रविवार, १६ मार्च, २००८

"नावात काय आहे?"


"नावात काय आहे?"

इथं अपेक्षित म्हणजे, उत्तरापेक्षा प्रतिप्रश्न आहे. "कोणी म्हटलं आहे? "
आता उत्तर मिळेल : - "नावात सर्वकाही आहे। "

जपानी भाषा शिकायला सुरु केली की सर्वांना परत एकदा आपलं बारसं करून घ्यावं लागतं..

आपल्या समृद्ध मराठी भाषेत जी बाराखड़ी आहे (अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः !" ) तशी जापानी भाषेत बाराखड़ी फक्त पाचची आहे॥ (आ इ ऊ ऐ ओ ) !!! "अरेरे" वाटलं ना ? जापान मधे असाल तर "आरेरे " !!!

त्यामुले होतं काय, की अमितचा "आमित्तो", विशाल चा "बिशारु" होतो..
आता विशालचा विशालू का नाही झाला ? "बिशारु"??
"व" म्हणता येत नाही. ल ला र अणि र ला ल !!! नुसता र तरी कुठे म्हणता येतो? रु करायचा..
"श्रीकांत चं शिरिकांतो "..
" हृतिक , ऐश्वर्या बच्चन , चक्रवर्ती , पुरुषोत्तम( हो. आपले पु लं देशपांडे! वाचा पूर्वरंग! )
वगैरे नावं घेताना जपान्यांच्या तोंडाला फेसच येइल!
तर सांगायचा मुद्दा हा, की जपानी बाराखडी ही "आ इ उ ऐ ओ" इतकीच आहे..
आपल्या नावाचे पार बारा वाजतात..
इसी बात पे , "जय हो!! मराठी की !!!

" स्वतःची ओळख करून देणे! "
याचं फार महत्त्व आहे जपानात...

तर जपानात मी आहे:- "मायुरु"

इथे नवीन ओळख झाली, की आपलं नाव सांगायचं..
त्यावर "तुमचं नाव "लै रेअर आहे!!" "किंवा

"कांजी( जपानी चित्रलीपीप्रमाणे अक्षरं) कुठली हो?" असं प्रेक्षक म्हणतात..

आपण हसायचं... मग नावाची फोड करून सान्गायाची.. "
हे म्हणजे ही कांजी.. ते म्हणजे ती कांजी..

"मग ते म्हणतात, "आयला असं होय?" "आमच्या इथला " अमूक-अमूक" आहे, त्याची कांजी

"अशी-अशी" आहे..तुझी वेगळी आहे ना जरा.. "

"हो! खूप रेअर आहे!!!"
सगळ्यांनी हसायचं~


इथं कम्पनीत पहिल्या दिवशीच आम्ही सगळे जेवायला गेलो होतो . तिथं माझं इंट्रोडक्षन करून देताना नाव सांगून "माझ्या नावाची कांजी नाही" सांगितल्यावर त्यांनी "आरेरे~~~बिचारा" अशा नजरेनं पाहिलं..

मग मी आपल्या "भारतीय नावांचा एक्का" बाहेर काढत म्हटलं, " भारतीय नावांना "अर्थ" असतो "
माझ्या नावाचा, अर्थ आहे मोर... मयूर म्हणजे मोर!"

प्रेक्षकांकडून "उयाआह. उरायामाशिई~~~" अर्थात "जळलो रे ~~~" वगैरे झालं...

पण तरीही बॉस कडून "तो" प्रश्न आलाच; "मायुरू, तुझं संपूर्ण नाव सांग!"..
मी सांगितलं...
३ तास पिक्चर आहे असं सांगुन इंटर्वल मधेच संपवल्यासारखं, "एवढंच?" असे चेहेरे होते सार्यांचे...
"(चायला..) आम्ही ऐकलं होतं की भारतीयांची नावं खूप मोठी असतात म्हणुन .. तुझं नाव लैच छोटं निघालं... "

यावर मी काय बोलणार? मी आपलं " तुमचा अपेक्षा-भंग केल्याबद्दल माफ करा" म्हटलं आणि जेवण चालू केलं...


