बुधवार, ९ डिसेंबर, २००९

द मास्क!

द मास्क!

आज आवर्जून "द मास्क!" ची दाखल घ्यावी लागली...
नाही नाही..
"तो" चित्रपट नव्हे!
"मास्क ऑफ झोरो" पण नव्हे!

हा "मास्क" म्हणजे त्याच त्या "डुककर लोकांपासून चालू झालेल्या 'स्वाईन फ्लू" पासून रक्षण करणारा तो".

"तोहम??"
"कोहम? सोहम! सारखं,
"तोच तो" ला संस्कृत मधे काय म्हणतात हो?? (तदेव??) जाउदे...

तर सध्या थंडी भरपुर पडते आहे...
लोकांना सर्द्या-खोकले चालूच आहेत.

आमचा "ओनो" सान.. रोज ८:५० ला येतो ओफीस ला.
म्हणे..

मला माहीत नाही, कारण मी ९:१० ला जातो.
शक्यतो...

तो दोन दिवस झाले खोकत होता.. कफत होता..

परवाच त्याच्या बायकोचा फोन आला, "धनी.."
"'स्वाईन फ्लू' झाला हो.."
म्हणून तो ५ लाच निघून गेला होता..

त्याच्या लहान मुलाला आधीच झालाच होता...
शाळेत साथच आहे म्हणे..

आज "ओनो"चाही पत्ता नाही म्हटल्यावर लोकांनी ओळखलं...
साहेबांना पण डुककर चावलं....

जेवायला जायच्या १५ एक मिनिटं आधी फोन आला साहेबांचा...
आणि बातमी वार्‍यासारखी पसरली.

पाच मिनिटात एच. आर. च्या "फुकाओ" बाई यांची मेल:-
"३२-१२ प्रभागात एक स्वाईन फ्लू चा रुग्ण आढळला आहे... तरी अगत्य दक्षता घेणेचे करावे.."

बरोबर तीन एक्सेल फाइल्स चिकटवून मेल केली होती.
त्या एक्सेल मधे "अगत्य कसे करावे" याबद्दल यथासंग माहिती होती...

जेवून आलो, तर दारातच आमचा "ची-मु री-दो" (टीम लीड) "तुमिओका"सान वाट पहात होता..
"माफ करा पण हे घ्या. "
आयला... प्रेझेंट देताना कोणी "प्लीज!" म्हणतं का??
म्हणुनच जपानचं आकर्षण वाटतं मला...

छान निळ्या रंगाचा बॉक्स होता तो .. खुशीत बॉक्स उघडला!

"फटा बॉक्स, निकला मास्क!!!"

बाय द वे.. निळ्या रंगाचा अर्थ:- "फक्त पुरुषांसाठी!"
...........स्त्रियांसाठी गुलाबी असतो म्हणे...


"तुम्हाला आजार होऊ नये.. म्हणून आज हा मास्क आम्ही देत आहोत."
"पण.."
तुमिओका म्हणाला, "उद्यापासून सात दिवस, प्रत्येकाने आपला आपला मास्क घेऊन यावे."
"कळावे, ही विनंती..."


बोम्बला...... म्हणजे अजुन सात दिवस कम्पल्सरी "मास्क!"..
"आधी मस्का, मग मास्क..... "


"नाकातून हाना मिझु चा पूर आला तरी बेहत्तर... पण 'मास्क' लावायचा नाही!"
समोरून 'मास्क' लावून जाणार्‍या त्या जपान्यावर हसत, मी 'बाता' बरोबर शपथ घेतली होती..

आता हा 'मास्क' लावल्यावर "मैं बाता को काय मुंह दिखाउंगा???"

कारण "एटिकेट्‌स.. "
"आपली सर्दि इतरांना होऊ नये, यासाठी प्रसार प्रतिबंधक म्हणून जपानी लोक 'मास्क' वापरतात... "

"हे अजिबात करायचं नाही!" ही "भूमिका" होती...


मग काय?
समस्तांनी मास्क लावला.. एकमेकांकडे बघितलं...
उगाचच आजारी वाटतो चायला आपण मास्क लावला की..

