीकडे दिव्याचे बटण आहे. दिवा लावुन तिथले स्कीईंग कीट घ्या.. रुम वरच्या मजल्यावर आहे.. ही किल्ली.", मालक.


"तु ते कीट आण, मी रुम आवरते.. दे किल्ली.. " मानसी म्हणाली.
"बर. नीट आवर. नेहेमीसारखं नको.", गरम गरम ग्रीन टी पोटात गेल्यावर अमितला परत जोक्स सुचायला लागले होते..
"बर.." मानसी म्हणाली...
सॉरी वगैरे ओघानं आलंच...


अमित 'स्कीईंग कीट' च्या रुम कडे गेला.. अडगळीची खोलीच होती जवळ जवळ....अंधुक प्रकाश होताच, पण नीट दिसावं म्हणुन त्यानं लाईट लावला. आणि एकदम दचकला... लाईट शेजारीच एक स्त्री काहीतरी शोधत होती.. लाईट लागताच तिने वळुन पाहिलं... "बिक्कुरी शिता..", अर्थात "दचकलोच!" अमित तिला म्हणाला.. "हाच शोधत होतो.. " तिच्या हातातला 'स्कीईंग ड्रेस' बघुन तो म्हणाला. तिनं मानेनंच नकार देत त्यावरची पकड घट्ट केली.. बहुतेक हीच ती 'हेल्पर मुलगी' होती... आता मात्र जपानीमधे स्वत:चं थोडं इण्ट्रॉड्क्शन करुन, आपण कस्टमर आहोत वगैरे त्यानं सांगितलं... ड्रेस बद्दल 'मालकाशी' बोलणं झालं आहे हेही सांगितलं... मग तिनं पकड हलकी केली आणि ती निघुन गेली... तिथले दोन्ही ड्रेस आणि कीट घेऊन तो वर आला.. "कीट" जड असल्याने दोन खेपा कराव्या लागल्या.. जिना अरुंद असल्याने चढायला वेळ आणि त्रास जास्ती होत होता...


दरम्यान मानसीही रुम मधे पोहोचली होती... रुम उघडुन आत जायचं होतं, पण आत कोंदट वास येत होता..
एकदोन मिनीट ती बाहेरच उभी राहीली. जरा तो वास कमी झाल्यावर आत गेली. अमितही आलाच तेवढ्यात.. तो दार बंद करु लागल्यावर "दार उघडंच ठेव, कोंदट वास येत नाहीये का? तो कमी होईल म्हणुन म्हटलं.." मानसी.

"तु जा, फ्रेश हो, मी आवरुन नंतर जाते", ती म्हणाली, आणि अमित बाथरुममधे गेला. बेडशीट खरं तर ठिकठाक होतं, पण उगाचच तिनं परत ते नीट केलं. "चला.." म्हणुन ती बेडवर बसली आणि तिचं लक्ष दारातुन डोकावणार्‍या त्या मुलीकडं गेलं.... अचानक तिला बघुन मानसी क्षणभर दचकली पण लगेच तिला लक्षात आलं, अरे याच तर त्या "रेइको" मॅडम असतील. "कसली गोंडस आहे.. रेइको... रेइको चान..", मानसी म्हणाली. ती मुलगीही हसली. आपल्याला जपानी येत नाही याचा तिला फार राग आला या क्षणाला...
पण तेवढ्यात ती मुलगी दार लोटुन निघुन गेली आणि मानसी परत आपण शिकलेलं थोडंफार जपानी आठवु लागली. पण कंटाळा आला आणि तिनं नाद सोडला... "या वर्षी पुन्हा प्रयत्न करुया!", ती मनात म्हणाली...


दोघांचं आवरुन झालं आणि स्कीईंगला जायला ते तयार झाले... बरोबर असलेलं थोडं खाण्याचं खाऊन घेतलेलं असल्याने २-३ तास तरी भुक लागायचं काही कारण नव्हतं... मालकाला "इत्ते किमा-स", "जाऊन येतो" म्हणुन अमितने गाडी काढली... "स्कीईंग रिझॉर्ट" चा पत्ता "जी. पी. एस" सिस्टीम मधे फीड केला.
"आज बर्फ फार जास्ती आहे. जरा सांभाळुन.." मालक म्हणाला होता..
त्यावर "अहो, माझी बायको डिस्ट्रिक्ट लेवल स्कीईंग चँपियन आहे. डोण्ट वरी.. " अमितनेही सांगितले होते...