आता तुम्हीच सांगा..नावात काय आहे?
किमान जेवताना तरी, "पानात काय आहे?" हे महत्त्वाचं!!! नाही का?

भाग २ :
आज बरेच दिवसांनी परत वाटलं, "नावात काय आहे?"

परवा काय झालं, एका ठिकाणी सही करायची होती.
मी केली तर लगेच "बघू बघू..." आता सही सारखी सही. त्यात "बघू बघू" काय?
बघून परत "एवढीशीच?" ते होतंच..
माझं नाव जेवढं तेवढीच सही करणार ना मी?
आता "गोविंदाची" सही, ही काय "अमिताभ हरिभंसराय बच्चन" एवढी होईल?

आणि कालंच एका कागदावर हानको मारायचा होता. हानको म्हणजे शिक्का!
जपानमधे सहिपेक्षा हानको मारायाची जास्ती पद्धत आहे..
मी माझा हानको काढला. लगेच सारे "बग्घु, बग्घु..."
म्हणजे तुझ्या नावाचा पण हानको निघतो??
"(चायला।) पैसे दिले की कोणाच्याही नावाचा हानको निघतो.."
आता तुम्हीच सांगा, "नावात काय आहे?"

भाग ३:

ग्लोबलाइजेशनमुळे किती फरक झालाय याची तुम्हाला कल्पना आहे?
पूर्वी आपण "मिल्या", "पक्या ", "सच्या" होतो.
एकदम ग्लोबलाइजेशन झालं आणि अचानक सगळे मूलं एकदम "गाईज" आणि
सगल्या मुली एकदम नाही... त्या गर्ल्सच राहिल्या...
मग काही इनोदी लोकांनी "गाईज एंड म्हैशिज" असा नवा वाक्प्रचार काढला..

आम्ही मूलं मात्र मधेच कधी "मेट" झालो... मग "पाल" झालो॥
पाल म्हणजे मराठी नव्हे इंग्रजी...
थोड्या दिवसांपूर्वी एक मित्राचा मेसेज आला, "हाउ आर यू डूड??"
हा मित्र नुकताच कोलेजमधे जाऊ लागलाय.. तिथंच शिकला असणार...

"त्यामुले आता नाव वगैरे सगळे इतिहासजमा झालं.." असं मला वाटू लागलंय..
आता फ़क्त "डूड"..

हे अचानक आठवायचं कारण म्हणजे परवा एका मैत्रिणीच्या स्क्रैपबुक मधे कोणीतरी तिला
"हे डूड, हाउ आर यू?" असा मेसेज टाकला होता...

आता तुम्हीच सांगा, याला काय म्हाणायचं?
"नावात काही आहे का नाही? "

बुधवार, ५ मार्च, २००८

" यात्रा "

विमानात : -

"सर, युवर कनेक्टिंग फ्लाईटस बुकिंग इज कन्फर्मड! आय कन्फर्म यूवर बुकिंग ऑन २३rd फेब्रुवारी. मोर्निंग.
युवर इंडियन वेज मिल इज कन्फर्मड . यू विल लैंड इन मुम्बई @२३:३० आय. एस. टी. वी विश यू अ प्लेज़ंट फ्लाईट. थंक यू फॉर चुजीँग "क्स्क्स"एअरलाइन्स.. "

"हुश्श" केलं ..
...आणि लक्षात आलं. आज २१ तारीख आहे. "लागली ... वाट लागली.. "

चालू झाली : - "भागं-भाग!!!"
थोडयाफार भेटवस्तु. भरपूर चोक्लेट्स!
थोडीशी मन्दिरा.. नाही, मदिरा.. आणि भरपू~~~र सारी
चोक्लेट्स! !!