मास्क लावला, आणि मला लक्षात आलं...
आता काही खरं नाही...

१. मास्क लावल्यावर फार उकडतं...
२. मास्क लावला असताना शिंक आली की अवघड होतं..
३. मास्क लावला असताना जांभई आली की अवघड होतं..
४. कानावर उगाच काहीतरी अडकलं असल्यमुळे अवघडल्यासारखं वाटतं. कान दुखु लागतो..
५. काम करताना चुइन्ग गम खाण्याची सवय असणार्‍या माणसांना चुइन्ग गम थुंकलं खरं..
पण गेलं कुठं असा प्रश्न एकच सेकंद पण हमखास पडू शकतो.
६. काहीतरी खायचं म्हटलं की "अर्र...."
मास्कचं जरा नंतरच आठवतं..
७. चहा कॉफी पिताना मास्क थोडासा बाजूला करून प्यावी म्हटलं तरी कॉफी सांडू शकते..
... आणि शर्टावर डाग पडु शकतो.
८. सर्वसाधारण मास्क हा फक्त ९७ टक्के वेळाच वायरस पासून बचाव करू शकतो....
.सर्वात स्वस्त मास्क, हा साधारण ५० रुपयांना एक या दराने पडतो.

हे सगळं मला नवीन होतं, पण बाकीच्यांना??

तो "कोबायाशी"सान..
तो आयुष्यभर मास्क लावून फिरत असतो...
सुट्टी मात्र घेत नाही..
"किती काम करशील बाबा?"

सारखा शिंकतो..

"हानामिझु गा तोमारानाकुते सा..."
(नाकातून सारखं पाणी येतय बघा...."
"सा" ला काही अर्थ नाही...
जपानी भाषेत कुठल्याही गोष्टीला शब्द आहेत..
फार गंमत येते शब्दांची मजा समजली की..
हाना :- नाक.
मिझु :- पाणी.
हानामिझु:- सर्दी वगैरे झाली की नाकातून येणारे पाणी!

आणि हे सांगताना कोणालाही कसलीही लाज वाटत नाही.
आपल्या इथे म्हणजे "नाक गळतय..." वरुन आम्ही रुष्याची इतकी चेष्टा करायचो...
)

तर आज मी मास्क लावून त्रस्त झालेलं, कोबायाशीनं बघितलं होतं, हे मी बघितलं होतं..
त्याला मला काही सांगायचं असावं.. सारखा बघत होता..

मला ते गाणं आठवलं....

"काय तुझ्या मनात..
सांग माझ्या कानात?? "
वगैरे..

पण नको! या कोबायाशीला असं काही म्हटलं तर तो म्हणेल..

"काम असे रे फार राहीले...
वेळ असे पण बिल्कुल ना..
मी तर येतोच आहे कामा...
सांग तुही मग येतोस का?या कोबायाशी टाईपच्या "अतिकाम" करणार्‍या लोकांना बघून मला खरंच वाटतं: -
भारताने एका गोष्टीचं उगाचच क्रेडिट घेतलं आहे...

आपल्या देशात इतके कामचुकार लोक असताना, "काम-सूत्र" भारतात कसं बनू शकेल??
हे मुळचं जपानी असावं...

बर. ते जाऊदे.

मीच त्याला विचारलं, का रे बाबा तुला "जिम कॅरी" इतका का आवडतो????
त्रास होत नाही का "मास्क" चा?

"थंडीत होते सर्दी मजला...
उन्हाळ्यात हा "काफून श्यो-..."
आर्त कहाणी असे आमची..
आज तुम्हासे ऐकवितो..." ... कोबायाशी बोलत होता...


"आयला... हे स्वाईन वरुन "काफून शो" कुठे?? "
माझ्या मनात विचार आला..

पण बिचारा मनापासून सांगत होता... ऐकू म्हटलं..

"तू मार्च मधे होतास ना इथे?? "
"हो.. "
"कसं होतं आठवतय?"
"हो" मी म्हटलं..

