आपल्या "पु. लं." नी म्हटलय, की माणसाला सतत "काहीतरी सांगायचं" असतं..
"मला काहीतरी सांगायचंय..." या एका गोष्टी मुळे माणसं किती बोलतात.. किती लिहितात...
जपानी लोकांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर "मला काहीतरी विचारायचंय" असं म्हणावं लागेल कदाचित!
नवीन कोणी भेटलं, की चालू: इण्टरव्ह्यू!
तू रोज "करी-राइस" खातोस ना?
आणि घरात कधी "करी" करतोस का?
"जपानी करी" बद्दल तुझं मत काय आहे?
"कोको इचिबान" मधे गेलायस काय? (कोको:हे, इचिबान:एक नंबर)
जपान (याचा अर्थ टोक्यो) मधे "जगात भारी करी" कुठे मिळते?
मी खाल्लेलं "करीचं" दुकान आहे, तिथं येशील काय?
अशी प्रश्नांची सरबत्ती झाल्यावर "थांबा.. मी सांगतो माझं आवडतं ठिकाण" म्हणत जागा ठरते..
वेळेच्या 10-15 मिनिटे आधी येऊन जपानी लोक गप्पा मारत उभे असतात..
मी धावत पळत 2 मिन्ट आधी पोचतो... नमस्कार चमत्कार होतात.. ऑर्डर दिली जाते...
सगळ्यात हिट सुरूवात म्हणजे "आयला, तुझं जपानी कसलं भारी आहे!"
:- समजा, एखादा फॉरेनर आला आणि तुमच्याशी चक्क मराठीमधून बोलू लागला...
आणि तुम्हाला मराठी सोडून कुठलीच भाषा येत नाही! तर तुम्हाला कसलं भारी वाटेल!
मग त्याचं मराठी कितीही मोडकं तोडकं असो...
तशीच गोष्ट... कारण सर्वसाधारण जपानी माणसाला "इंग्रजी" येत नाही.
"भारतात सगळे इंग्रजी बोलतात. कसलं भारी!" ("हो / नाही मधे उत्तर द्या" प्रश्न...)
नाही हो. इंग्रजी नाही बोलत...
लगेच पुढचा प्रश्न:- "आ..मग "हिन्झुगो" मधे बोलता का?"
टिप:- हिंदू ला जपानी मधे हिन्झु म्हणतात.. भारताला हिंदूराष्ट्र समजतात.
जपानी = निहोनगो. (निहोन: - जपानी, गो: - भाषा)
नाही हो.. भारतात मी मराठी (गो!) मधे बोलतो.
ही कुठली भाषा? किती लोक बोलतात ही भाषा?
"साधारण नउ कोटी लोक.. "
या उत्तरावर उपस्थित जनसमुदाय चमकुन एकमेकांकडे पाहु लागतो...
"आयला.. आपल्या जपानची लोकसंख्या साधारण एवढीच आहे..."
[ इसी बात पे, "जय हो, मराठी की! " ]
बर, तुला किती भाऊ आणि किती बहिणी आहेत?
नाही, मी एकटाच आहे.
काय? आ? आम्हाला वाटलं होतं 3-4 भाऊ आणि 1-2 तरी बहिणि असतील.. बॅड-लक...
मी:- आं???
तू रोज काय जेवतोस? रोज करी खातोस का? का नान बनवतोस?
आयला.. "नान" पंजाबी प्रकार आहे.. त्यासाठी भट्टी लागते, वगैरे समजावणं येतं मग...
जपानी लोकांना "भाजी" म्हणजे काय, आणि "ती कशाशी खातात" हे समाजावताना
माझ्या तोंडचं पाणीच पळतं..
जेवण येतं..
शिनागावा, टोक्योमधल्या बेष्ट(माझ्या मते) इन्दो र्योरी:- "देवी" मधे आम्ही बसलेले असतो...
आचारी साहेबांनी बनवून दिलेल्या "नान" कडे पाहूनच मगाचचा "तुला नान येतं का?" हा
प्रश्न आलेला असतो..
मला एका हाताच्या तीन बोटांनी "लीलया" नानचा तुकडा तोडताना पाहून जपान्यान्चा पुढचा प्रश्न असतो:-
तू कसला भारी जेवतोस! एका हाताने नानचा तुकडा कसा तोडता येतो? किती अवघड आहे!
आयला... 4 वर्षांचं पोरगं पण आपल्या (एका) हाताने जेवतं..
तरी म्हटलंतुमच्या चॉप-स्टिक्स पेक्षा बरं आहे. भूक लागली तर पटकन जेवण करावं...
त्यात उगाच "काड्या" कशाला करायच्या?
पण यापुढचा प्रश्न खरा प्रश्न असतो.. आधीचा प्रश्न म्हणजे नुसती वातावरण निर्मिती असतो...
प्रश्न :- "तुम्ही डाव्या हाताने का खात नाही?"
या प्रश्नाचं उत्तर "जेवताना" द्यायची माझी मुळीच इच्छा नसते...
पण मग प्रेक्षक बघून उत्तर द्यायला लागतं...
हा प्रश्न विचारणारे दोन प्रकारचे लोक असतात.
एक, जे बिचारे खरंच कुतूहल म्हणुन विचारतात.. आणि दुसरे "आचरट" असतात म्हणुन विचारतात,
त्यांना ते "खातेला हात, आणि क्ष हात", हे माहिती असतं...