एअर पोर्ट पर्यन्तचं रिज़र्वेशन :- "मिलालां! मित्रांची कृपा !!!"
वेलेत उठूनही टाइम पास करत बसल्यामुले व्हायचं तेच झालं : "उशीर."
प़ला.. "भागं-भाग!!!" ~~ "भागं-भाग!!!" ~~~~~ "भागं-भाग!!!"

"मिझुए"ला पोचलो. ताक्सिवाल्याचे आभार मानून खुशीत बाहेर पडलो. पोचलो एकदाचे!!
अरे, बस स्टॉप कुठे आहे??" "बोम्ब्ला !"
"धुन्धो! (बच के कहा जाएगा?) आधे इधर जाओ, आधे उधर जाओ.. बाकी... "
तोपर्यंत, एक बिचारा जपानी माणूस आला आणि म्हणाला "एअर पोट.. बस.. देअर.. ५ मिनिट. गो! गो! "
असं म्हणत सोडायला बस स्टॉप पर्यंत आला. तेवढ्यात बस आली..
त्याला "अरिगातो गोझैमास " का काय ते म्हणुन, बस मधे !
अरे, मित्रांना "बाय बाय" कोण करणार? एवढे बिचारे सोडायला आले आहेत..
लगेच खाली उतरून, मिठ्या मारणे घडले.. तरी बरं, २ आठवद्यान्नी परत भेट्नार होतो सगल्यान्ना..
पण मस्त वाटतं.. काहीतरी भारी करून / करायला देशा चाललोयसं वाटत असतं..

७:५५ ची लिमोजिन होती. आपल्याकडे लिमोजिन म्हणजे ती लाम्ब्डी (स्ट्रेचलिमो) वाटते, ती नव्हे!!!
ही वोल्वो टैप ची लिमो! आरामात बसून एका तासात "नारिता!" ५ मीनीटात चेक इन झालं ! खुषित घड्याळ
पाहिलं:- ९:१५... " फक्त?? आता २ तास काय करणार? चायला ~~~ "
आयडिया! " शौपिंग ! " ( विंडोतुन )
"युनिक्लो! :- बघा कपडे!! "
"तुताया! :- पुस्तकं!! भारतावर काय आहे? अरे वा! चांगलं लिहिलंय! फॉर अ चेंज !!!
अरे? "आबुनाई(धोका!) ?"
"चायला.. तेव्हधं बरं मीलतं यांना ... पौब्लेम पण आहेत म्हना.. "
" भाषांची पुस्तकं पण आहेत. "

"भूक लागली! चला, सब-वे Veg Delight हो जाए!!! "
११ ला सिक्युरिटी चेक पार करून प्लेन मधे यशस्वी पदार्पण! लैच भारी वाटत होतं..
१० महिन्यांनी देशात! काय काय बदललं असेल? बदलान्बद्दल मला फार कुतूहल आहे.
इ.सन २००० पासून मी कोल्हापुराबाहेर आहे. दर महिन्यात एकदा तरी कोल्हापुरची वारी असायचीच.
शनिवारी सकाळी सकाळी स्टैंडवरुन घरी येताना रिक्शातुन बाहेर लक्ष असायचं, "काही बदललं आहे का?"
"दर वेळी निराश व्हायचो .. एखादी तरी १०-१२ मजली बिल्डिंग? नवीन बांधकाम चालू असेल ? एखादं
फाइव्ह स्टार होटेल ? काही तरी? एकदा तरी?? "
"आता एक वर्षानं!! बघुया !!"

"ओक्याकुसामानी ओनेगाई इताशिमास.... "
अर्थात, "कुर्सी की पेटी बाँध लो... " वगैरे च्या नांदीनंतर विमानाने "जय श्रीराम" म्हटले आणि उड्दान केले.

थोड्याच वेलात हवाई सुन्दरींचं दर्शन घडलं आणि समस्त प्रजाजनान्ना त्यांच्या " शुभ-हस्ते ", "
हस्ते-हस्ते" क्रेकर्सचा प्रसाद मिलाला.. तीर्थ मागाहून येते आहे असे कळाले.. बहुधा थंड करायला ठेवले असावे.