"मार्च एप्रिल मधे एकदम छान वातावरण असतं..
फुलं मस्त फुललेली असतात. ".. मी म्हटलं..

"बरोब्बर!" कोबायाशी म्हटला,

"हाच असे तो काळ, गड्या रे....
फुले छान ती फुललेली..
आम्ही असु पण शिंकत खोकत..
मास्क लावुनी रडवेली... "

आयला.... हे काय एकदम??

खरं आहे पण....
ते दोन तीन महिने बरेच लोक मास्क लावून येत होते..

मग मात्र..

"काय असे हे गुपित बाबा
सांग अरे कोबायाशी...
नवी फुले ही जन्मा येती,
त्याची कसली आलर्जी?"

"सायडर!!!"
कोबायाशी उद्गारला, आणि एकदम माझी ट्यूब पेटली!!

एक पुस्तक वाचलं होतं : "डॉग्स अँड डिमन्स ऑफ जपान"
त्यात होतं "सायडर प्लँटेशन" बद्दल......

"सायडर प्लँटेशन बाय द जापनीज गवर्न्मेन्ट गिव्ज बर्थ टू अ न्यू- डिजीज, "काफुनशो-"

इंडस्ट्रीयलायझेशनच्या काळात जपानने जास्तीत जास्त लाकुड देणारी म्हणून ही सायडर ची झाडे लावली...
खूप लाकुड मिळालं..
पण त्या झाडान्पासुन मार्च एप्रिल मधे उडणारे बिजाणु...
त्यांच्यापासून होतो, "काफुनशो.-"
"वीस वर्षांपूर्वी "काफूनशो-" नावाचा शब्दही अस्तित्वात नव्हता.. आणि आज.... "
कोबायाशी डोळे पुसत होता...
का "हानामिझु" काय माहीत?

"आज ही मल्टि मिलियन डॉलर इंडस्ट्री आहे..."

"काय?"
ही नवीच माहिती होती...

"हो. लोकांना याचा इतका त्रास होतो, की ते गोळ्या खातात..
लिक्विड औषधं घेतात, "मास्क" लावतात.
त्यातून गवर्मेन्ट ला टॅक्स पण मिळतो...
मग कशाला त्या झाडान्वर कार्यवाही होते रे?? "...

वाईट वाटलं...

टीम मधल्या एकाला "स्वाईन फ्लु" झाल्यामुळे हा "मास्क" घातला, तेव्हा अचानकच हे "काफुनशो-" पुराण ऐकायला मिळाल...

आज "मास्क" घालून जाण्याचा चौथा दिवस...

कंपनीत पोचलो, तर सगळे हसत बसले होते...
"ओनो बारा झाला म्हणे.. येईल पुढच्या आठवड्यापासून..."
"टॅमी फ्लू" घेतली म्हणे...

आयला.. भारीच की....

पण परत कंपॅरिज़न आलीच..
एक ही गवर्न्मेन्ट.. आणि एक आपली....

स्वाईन-फ्लु म्हणजे काही "असाध्य रोग" असल्याप्रमाणे परिस्थिती झाली आहे..
साधे मास्क पण मिळत नव्हते म्हणे...

आणि आपले लोक पण काय?
ऐन "स्वाईन फ्लु" मधे "गणपती मिरवणुकीत" जायची धडपड...
कसं व्हायचं??

"मास्क कशाला? रुमाल बास आहे."
बरोबर आहे त्यांचं पण...
अचानक 'मास्क' लावा म्हटलं की "हॅट"च म्हणणार..

"मास्क" काही फुकटात नाही येत.
आणि रुमालासारखा "धुवून वापरला" असाही प्रकार नाही..

पण इकडे लोक छान बरे होतायत!
इथल्या गवर्न्मेन्ट ने वेळेत 'टॅमी फ्लू' उपलब्ध केली!
डॉक्टर लोकांनी फटाफट "निदान" केलं...
लोकांनी "काफुनशो-" च्या निमित्ताने सवयच असल्याने मास्क लावले, आणि प्रसार त्यातल्या त्यात रोखला..
मोठ्या प्रमाणावर होऊ शकणार्‍या मृत्यूवर तरी आळा घातला गेला..
खरंच.. "मास्क"नी वाचवलं राव...