"स्कीईंग रिझॉर्ट" वर पोहोचल्यावर मात्र मानसी एकदम खुश झाली. तिथे असलेल्या मोठ्या हॉटेलजवळ हॉल्टींगचा स्पॉट ठरला. "म्हणजे, चुकामुक झाली तर इथे थांब", ती अमितला म्हणाली.. "असं काय?", अमित.
"अब देखो मेरा कमाल", अमितकडे बघत ती म्हणाली आणि अतिशय मोठ्या उतारावरुन स्कीईंग करत जाऊ लागली. अमित आ वासुन बघतच राहिला.. आयला.. वाट लागली.. उगाचच म्हणते वाटत होतं. हारलो आज.."


तीन वर्षं जरी तो नित्य नेमाने स्कीईंग करत असला, तरी "अ‍ॅमेच्युअर लेवल" त्याने "मेंटेंड" ठेवली होती. धडपडत धडपडत त्याचंही स्कीईंग चालु झालं... मानसी एव्हाना उताराच्या एकदम खाली जाउन पोहोचली होती.
स्कीईंग रिझॉर्ट खुप मोठं होतं.. उतारावरुन घसरताना जरी सोपं असलं तरी परत चढताना डोंगरच तो.. म्हणुन तिथे असलेल्या लिफ्ट्स सोयीच्या वाटतात.. या सगळ्याचा ईंग्रजी नकाशा हातात पडल्यानेच मानसी एकटी बाहेर पडली होती. गेले काही महीने जपानमधे राहुनही भाषा येत नाही म्हणुन ती नाराज होती पण इथे आपलं राज्य होतं, "स्कीईंग" आणि अर्थातच भाषाही आपलीच! या संधीचा मनसोक्त फायदा तिला उठवायचा होता..
"सगळ्यात खाली असलेल्या लिफ्ट पर्यंत जाऊन येते की नाही बघ..", तिनं अमितला चॅलेंज दिलं होत्ं..
"बर बर.. येताना तिथला स्टँप मारुन आण त्या मॅपवर.. तरच विश्वास ठेवीन." अमित..


पंधरा मिनीटातच मानसी तीन ट्रेल्स खाली गेली होती.... अजुन दोन लेवल्स होत्या. म्हणजे अजुन "दोन स्टँप" की मग अमितचा चेहरा बघण्यासारखा होईल.. मानसी खुषीत होती... बघता बघता चौथी ट्रेलही संपली आणि शेवटच्या ट्रेल कडे ती जाऊ लागली...


अमित पहिल्या ट्रेलच्या शेवटाजवळ मानसीला शोधत होता. ती कुठेतरी आपली वाट बघत बसली असेल असं त्याला वाटत होतं.. तिथे असलेल्या शेड जवळ किंवा कुठेच ती दिसत मात्र नव्हती. जवळच मेडिकल-हेल्पवाला सेक्शनही होता. तिथेही पाहिलं.. तिथेही नाही..
सगळे जपानी लोक होते.. ट्रेनिंग वाले. लहान मुलेही होती. सगळे एकसारखे कपडे घातलेली.. ग्रुप मधले कोणीही ओळखुन यावे म्हणुन असा "ड्रेस कोड" असतो, अमितला माहिती होतं.. त्यातली ती छोटी छोटी मुलं लिलया स्कीईंग करताना पाहुन अमित मनोमन थोडासा निराशच झाला.. "आपल्याला कधी जमणार असे? "
'मानसी' दुसर्‍या ट्रेल मधे असेल समजुन अमित पुढे जाऊ लागला.