पापी लोकांनी पापक्षालन करण्यासाठी तीर्थ घेतले.. आम्ही साध्या लोकांनी साधे, ताजे संतरे (का ज्यूस) घेतले।

"
पापक्षालनाचा मौका परत कधी मिळेल न जाणो" अशा विचारात लोक आपापल्या प्याल्यातुन पुन्हा पुन्हा प्याले (तीर्थ) ..


"१५ मिनटात माझं जेवण हजर? " पाच मिनितांपूर्वी एक मावशी येवुन "इंडियन वेज मील फॉर यू सर???" म्हणुन, माझ्या खुर्चीवर एक स्टिकर लावून गेली होती .. "
" लगेच जावुन स्वैपाक केलेला दिसतोय. चांगलं आदरातिथ्य आहे! " असं काही अगदी मला वाटलं नसलं तरी, वा! बरं झालं, माझंच आधी आणलं ते. पुढची पंगत बसायला वेळ आहे हे उघड होतं...
असंही
तीर्थ आधी अणि प्रसाद नंतर घेतात..

मी माझा डबा उघडला. बाहेर लिहिलं होतं :- "इंडियन लेडीज फिंगर. "
"अर्र.." "इंडियन वेज : - लेडीज फिंगर" होतं..

त्याचं कसं आहे, "मंदिरात जसा उदबत्तीच्या सुगंधात नास्तिकही आस्तिक होतो, तसं ... वातावरणाचा/ तीर्थ-

प्रसादाच्या सुगंधाचा परिणाम असेल कदाचित.."

पण तरीही "विमानात काय खाल्लं ?" चं उत्तर "भेंडी?"
अवघड आहे...


बिरबलाच्या गोष्टीत वाचलं असेल :-"घोडा अडे, भाकर जळे, तलवार गंजून जाय" सांगा कशामुळे ? उत्तर :- न फिरवल्यामुळे !यात घोडा, भाकर आणि तलवार बरोबर " हवाई सुंदरी" पण समाविष्ट करावं लागेल।किमान तिथल्या काही लोकांना असं वाटत असावं। सारखं सुंदरीला फिरवलं नाही तर ती जाड होईल किंवा तत्सम काळजीपोटी भाविक सुंदरीला सारखे फिरवत होते.. यात देशी भाविक / इम्पोर्टेड भाविक असा फरक नव्हता. सर्वजन एकाच आध्यात्मिक पातलीवरुन हाक देत होते.. देशी भाविक "एसक्युज मी मॅडम!!" म्हणत.. इम्पोर्टेड भाविक " पारडन प्लीज " म्हणत. भाव तोच ! सुन्दरी मात्र इम्पोर्टेड लोकांना जस्ती तीर्थ प्रसाद देत होत्या, आणि देशी भाविकांच्या हाती कोरडी पात्रं होती.. तरीही धीर न सोडता, प्रत्येक दर्शनावेली काही तरी मागणी चालूच होती.

"तीर्थ A प्लीज़"

"क्रेकर्स प्लीज़"

"तीर्थ B प्लीज़"

"क्रेकर्स प्लीज़"

"क्रेकर्स प्लीज़"

"तीर्थ C प्लीज़" (क्रमशःचालू होतं)

काही जणांची समाधि लागली. जेवणाचं भानही राहिलं नाही.. मी जेवण संपवून मुखमार्जन करून (परत एकदा चालतं की) डी सी एच अर्थात "दिल चाहता है!" पाहण्यात गुंतलो.. आणि तो सीन आला... "आमिर खान प्लेन मधे चढतो. सीट लगेच सापडते. शेजारी साक्षात प्रीती झिंटा ! "आमीर - हाय. प्रीती - हाय॥(मी पण हाय, प्रीती ! ) आमच्या शेजारी मात्र केष्टो मुखर्जी.. क्रेकर्स चा ब्रेक न लावता गाडी फक्त "तीर्थ" वर चालू होती.. बॅड लक! चालायचंच..ये गम भूलाने के लिये एक-एक सण्त्रा हो जाए म्हणंत मी सुंदरीला इशारा केला. तिने तिच्या भावाला पाठवलं... खरंच॥ काय ब्याद लक...