असं हवं..
मी हसून "ओनो"च्या रिकाम्या खुर्चीकडे बघितलं...
पुढच्या आठवड्यात येईल परत कामाला...
'मास्क' लावून...

पण मग त्याच्या शेजारीच "कोबायाशी" बसतो..

होता आपल्या जागेवर बसलेला..
'मास्क' लावलेला,
तरीही काम करत असलेला...
मला परत "काफून शो-" आठवला, आणि परत थोडा विचारात पडलोच...

सोमवार, २ नोव्हेंबर, २००९

मोका!

घड्याळात बघितलं तर १०:३० होऊन गेले होते...

"आज नक्की ९:३० ला घरी पोचतो!!" म्हणलो होतो बाताला.
साला परत कायतर डायलॉग मारणार....

अचानक सर्वत्र "ओत्सुकारे सामा देस........" चा गजर झाला...
वर बघत मीही म्हटलं, "ओत्सुकारे सामा देस... "

एका हिरोचं काम आवरलं होतं, तो घरी चालला होता...

गेला खरा पण दोनच मिन्टात परत हजर झाला..

अत्यन्त करुण चेहेरा करून म्हणाला: -
"सभ्य स्त्रीपुरूषहो, बाहेर लय पाउस पडतोय...""छत्र्या आणल्यात नव्हे सर्वांनी?"

लगेच सर्वांनी छत्र्या चाचपल्या...

"कोणाला हवी असेल, तर माझी ती गुलाबी छत्री घेउन जा... लाजू नका.."
"उद्या आणुन द्या म्हणजे झालं..."

चला तर मग, बोला... " ओत्सुकारेसामा देस....."
" ओत्सुकारेसामा देस....." च्या जयघोषात तो चालता झाला..


मला एकदम दुपारचा प्रसंग आठवला...
लय थंडी पडली होती...
हलकासा शिडकावाही झाला होता..

"जेवायला बाहेर जाउया, आलोच मीटिंग संपवून" म्हणून सीनियरनं सांगितलं होतं आणि मी पण विश्वास ठेवला होता..
हिरो आलाच नाही १०-१५ मिनिटं.. लय थंडी ... लय थंडी ...स्वेटर पण नाहीए... लवकर निघायला हवं...


"साला, वर्क का नाही होऊ राहिलं हे? मगाशी तर झालं होतं की??"
अचानक लक्ष परत कामात गेलं...

तेवढ्यात डी.डी.चा मेसेज आला...
"सामुई स्स..." (लय थंडी!!)
रिप्लाय करायचा होता...
काम संपवून करू....

...फायनली फन्क्शनॅलिटी वर्क झाली आणि मी कूच! केलं..

आयफोनवर गाणी चालू केली..... १० मिनिटं लागतीलंच पोहोचायला...
"नजरे मिलाना, नजरे चुराना...
कहिपे निगाहें, कहिपे निशाना..." चालु झालं....
आपलं आवडतं गाणं!

" हिरोइन चान्गली असली की गाणं हिट्ट होतं..
"नमस्ते लंडन" ची सगळी गाणी घ्या! .. "
(इति: प. पु. बाता)

मस्त थंडी होती...
पाउस पडून गेला होता, वारा सुटला होता...
पण मस्त वाटत होतं..
एकदम "रोमांचिककू" वातावरण निर्माण झालं होतं...

मी न चुकता "टोक्यो स्टेशन"च्या दिशेला वळलो...
"स्ता-बा-!!!"
सुट्टीच्या आदल्या दिवशी, मस्त पैकी "स्टारबक्स छाप कैफे मोका!" ठरलेला असतो...

एकूण काय? खुशीत स्टारबक्स मधे गेलो...
"स्ता-बा-" मला फार आवडतं..
थोडासा डीम लाईट असतो...
मंद आवाजात इंग्लिश गाणी लावलेली असतात..
सजावटही एकदम बेष्ट!
मस्त वाटतं....

