जीवनात... (इथे पुलंची माफी मागतो! आपलं कसलं जीवन? आपलं तर फुसकं जगणं! वगैरे मान्य करतो. पण तरीही 'आपला तो बाब्या' ची साथ घेऊन आमच्या जगण्यासाठी आजचा दिवस तेवढा जीवन हा शब्द वापरून घेतो.. )
जीवनातलं मित्रांचं स्थान शब्दातीत आहे. खासकरून शाळाकॉलेजच्या निमित्ताने वसतीगृहामधे राहिलेल्यांच्या बाबतीत तर हे विशेष खरं म्हणता येईल. आईवडिलांच्या मते ज्या गोष्टी आपण करू नये असं त्यांना वाटतं, पण त्या वयात आपल्याला मात्र त्याच कराव्याश्या वाटू लागतात, त्या गोष्टींसाठी मित्रच आपली साथ देतात. पण भर पावसात गाडीवर फिरल्यामुळे जर आजारी पडलो तर डॉक्टरकडेदेखिल हेच घेऊन जातात...
"रोटी", "कपडा", "मकान" आणि "लाईन" हे आपले कॉलेजवयातले जन्मसिद्ध हक्क बनतात. तेव्हा मित्रांबरोबर एकाच खोलीत राहणं होतं. आवडत्या शर्टांची अदलाबदल होते. एकाच डब्यामधे जेवण तर होतंच, पण त्या वयात मैत्रीचा परमोच्च बिंदू जर कोणता असेल, तर तो म्हणजे अगदी सातसात आठाठ मित्रांची एकच लाईन असू शकते, तीही सगळ्यांनी मान्य करून ! " ग्रेट माईण्ड लाईक अलाईक... "
दहावीची परीक्षा झाल्यानंतर (ज्युनिअर का असेना...) कॉलेजात जातोय म्हटल्यावर मला माझ्या मोठ्या बहिणीनं खास सांगितलं होतं. "शाळा-कॉलेजाच्या वेळी जितके चांगले मित्र होतील, तितकेच आयुष्यभर साथ देतील. बाकी नंतर ऑफिसमधे होणारी मैत्री बरेचदा कामापुरतीच होऊन बसते. त्यामुळे जास्तीत जास्त जणांशी मैत्री कर. नेहेमी सर्वांच्या मदतीला उपलब्ध रहा. त्यांच्यापैकीसुद्धा कोण कधी कशी मदत करेल, सांगता येणार नाही.."
"आपण सगळे देवाची लेकरं आहोत. जगात लोकांची काळजी घ्यायला, त्यांच्या मदतीला देव तरी कुठेकुठे जाईल? म्हणूनच देवाने प्रत्येकाला आई दिली" असे आईबद्दलचे गौरवोद्गार सापडतात. देव काय, आणि आई काय? ते कधी कमी पडणार नाहीतच, पण तरीही जिथे अजून थोडीशी गरज लागेल तिथे जे कामी येतात ते मित्र! ताईचे अनुभवाचे बोल कॉलेजकाळातच कामी आले. योग्य वेळी अक्षरशः एका मार्कासाठी खेटर अडल्यानंतर देव आणि आईसुद्धा काही करू शकत नाही. तिथे जे मदत करतात ते खरे मित्र!
९९ साली प्रदर्शित झालेला मॅट्रिक्स चित्रपट खरा मानला, आणि समजा तो बडजात्यांनी काढलाय असं मानलं, तरीही आपल्या जीवनात(पुन्हा जीवन.. ) सारं काही गोडधोड असत नाही. प्रत्येक नात्यामधे चांगलेवाईट क्षण येतात, मैत्रीचं नातं तरी ह्याला अपवाद का असावं? "एखाद्या वेळी कोण कसा वागू शकला असता, आणि तो त्या वेळी तसा न वागता असा कसा वागला?" वगैरे! हे गैरसमज आणि त्यातून तुटलेला संवाद हे मैत्री तुटण्याचं महत्त्वाचं कारण!
आता, हे उदाहरण कुठच्याकुठे आहे, पण मैत्री ह्या संकल्पनेत बसत असल्यामुळे इथं सांगावंसं वाटतंय. हल्लीच लोकसत्तेमधे वाचलं, ओ. पी. नय्यर आणि मोहम्मद रफी हे अगदी चांगले मित्र होते. दोघांनी कित्येक सुंदर गाणी बनवली. त्या काळात आघाडीच्या सर्व संगितकारांबरोबर काम करणारे मोहम्मद रफी, ओपींबद्दल अगदी उघडपणे म्हणत, "तुमसासंगीतकार नही देखा..." पण एकदा ह्याच ओपींच्या एका रेकॉर्डिंगला जायला उशीर झाला म्हणून चिडलेल्या ओपींनी रफींना स्टुडीओमधून घालवून दिलं होतं. गैरसमजांमुळे नासलेल्या मैत्रीला पुन्हा उभारी देण्यासाठी तीन वर्षांनंतर रफी परत एकदा ओपींकडे गेले तेव्हा त्यांचं स्वागतंच झालं, पण एव्हाना वेळ निघून गेली होती. ह्या जोडीला पुन्हा तो सुवर्णकाळ परत आणता आला नाही. आपल्या दोन पैशांच्या आयुष्याच्या बाबतीत ह्यातून आपण शिकण्यासारखं इतकंच की गैरसमजांपेक्षा मैत्री फार मोठी आहे! गैरसमजांना जवळ ठेवण्यापेक्षा मित्रांना आपल्या जवळ ठेवणं शहाणपणाचं आहे.
माणसाच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू असू शकतात. 'ज्याला जितके अधिक मित्र असतील, तितके पैलू अधिक!' व्यक्तिमत्वाचा विकास जरी प्रत्येकाच्या हातीच असला, तरी त्यासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी जर मित्र मदत करत असतील तर हे खरं मानायला हरकत नसावी. आणि हे खरं मानायचं असेल, तर आजपर्यंत आपल्या (ह्या दोन पैशांच्या) व्यक्तिमत्वाला, किमान तेवढी तरी किंमत मिळवून देणार्या मित्रांचं कधीही विस्मरण होऊ देता येणार नाही...
शेवटी एकच आहे, "मैत्रीसाठी जगणं" वगैरे पातळी गाठणं आपल्याला कधीच शक्य होणार नाही, पण किमान "जगण्यासाठी मैत्रीची गरज" मान्य करणं मात्र नक्कीच शक्य व्हावं... आयुष्य छोटं आणि मैत्री फार मोठी आहे...