प्लेन मधे जनरली मी झोपत नाही.... आत्तापर्यंत ४-५ वेळाच प्लेन मधे बसलोय. पण बोलायला मस्त वाटतं ना, "प्लेन मधे जनरली मी झोपत नाही.... " तुम्हीच सांगा, आपण आयुष्यात किती तास आपण ९००० मिटर उंचावरून प्रवास करतो? आणि आपण आयुष्यात किती तास झोपतो?मग ९००० मीटर उंचीवर असताना झोपण बरोबर आहे का?
बसल्या बसल्या बाजूचे लोक काय टी पी करतायत बघत होतो...

सगळ्यात भारी मजा फर्स्ट टाइम फ्लायर्स ची होती... माझ्या उजवीकडच्या लाइनमधल्या सीटवर आपलाच एक माणूस होता. मला बघितल्या बघितल्या त्याने "हाय. आर यु इंडियन?" असा प्रश्न विचारला..मीही हसून "हो" म्हटलं... "गुड."- साहेब. आता मी भारतीय आहे आणि मला त्याचा अभिमान आहे म्हणून ठीक आहे, पण एखाद्या श्रीलंकन माणसाला असा प्रश्ना विचारला, आणि त्याने "नाही. श्रीलंकन" असा म्हटल्यावर या साहेबांनी कदाचित त्याला "अरेरे. सॉरी." वगैरे म्हटलं असतं... काय माहीत?

"तीर्थ-क्रेकर्स" चा पाऊस पाडणार्‍यातले हेही एक... होस्टेस बाई यांच्यावरच रूसल्या होत्या.

आता हे साहेब पहिल्यांदाच हवेतून यात्रा करत होते बहुतेक.. "तीर्थ फुकट असतं", हे नक्की कोणीतरी सांगितलं असावं.. त्यामुळे "कूर्सी की पेटी" बांधल्या-बांधल्या त्याने

"एसक्युज मी तीर्थ प्लीज़" म्हटलं होतं... चिडल्याच बाई..

"तीर्थप्रसाद हा उड्डानाच्या अर्धा तास नंतर असतो." माहित नव्हतं बहुतेक साहेबांना...

सिंगापुरला पोचलो तेव्हा दुपार झाली होती खाणं झालं होतं .. 2 तासाचा ट्रॅन्सिट .. पुस्तक वाचावं. अरे, चकटफु नेट? चला. बघुया॥ आणि तिथे एक जण जी साईट अक्सेस करत होता, ती पाहून मी आनंदात ओरडलो."तो मीच नव्हे! ट्रॅन्सिट मधेही ओरकूट पाहणारा तो मीच नव्हे!!" त्याचं काम झाल्यांवर मी लोगिन केलं. " " अपडेट प्रोफाइल :- नाव : - मयूर :- नाउ इन सिंगापुर " नंतर नाउ काढून टाकलं....

सिंगापोर ( वर्जिनली सिंगापुरा होतं म्हणे.. त्यांच्या एका राजाने या भागात पहिल्यांदा सिंह पाहिला आणि नाव ठेवलं सिंगापुरा... त्याने कोल्हा बघायला हवा होता... मला उगाच आमचं कोल्हापूरंच आठवलं... )

एअर पोर्ट मात्र लैच भारी वाटलं.. वेगवेगळ्या देशांच्या नोटा गोळा करायचा छंद असल्याने उगाच एक सॅंडविच खाउन कॉफी प्याली ... सिंगपुरात सोनं स्वस्त मिळतं असं कोणीतरी सांगितलं होतं.. नेमके आज पैसे नव्हते म्हणून.. नाहीतर.. एअर पोर्ट वरचे २ तास एकदाचे संपले आणि मी परत विमानात आगमन केलं... का पदार्पण.. "वॉडेवर... " (कॉपीराईट of श्री. मिलिंद व्ही. तथा गा. दु. )