कितीही वेळ बसलं तरी उठवत नाहीत....
म्हणजे, आपल्याला कोणीही येऊन उठवत नाही...
त्यामुळं लोकं काहीतरी वाचत बसलेली असतात..
खरंतर नीट दिसत नाही संध्याकाळी...
चेहेरा पण नीट दिसत नाही....

एनीवे.. आपल्याला "पिण्याशी" मतलब आहे!

"वन कॅफे लाते. टेक आउट प्लीझ.." तिथे लावलेल्या एका नव्या बोर्डाकडे न्याहाळत मी म्हटलं...
"प्लीज ब्रिंग माय कप" असं त्यावर लिहिलं होतं...

बरोबर! "Please bring your own cup and get a discount of 50 Yen!"

जपानी लोकांचं इंग्रजी, जगभर प्रसिद्ध आहे.
पण त्याचा पुरावा घ्यावा म्हणून लगेच फोटो काढला..
तर मागे असलेल्या हिरोला राग आला बहुतेक, मी नक्की कसला फोटो काढतोय बघू लागला....
तेवढ्यात मला लक्षात आलं.. आयला.. मगाशी बोर्ड बघता बघता "मोका" राहिलाच...
"लाते" सांगून बसलो..

"एसक्युज मी... कॅन यु प्लीझ कॅन्सल द "लाते" अँड गेट मी अ मोका?
आय विल पे द डिफरन्स..." "अँड..."
अँड.. मी पहातच राहिलो...


आयला... ही सुन्द्री कोण?
स्ता-बा-च्या "ब्लॅक अँड ग्रीन" यूनिफॉर्म मधे छान दिसत होती!
खांद्यावर रुळणारे केस असे चेहेरयावर आले होते...
डोक्यावर छान काळी कॅप!
वाह!पण एक सेकन्दच!
गोड आवाजात "प्रीज वेत सा-..."
म्हणून ती लगेच आत गेली....

"अरे? पण मगाशी तर सगळे माणूस लोक होते आत?
ही कोण?
आणि कुठून आली??
कधी आली?
आणि आत का गेली?

मनाच्या सागरात कितीतरी प्रश्नरूपी वादळं उठली!!

तेवढ्यात तिनं पडद्याआडून डोकावून पाहिलं...
त्यांच्यातला एक माणुस बाहेर आला...
त्याने मला इंग्रीश मधे "वात्तो उद् यु राइक तू हाव सा-??" वगैरे वगैरे विचारलं..

"मोका" महाग होता "लाते" पेक्षा..
त्यामुळे "मी एक्स्ट्रा पैसे देतो.." म्हटलो..

तेवढ्यात ती सुन्द्री परत कायतर बोलली...
आणि परत आत गेली...

तो माणुस मला हसत म्हणाला, "यु दोन्तो नि-द तू पे- सा-..."
तीही हसली पडद्यामागून...
"एन्जॉ-य यूआ मोका!" तो म्हणाला...

आयला.. चेहेरा बघायचा मोकाच देऊ नाही राहिली ही सुन्द्री...
"एन्जॉ-य मोका काय डोंबल???"

दुकान बंद होत आलं होतं... म्हणून का डिसकाउंट??
का "सुन्द्री कनेक्शन??"

एकूण मिळून फक्त ४ किंवा ५ सेकंद!! पण कसली मज्जा!

"नजरे मिलाना... नजरे चुराना...." अजुन तेच गाणं चालू होतं...
रिपीट मोडवर गेला होता वाटतं आय पॉड...
पण आयला..
इथं पण हेच गाणं चालू होतं..

दोन मिन्टात "सा-..." अशी गोड हाक ऐकू आली...
सुन्द्री चा आवाज..
लगेच ओळखला....
तीच मोका घेऊन आली होती....