दुसरी ट्रेल लहान होती बहुतेक किंवा थोडी सवय झाली असल्याने असेल कदाचित, अमितने ही ट्रेल लगेचच संपवली. ह्या ट्रेलच्या शेवटापाशीही मानसी नव्हती... अमित थोडासा वैतागला. पण मग "मीही करु शकतो" वगैरे म्हणत तो तिसर्‍या ट्रेल कडे वळला.. तिसरी ट्रेल जास्ती स्लोप वाली होती... त्यातुन, आता बर्फ फार जास्ती पडु लागला होता. त्यामुळे त्याला फारसं स्कीईंग जमेनासं झालं.. आणि पडला की उठता येणंही मुश्किल होऊन बसलं होतं... आत्ता जे तो पडला होता, पाच मिनीटं झाली उठता येईना.. उठला की पुन्हा पडायचा.. परत उठुन परत पडणे. हेच चालू होतं... मधुनच एखादा जपानी दिसायचा पण मग कोणीही नाही..

दहा मिनीटे झाली, हेच चालू होतं पण आता मात्र कोणीही जपानी दिसेना.. त्यानं आजुबाजुला पाहिलं.. सगळीकडे भयाण शांतता पसरली होती. सुरुच्या झाडांसारखी असलेली ती झाडं, आता एकदम निर्जीव भासत होती.. वरुन सतत बर्फ पडत होता.. आजुबाजुला कोणीही नाही...

अमितला "आमिर खानचा 'फना' " आठवला... चुकुन इथेही 'अतिरेकी' आले तर? वगैरे अशक्य गोष्टींचा विचार करुन, स्वतःला थोडं हसवुन, कम्फर्टेबल करायचा प्रयत्न त्याने चालु केला. तेवढ्यात "फट्ट" असा जोरदार आवाज झाला.. अमित वळुन बघायचा प्रयत्न करतो, तोच अजुन जोरात "कड्कड् ", "फट्ट", "कड्कड् ", "फट्ट", असे आवाज झाले. अमित घाबरलाच.

झाडावर बराच बर्फ साठुन राहिला होता तो खाली पडला होता. आणि खाली असलेली दुसरी दोन तीन जुनाट झालेली झाडं त्या ओझ्यानं मोडुन दरीत पडली होती.. कितीही नाही म्हटलं तरी अमित घाबरलाच!
बर्फ जोरात पडत होताच...
"हाई.", 'हुं, हात द्या..', त्या जपानी मुलीने अमितला हात देत म्हटलं... केवढी छोटी मुलगी होती.. आणि ती आपल्याला मदत करतीये बघुन अमितला स्वतःचीच दया आली पण बरंही वाटलं.. तिच्या आधारानं तो उभा राहिलेला पहाताच ती त्याला हात करुन निघुन गेली...
स्कीईंग सोडुन चालतच तो 'तिसर्‍या ट्रेल' च्या शेवटाजवळ पोहोचला..
"आत्ता जरा हॉटेल मधे जाऊ लिफ्ट मधुन आणि मग बर्फ पडायचा जरा कमी झाला की येऊ परत.." त्याने विचार केला. "पण मानसीचं काय?", त्याला काळजी वाटु लागली..


पाचवी ट्रेलही फार लांब होती...
मानसी जोरात ती पार करत होती, पण वरुन पडणार्‍या बर्फाचा तिलाही प्रचंड अडथळा होऊ लागला होता...
चौथ्या ट्रेल नंतर लोक फार कमी झालेले तिच्याही लक्षात आलं होतं. पण दोन लोक मात्र बरोबर होते, त्यामुळे ती निर्धास्त होती.आपल्याला जपानी येत नाही याचं तिला परत वाईट वाटलं...
"तुम्ही फार छान स्कीईंग करता.. इथे नेहेमी इतका प्रचण्ड बर्फ पडतो का? तुम्ही दर वर्षी इथं येता का?" बरंच काही तिला त्यांना विचारायचं होतं पण...


पाचवी ट्रेलही संपली. पुढे सारी घनदाट झाडी होती. वर परतण्यापुर्वी, मानसी त्या झाडीचं निरिक्षण करत बसली... "लिफ्ट मधे बसुन आता वर जावं", तिचा विचार चालु होता. पाचव्या ट्रेलपाशी स्टँप मात्र नव्हता.. ती जरा चिडलीच. "इतकी मी आले आणि पुरावा मात्र नाही... काय त्रास आहे?" तिथे असलेली काही झाडे तिने इतर ट्रेल्स मधे बघितली नव्हती. त्यामुळे त्यातल्याच एका झाडाची काही पानं खिशात कोंबुन ती लिफ्ट मधे बसली...
"ते जपानी कुठे दिसत नाहीत..", तिच्या मनात विचार आला... "आपण झाडं बघत असताना निघुन गेले असतील... जाउदेत..."