विमानात बसल्यावर आश्चर्याचा ध. बसला. इम्पोर्टेड सुन्दरीने चक्क मराठीत, दोन्ही हात जोडुन " नमस्कार" केला! अर्र.. आठवलं.. सिंगापुरच्या भाषेत नमस्कारला "नमस्कार" म्हणतात।आणि दोन्ही हात जोडुन नमस्कार करतात.डावीकडे अजुन एक सुन्दरी! तिनेपण "नमस्कार" केला. ती मात्र भारतीयच होती. " चला, काही तासातंच देशात!! हुर्रे!!

"यात्री कृपया ध्यान दे। ..........." --- " हुप्प!!!" "घेतले उड्डाण!!!"

अचानक जाग आली तेव्हा काहीतरी अनौसमेंट चालू होती. खूप धक्के बसत होते. " पोचलो का काय " म्हणून बाहेर बघितलं तर अजुन हवेतंच! बोम्ब्ला! "पोचवणार हे आज.." क्षणभर वाटून गेलं॥ "

सर्वांनी जागेवर बसा. बाहेर हवामान खराब असल्या कारणाने थोडे धक्के बसत आहेत. खुर्च्यांचे पट्टे आवळा आणि पडून राहा (नाहीतर..) असं सांगण्यात आलं...

परत जाग आली तोपर्यंत संकट टळलं होतं. सुन्दरी पेढे वाटत होती. मीही देवाचे आभार मानत पेढा घेतला. अरे? "क्रेकर्स?? "म्हणजे "प्रसाद"! बरोबर.. हे झालंच नव्हतं... "तीर्थ" आलंच यथावकाश..

जेवण झाल्यावर, ( बरोबर. माझाच पहीला नंबर होता. ) भारतीय सुन्दरि आली आणि तिने मला विचारलं, "व्हाट वूड यु लाइक टू हॅव सर? " मी "सन्तरा छाप " मागवलं. तीने आग्रह केला. " साहेब चहा घ्या ना... "

लाजून ( मी ) "बर , साधा द्या " म्हटलं. ती म्हटली, "वाय डोण्ट यु ट्राय आवर स्पेशल मसाला टी? "

"बर. द्या.. " मी म्हटलं. ती खुश होऊन पडद्यामागे गेली....

मला एकदम ती गोष्ट आठवली... हॉटेल मधे गेलं असताना जर चुकुन "स्पेशल काय आहे? " विचारलं तर लगेच हेही विचारावं,"किती वेळ लागेल? " उत्तर जर "लगेच!!!" आलं तर "नको" म्हणावं.. "थोडंच उरलेलं आहे ते खपवण्याची ही टेक्ट असते. "शिळा चहा माझ्या घशी उतरवायचा असेल... तेवढ्यात ती आलीच. "सर." " थॅंकस !!" चहा खरंच छान होता. मगाचची गोष्ट विसरून जावी ...

" दस मिनिट मे हम मुंबई मे लँड करेंगे !!" इति सुन्दरि...

तेवढ्यात...

"आय एम् युवर कैप्टन (श्री) जॉन (का कोणीतरी) स्पीकिंग.. वी हव जस्ट कम टू नो द्याट .. "

"मुंबई विमानतळ खूप व्यस्त झाल्या कारणाने आपल्या विमानाला तासभर उशिरा लँड करायला सांगितलं आहे...।"

"काय ? "

"म्हणजे दिवस बरोबर होता. मघाशी हवेत ट्रेलर होता... आता आहे पिक्चर... "

त्या तीर्थ प्रसादाच्या नादात बाटली भर एक्षटरा पेट्रोल घायचं विसरला असलां तर मी त्या जॉन च्या बच्च्याला सोडणार नव्हतो...