"अरे वा! मुलीला "मोका" बनवता येतो? वा वा.... "

"अहो.. परवा हिच्या भावाची मुंज होती...२०० जणांचा मोका हिनच बनवला...
तशी तयारीची आहे... सवय आहे तिला....
पुढच्या वेळी आलात ना, की जरा आधी सांगून या.. "रम डीप्ड ब्राउनीज" तर इतक्या छान बनवते... "

तर "मोका" आला होता....
काउन्टर जवळ चांगला मोठा दिवा होता...
प्रकाशात सुन्द्री ला आता एकदा नीट पाहून, "आरिगातो..." तरी म्हणावं असा विचार डोक्यात आला..

मनातल्या मनात हसत मी तिने दिलेला मोका हाती घेतला...
आणि जाता जाता "बाय बाय" म्हणावं म्हणून तिच्याकडे बघितलं..

बघितलं....
आणि डोक्यावर हात मारुन घेतला...
आगा या या या या....

सुन्द्री कुठची? "सुंदरडं" होतं....
आगा या या या या....

"मोका" कसला?
"नजरें मिलाना नजरे चुराना"??

हे म्हणजे "कहींपे निगहे कहींपे निशाना" च की....

आगा या या या या....


शनिवार, १३ जून, २००९

काखेत कळसा...

※'सदर पोस्ट मधला मजकुर थोडासा "अलिश्ल " आहे' असे म्हटले गेल्यामुळे वाचकांनी नोंद घ्यावी आणि इच्छा(??!!) असेल तरच वाचा॥ (कृपया!!!)
अलिश्ल" लिहून त्रास देण्याची इच्छा वगैरे आज्याबात नाय.
मी आपलं थोडी गमजा म्हनून लिहिलं हाय....
कळावे, लोभ असावा.

एकदा ट्रेन (सब वे) मधुन चाललो होतो, तेव्हा अचानक ट्रेन मधे लावलेल्या एका जाहिरातीकडे लक्ष गेलं...
"हिकारी-गावका केश कर्तनालय"

खरं तर रोज एक तास त्या ट्रेन मधून प्रवास करताना बरेचदा तिकडे लक्ष जायचं...
एका सुंदर जपानी तरुणीचा "यो-कोसो" अर्थात "या-रावजी" टैप फोटो होता त्यावर.. (म्हनुनच)

परवा गर्दीत नेमकं त्या जाहिराती समोर उभं रहावं लागलं, आणि जाहिरात वाचायचा योग आला..

"कृपया आमचे येथे अतिशय सुंदर केस कापून मिळतील..."
"आमचे दर पुढील प्रमाणे:-"
ते दर बघितले, आणि उडालोच!

एका माणसाचे केस कापणे: - १२,००० जपानी येन(अंदाजे ५,००० रुपये)!!!
काय? पण बघितलं, तर फोटोत आजू बाजूला ३ बायका काढल्या होत्या...
आणि खाली लिहिलं होतं, तीन माणसांना, नाही, बायकांना ... १५,००० जपानी येन!
अरे? हे काय नाटक?

"आमी लय ल्हान पनाच्या मैत्रिनी हाय, आमी कालेजात जायलागल्यापासनं कदीबी एकटं एकटं केस कापाय गेलो नैती..." असा काहीसा मजकुर होता.. फोटोतल्या बायका लय खिदळत होत्या...

"टिपिकल जपानी वारिबिकी(डिस्काउंट स्कीम!)", मी म्हटलं...

बरोबर आहे.. बायकांचे केस लाम्ब असतात.. बरोबर आहे रेट...
आयला.... वेट!
लाम्ब असले म्हणुन काय सगळे कापतात का काय?" काय सम्बन्ध? एवढा कसला रेट?

"केस रंगवतात का काय?" नाही... जाहिरातीवर तसले काही रंगही दिसले नाहीत...

मग दिसलं, "आमच्या इथे केस न वाढण्याची एक वर्षाची गारंटी!"

आता मात्र हद्द झाली... केस कापून एक वर्ष न उगवावे म्हणुन कोण जातं का केस कापायला??

तेवढ्यात एक मला नं वाचता येणारी कांजी(जपानी चित्रलिपीतले अक्षर) दिसली..
घरी जाऊं अर्थ शोधू म्हटलं...