लिफ्ट चालु झाली... "आपण भलतेच खोलवर आलो आहोत", मानसीच्या लक्षात आलं. "आकाकुरा"चा डोंगर फारच प्रचंड भासत होता. ".. आणि आपण एकदम पायथ्याशी आहोत.." तिला लक्षात आलं...
"उतरताना का कोण जाणे लक्षात आलं नाही पण आता फारच थंडी आहे ना.." तिनं मफलर आणखी घट्ट करुन घेतला...

"लोंबकळत्या लिफ्टचा आवाज किती विचित्र असतो नाही?" खाली बर्फाकडे बघत ती विचार करत होती. "अरे? हे कोण आहे खाली?" तिने वळुन बघितले, तर ते दोघेजण डोंगर उतरुन खाली चालले होते...
तेवढ्यात "कड् कड् कट्ट" चा आवाज झाला आणि झाडांवरचा बर्फ खाली कोसळला.. मानसीनं डावीकडे पाहिलं.
तेवढ्यात "कड् कड् कट्ट" चा आवाज, आता उजवीकडे झाला.. तिनं तिकडं बघितलं.... अचानक तिला त्या खाली
असलेल्या लोकांची आठवण झाली... त्यांच्या अंगावर तर नाही ना पडलं? पण ती लोकं दिसेनात.. तशी ती घाबरलीच! "लवकर चल लिफ्ट... लवकर.", तिने देवाला प्रार्थना करायला सुरुवात केली..


लिफ्ट मात्र अतिशय संथ चालु होती... सगळ्या सीट्स रिकाम्या होत्या..... लिफ्ट म्हणजे काय, पन्नास एक सीट्स एका मोठ्या मशीनला जोडुन, खालीवर करणार्‍या पालख्या... खालुन वर जाणार्‍या पालख्या भरलेल्या, तर त्याच वरुन खाली येताना रिकाम्या येतात. कारण वरुन खाली येताना सर्वजण स्कीईंग करतच येतात.
लिफ्टमधुन वर पोहोचलो, की उतरायच्या वेळी लिफ्ट्मन आपल्याल उतरायला मदत करतो... अशा लिफ्ट्स...


लिफ्ट चालु आहे अशा अर्थाचा "पी-प.. पी-प.." असा एक आवाज चालु असतो, तो एक आणि घोंगावणार्‍या वार्‍याचा असे दोनच आवाज होते...ती डोळे मिटुनच बसली होती.. पण डोळे मिटुन घेतल्यावरच आणखी भिती वाटु लागली, तसे तिने डोळे उघडले.. आता "पी-प.. पी-प.." चा आवाज वाढु लागला होता.. बहुतेक लिफ्ट पाचव्या ट्रेलच्या जवळ आली असावी तिला वाटलं... परत कसला तरी वेगळाच आवाज झाला आणि पाहते तर काय? "वरुन खाली येणार्‍या लिफ्ट मधे, तेच मगाशी खाली दिसलेले लोक बसले होते. उलट्या दिशेने ते खाली उतरत होते... आणि ते दोघेही मानसीकडेच बघत होते...." मानसी जोरात किंचाळली... "पी-प... पी-प..." चा आवाज अचानक बंद झाला... लिफ्ट जोरात हालली. मानसी परत किंचाळली, आणि आपण लिफ्ट मधुन खाली पडतो आहोत असं तिला वाटलं... आणि ती बर्फात कोसळली... ती उठायचा प्रयत्न करत होती पण जमत नव्हतं.. ती थोडा वेळ तशीच पडुन राहिली. कोणितरी पाठीवरुन हात फिरवुन उठवत आहे, असं वाटलं.. कोणीतरी एक स्त्री तिला उठवत होती.. मानसीला उठवत नव्हतं.. तिला परत ग्लानि आली....