खरंच माहिती नसतं, त्यांना मी "जेवताना डाव्या हाताने ग्लास उचलायला, जेवणाचीभांडी "पास" करायला
वापरतो, म्हणुन त्याने खात नाही" असं काही सांगतो.. (खरं आहे की हे पण!)
आचरट लोकांना "नेक्स्ट क्वेशचन प्लीज" म्हणतो...
त्या आचरट लोकांनी जास्ती बोलू नये खरं तर... कारण त्यांच्या "त्या" रिवाजाबद्दल आपल्या इथले लोक म्हणतात, "कागद?? शी!!!"
आणि ओब्वियस्ली, जपान मधेही आधी "पाणीच" असावं... "पैसे आले आणि पाणी गेलं.. "दुसरं काय?
पाण्यावरून आठवलं, "गंगेबद्दल"!
प्रश्न: - तुम्ही रोज गंगेचं पाणी पिता ना?
आता काय उत्तर द्यायचं?
हा प्रश्न जरा रेअर आहे. 2-3 दिवसांपूर्वीच आला:-
प्रश्न: - "अरे, मायुरु.. तुझा उपास कधी असतो?? "
(चायला उपास!! ) नाही हो. मी उपास नाही करत...
प्रेक्षक (पुटपुटला):- आयला.. हा विचित्र भारतीय आहे! उपास करत नाही म्हणजे काय?
त्यांना आत्ता पर्यंत भेटलेले सगळे लोक मंगळवारी उपास करायचे म्हणे...
पण तरीही उपप्रश्न आलाच:-
उपासाला काय "चालतं"?
आता हे सांगायला गेलं तर आपण फसून जाउ!
कारण "हे चालतं, ते चालतं" करत "उपासाच्या दिवशीच आपण जास्ती खातो" ही गोष्ट
सगळ्यांना माहीत आहेच...
त्यातून जपानी लोकांना ते सांगताना अवघड, कारण काही सांगितलं की लगेच : - "कारणे द्या" असतं..
म्हणुन "उपास करत नाही, म्हणुन मला माहीत नाही" म्हणत मी तो विषय टाळला..
हे सगळे झाले मित्र वाले प्रश्न...
ऑफीस मधे "इंटरव्ह्यू" झाला, तर :-
"तुला किती भाषा येतात?"
मराठी, हिंदी, ईंग्लिश, जपानी.
कधी कधी मजा म्हणुन मी संस्कृत पण सांगतो..
आता हिंदी पिक्चरनी शिकवलेली "दिल की भाषा" पण थोडीफार समजते..
"मन की भाषा" आहेच!! पण ती मोजता येत नाही....
म्हणुन "4" म्हणालं की लगेच, "खाक्को ई जान..." (जिकलायस भावा!) म्हटलं जातं....
"मला फक्त जपानी भाषा येते!" असं विचारणारा हळु आवाजात म्हणतो...
"तुला प्रश्न विचारला की कुठल्या भाषेत विचार करतोस?? "
आयला... आता यावर खरंच कधी विचार नाही केला...
"तू परत कधी जाणारेस? "
पण ही प्रश्न विचारायची चुकीची पद्धत आहे. मला काही फिरंग लोकांनी सांगितलं आहे,
की त्यांना खरं तर विचारायचं असतं:- तुझा कधिपर्यन्त राहायचा विचार आहे? नथिंग पर्सनल अबाउट इट. ;)
काही पेटंट प्रश्न :-
(पेटंट नं.: RUYAM-2509-01@JP)
"तुला जपानी पोरी कशा वाटतात? "
जपानी पोरी ?
त्यांना माझा एकाच संदेश आहे...
"जेवा.." किंवा पुण्यातल्या द्न्यान-प्रबोधिनी जवळच्या "जिवाला खा" सामोसे टाइप,
"जिवाला खा"...
बिचार्या डाएटच्या नावाखाली आयुष्य भर उपास करतात...
बाकी त्यांच्याबद्दल जास्ती न बोललेलेच बरे...
पण मग तू एखाद्या जपानी मुलीशी लग्न करशील काय?
इथे "नाही" म्हटलं... आयला. काय बोलती कळणार नाही.. लगीन कोण करेल??
लांबच बरी ती....
(पेटंट नं.: RUYAM-2509-02@JP)
तू रोज योगा करतोस ना??
आता आम्ही जमेल तेवढा करतो...
रामदेवबाबा नाहीये काही...
(पेटंट नं.: RUYAM-2509-03@JP)
शेवटी सर्वात हिट, आणि सगळीकडे कॉमन प्रश्न: -
सांग, 76 * 63 किती?
हा 76 च्या जागी कितीही... आणि 63 च्या जागी दुसरे कितीही....
आणि आला प्रश्न...
या सगळ्यात दोन गोष्टी दिसून येतील, जपानी लोकांची "मला काही विचारायचंय" ही मनोवृत्ती,
इण्टरव्ह्यू मधे त्यांच्याकडून मिळणारा आदर!!!
पण एक मात्र खरं... या आदाराचं कारण, मी "भारतीय" आहे, हे आहे..
त्यामुळे हे प्रश्न एका "भारतीयाला" म्हणुन विचारले गेले आहेत.
भारतीय म्हणजे :-
गणितात लय भारी!
कोडिंग मधे डॉन!
विविध भाषांमधे नैपुण्य!
भारतीय व्यंजनं!
भारतीय डान्स!
योगा!
बॉलीवूड!!!
अशा अफाट भारत देशाच्या एका सामान्य नागरिकाचा होता हा एक इण्टरव्ह्यू....