घरी येउन शोधून पाहिलं, शब्द होता:- "वाकी"

"वाकीगे 脇毛 【わきげ】 (noun) hair of the armpit"

आयला...

याला काय म्हणावं आता?

हा म्हणजे खरंच, "काखेत कळसा आणि गावाला वळसा" झाला राव....
आरा रारारा~

सोमवार, २५ मे, २००९

आयला ऑरकुट तू पण???


आयला ऑरकुट तू पण???


भावा, तू पण लायकी काडलास बग...."च्या~ माली~ धलुन धूम फटैक~~~"

मंगळवार, ५ मे, २००९

इझु द्वीपकल्प सहल _ (भाग _ डोमेन नासाय)

सालाबादप्रमाणे यंदाच्या "गोल्डन वीक"लाही कुठे तरी "लय भारी ठिकाणी जायचच" असं ठरवलं होतं.
नियमाप्रमाणे कोणीही पुढाकार घेतल्याने, दोन दिवस आधी सगळे जागे झाले...

कोणालाही मत नं विचारल्यामुळे, कुठे जायचं यात फार दुमत नव्हतं...
"इझु द्वीप" / "इझु द्वीपकल्प" असे दोन पर्याय होते.. यापैकी काही लोकांनी द्वीप पाहिला असल्याने ते रद्द झालं, आणि "इझु द्वीपकल्प" चं भाग्य उजळलं...

परत मग ती फोना फोनी,
परत-परत मग तेच नकार,
नाही लग्नाची भानगड काही,
हवी रहायला जागा यार...

दोन दिवस रहायचं आहे,
मांसाहारी जेवण नको आहे,
भाडं एवढं कसलं यार?
हवी सोस्तात जागा यार...

सरतेशेवटी "सोस्तात" अशी एक जागा "भेटली" आणि आम्ही दुसरया दिवशी सकाळी सकाळी .३० ला टोकियो स्टेशनवरून "कुच" करायचं ठरवलं...

सकाळी ला "झंडू बाबाचा" फोन आला, आणि तो वेळेवर .१५ ला पोहोचेल हेही समजलं... वयाने सगळ्यात मोठा, "जीतू भाई" सगळ्यात आधी पोहोचला होता... त्याने तिकिटांची चौकशी वगैरे करून ठेवली असल्याने आम्हाला विशेष त्रास पडला नाही...

तब्बल तिन दिवस वापरता येइल असा "ओदोरीको पास" विकत घेताना, दोनच दिवस वापरता येणार म्हणुन थोडंसं वाईट वाटलंच, पण काय करणार? "रहायला जागाच नव्हती ना यार?"

. मस्त पैकी उन पडलं आहे!
. अजुन दिवस सुट्टी आहे!
. आपण मस्तपैकी समुद्रावर जायचं आहे!

मग काय?
"क्या बात है~~~!", "पल्लवी जोशी"चं ब्रीदवाक्य आठवलं...

टोकियो सोडताना, "शुद्ध शाकाहारी जीतू भाई आणि "परुभाई" ने नाश्ता काय करावा?" यावरून मतभेद निर्माण झाले... पूर्वी कधी तरी "कोंबडी-पान" केलेल्या "परूभाई" ने जास्त नाटकं नं करता "अंडं सॅन्डवीच" खावं असा आग्रह चालू होता.. तो मान्य झाला.
मुख्य प्रश्न जितु भाईचा होता... शेवटी त्याला "वेज-सलाड" घ्यायला लावलं..
तोंड लयच वाकडं करून साहेबांनी त्यातही "अन्डे/मांस आहे का हो?" असं दुकानदारिणीला विचारून शेवटी आमच्या शिव्याच खाल्या..

"नाश्ता छान झाला... वाह! आता आपली ट्रिप पण मस्त होणार!"
"चांगलं बोललं की चांगलं होतं!", असं कुठलं तरी पुस्तक वाचलेला ......

कोण ? कोणीतरी म्हणलं... पहाटे ला उठलेलो असल्याने, पोटात मस्त नाश्ता गेल्यावर मला तर बाबा झोप आवरत नव्हती..