थोड्या वेळाने जाग आली तेव्हा ती स्की रिझॉर्ट च्या हॉटेल मधे होती. शेजारी अमित बसला होता.
बाहेर अंधार पडलेला दिसत होता....
तिला कळेना, काय झालं होतं? काय चालु आहे...
"काही नाही... तुला बरं वाटतंय का?" अमित तिला म्हणाला..
"काय झालं मला??" मानसी...
"तु, चौथ्या ट्रेल च्या शेवटापाशी होतीस..
"हो. मी पाचव्या ट्रेल पर्यंत जाऊन आले.. पण तिथे स्टँप..."
तिनं असं म्हणताच अमितनं डॉक्टरांकडे पाहिलं... मानसीचंही लक्ष गेलं, पण दोघातलं बोलणं तिला कळेना.....


"काय झालं अमित? मला सांगतोस का?", "मला काहीही कळत नाही आहे...", मानसी कंटाळली होती...
अमितने परत डॉक्टरांकडे पाहिलं. दोघे काहीतरी बोलले, शेवटी डॉक्टरांनी काहीतरी बोलुन मान हलवली..
अमित मानसीकडे वळुन तिला म्हणाला.. "हे बघ.. तु आधी हे सांग, खरंच बरं वाटतंय ना? प्रॉब्लेम नाही ना?"
"नाही रे. बोल."
"बर, ऐक. आणि कंट्रोल ठेव थोडा.. मी इथेच आहे.. ऐक मग.. तु चार ट्रेल्स खाली गेलीस... पण तु जे पाचव्या ट्रेल बद्दल बोलत आहेस, ती फार धोकादायक असल्यानं तिथं बरेच अपघात आणि जास्तीत जास्त केसेस मधे मृत्यु झालेले आहेत."
"त्या ट्रेल कडे जाउ नका याबद्दल बोर्ड्स आहेत, पण आजच्या अतिबर्फवृष्टीमुळे ते झाकले गेले असावेत. नाहीतर तिथे कोणी जात नाही..."
मानसी विस्फारुन अमितकडे बघत होती..
"मानसी, ती पाचवी ट्रेल आणि लिफ्ट्देखील मागच्या वर्षी पासुन बंद आहे.. "
आपलं ओरडणं बाहेर पडु नये, म्हणुन मानसीनं तोंडावर हात दाबुन धरला... ती जाम घाबरली होती...
"पण मग ती दोन माणसं कोण होती??" ती अमितला म्हणाली..
यावर अमित म्हणाला, "धीर धर... आणि हे बघ, आपण इथेच एकत्र आहोत... त्यामुळे कसलीही काळजी देखील करु नकोस...
"अमित, सांग कोण होते ते?"
"मानसी.. मागच्या वर्षी दोन मित्र त्या लिफ्ट मधुन पडुन...." अमित म्हणाला..

मानसी घाबरली होती.... अमित, चल आपण आपल्या लॉज मधे जाऊया. "रेइको लॉज मधे..."
"मानसी, ते शक्य नाहीये...", अमित म्हणाला.
"का? पैसे दिलेत ना?"

"मी थोड्या वेळापुर्वी आपल्या लॉजवर गेलो होतो.", एक सुस्कारा सोडत अमित म्हणाला, "त्यांना हे सांगायला.. "

तेवढ्यात, टेबलवर ठेवलेल्या एका जपानी भाषेतल्या वर्तमानपत्राकडं तिचं लक्ष गेलं. काही वाचता नाही आलं, पण तिथल्या फोटोने तिचं लक्ष वेधलं.... "अरे अमित, ही तर रेइको. सकाळी आपल्या रूममधे आली होती.. आणि ही तीच बाई, जी मला उठवायचा प्रयत्न करत होती..." त्यांचा काय संबंध?

"मानसी..", तिचा हात धरत अमित म्हणाला, "तुला आठवतंय का, मालक म्हटला होता, 'रेइको' आणि तिच्या 'आईबद्दल'? त्या दोघीच आपण येताना पाहिलेल्या अपघातात... " वर्तमानपत्राकडे पहात अमित म्हणाला..
"आणि ती 'हेल्पर मुलगी', ती आज आलीच नव्हती म्हणे..."

मानसीने परत ते फोटो पाहिले, आणि काय ते लक्षात आल्यावर तिच्या हातचं वर्तमानपत्र गळुन पडलं...


 अंतिम भाग -
http://watla-tasa.blogspot.jp/2010/01/blog-post_16.html

1 टिप्पणी:

Yawning Dog म्हणाले...

he shabbas, bhareeche, shevat utsukta tanavlee ekdum