. तास प्रवास, आणि मग "इझु द्वीपकल्प!"... क्रिस्टल क्लिअर पाण्याचे बीच.... वाह!
कोण ते "बाड-बाड-बाड"???... माझी पण झोप उडवली...

टोकियो पासून दूर जाताना झाडी वाढलेली सहज लक्षात येते...
प्लाटफॉर्मवरची वेंडिंग मशीन्स ची संख्या पण कमी होत गेली....
आणि आता आपण "इनाका" मधे जाणार हे दिसू लागलं... (इनाका:- खेडं)

प्रवास चालु होता.... १२ वाजत आले होते... "कधी येणार??" कोण तरी म्हणलं..
"येइल हाँ... बाहेर बघ, झाडं कशी उलटी पळतायत ते?"

तेवढ्यात जीतू भाई ओरडला, "भावा, उसामी!"
त्याला आमचं स्टेशन दिसलं होतं : -उसामी!"

आम्ही पाच जण तिथे उतरताना सगळ्या जपान्यान्नी "डोळे मोठे करून" आमच्याकडे पाहिलं...

"कारण आपण लय भारी आहे रे !", डोळा मारत बाता म्हणाला...

स्टेशन मधून बाहेर आलो... बाहेर फ़क्त एक काळ कुत्रं होतं.
आम्ही एकमेकांकडे बघितलं.. आम्ही म्हणजे आम्ही मित्रांनी...
लय वैताग आला... "ट्रिप वाया" टाइपचे सगळयांचे चेहेरे झाले..


स्टेशनमधून चालत बाहेर जाउ लागलो. आता हॉटेल शोधायचं होतं..
5 मिनिटं चाललो असु, अचानक "गाइज, जवळंच समुद्र आहे!", बाता के शरलॉक बोलला...
समुद्र दिसला.... "बेष्ट!" "पण बीच अगदीच टिंब टिंब आहे रे..", झन्डु ओरडला...

"तरीच मगाशी जापानी लोकांनी डोळे मोठे केले होते...", परु भाई बोलला....

"आयला.. खरंच.. गोमेन नासाय", मी म्हणालो... उतरायला ही जागा मीच फायनल केली होती...
(गोमेन नासाय:- माफी असावी..)
अरे कसलं "डोमेन नासाय" चायला? बघू, चल... झन्डु म्हणाला..

"तुम्ही उभे आहात, तिथून पाचशे मीटर वर हॉटेल आहे, तिथे या...." हॉटेलच्या मालकांनी सांगितलं...
आणि हॉटेलचा शोध चालू झाला..
चालतोय, चालतोय. हॉटेल काही येईना..
परत फोन..
"आयला! फार पुढे गेलात राव...", मालक.
परत चाललो उलट्या दिशेला...

फोन केला, तिथून ५० पावलांवर होटल होतं....

मालकाला शिव्या घालत, होटल च्या पायर्या चढू लागलो...


बर्यापैकी होटल होतं...

"आता जेवून झोपायचं, आणि संध्याकाळी बीच वर फिरून येऊ...

रात्रि जेवून झोपू, आणि सकाळी सकाळी चेक आउट करू....

उद्याचा दिवस पुढे जाता येइल, "पास" दाखवत परु भाई म्हणाला...

मी :- "डोमेन नासाय


सहज म्हणुन मालकाला विचारलं, "इथे टेनिस कोर्ट आहे का?"

"आहे की!" ३० मिनिट्स, "बाय कार "

बोम्बला...

"मी सोडतो की", मालक म्हणाला.. तुमच्या रैकेट्स कुठायत?

बोम्बला...

"एनी वे, मी देतो की..." असं म्हणे वाटलं, पण व्यर्थ....


साहेबांनी गाडीतून कोर्ट पर्यंत नेलं...

एका अतिशय म्हातार्या बाईने दार उघडलं ...

कोर्ट? मिळेल...

राकेट? मिळेल...


मग काय? आज्जीबाईना नमस्कार करून(6000 yen) जोरदार टेनिस खेळायला सुरु केलं...
(क्रमशः)