सुदैवानं पेट्रोल होतं.. अर्ध्याच तासात विमानतळावर जागा झाली आणि विमानानं हुश्श केलं

"वन्दे मातरम्!!!" "वन्दे मातरम्!!!" "वन्दे मातरम्!!!"

"जगात कुठेही जावा काहीही करा आपल्या देशात परत आल्यावर जो काही आनंद मिळतो तो काही औरच! ", माझ्या शेजारचा माणूस म्हणत होता

"खरंच! मी हात मिळवत म्हटलं.. " "वन्दे मातरम्!!!"

विमानतळावर : -

विमानातून बाहेर पडून विमानतळावर आलो.. "सिंगापुरा"शी मनातल्या मनात तुलना झाली नाही असं म्हटलो तर ते "झूठा सच", आपलं.. "सफेद झूठ" म्हणावं लागेल... पण विमानतळावर " अंडर कंस्ट्रकशन " बोर्ड पाहून बरंही वाटलं.. "सुधारेल!! नक्की !! ""

तेवढ्यात "खळळ!!!" आवाज आला.. " बोम्बला! "

" कामगारांना राग आला वाटतं!!!" पण नाही.. हा दुसराच आवाज होता!! कुठलंही शुभ काम करायच्या आधी नारळ फोडायची आपली परंपरा आहे। देशात पदार्पण करायच्या आधीच त्यानं विमानतळावरच तिर्थाची बाटली फोडली होती। "ड्युटी फ्री!!! दारू !!!" " जय हो!!! " सारं विमानतळ पावन करत साहेब इमिग्रेशन कौंटरला पोहोचले..

परत सुगंध(!) दरवळला..

नशिबाने कस्टमच्या लोकांनी काही त्रास दिला नाही.. लगेच बाहेर क्ष. ट्रवल्स चे लोक उभे होतेच.. त्यांना नमस्कार करून (५५०रुपये फक्त) गाडीत प्रवेश मिळवला आणि सुटकेचा निःश्वास सोडला...

देस मे !!!  ♪ 

ट्रॅवेलस मधे : -

"२ तास "

"गाड़ी कधी सुटणार" चं हे उत्तर होतं..

"बोम्बला.." ( कंटाळा आला बोम्बलाचा... )

"अरे, किती उकडतंय! ए सी लाव.. "

" धूरररर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र... (ए सी चालू.... )"

"हा... "

(2 मिनिटांनी... )

( अर्र. पात्रांची ओळख राहिलीच.

"अरे" :- पोरया / क्लीनर..

"अरे" म्हणणार्‍या :- एक काकू.. (अबुधाबी रिटर्नड!! )

त्यांच्याशी बोलणारे, एक काका..(डू बाई रिटर्नड!! )

अर्थात मी.. (लाल..) ( lol )

( नंतर जॉइन झाले : - एक " सिंगापोर रिटर्नड "! ; एक " कुठलातरी रिटर्नड "! )

"ये ऐसे नाही चालू करेंगे। इन्को बताना पडेगा।" " अरे"रावी करणार्‍या काकू बोलल्या।"किसीको निचे जाके उससे बोलना होगा..."त्यांनी आळिपाळीने सर्वानकडे बघितले. सगळेजण झोपले होते. (नाटक.)बोटं मोडत त्याही झोपी गेल्या.(खरोखर)॥ विमान चालू झालं. हळूहळू वेग आला. आता टेक ओफ. अरे... अरे... ही धावपट्टी जराजास्तीच मोठी आहे! खिडकीतून बघतो तर शेजारी "मोटर साइकल"॥! गाडी चालू झाली होती... ए सी च्या कृपेने मलापण झोप लागली होती...मुंबई पुणे. ५ तासांचा प्रवास. "टाइम स्टँड्स स्टिल" का काय म्हणतात ते साधारण काय असावं याचा अनुभव आला. बिल्डिंग्स दिसायल्या लागल्या की वाटायचं "आलं वाटतं॥ "जाग आली तेव्हा कजाग काकू जाग्याच होत्या. त्या हसल्या... मी पण हसलो.कुठे जायचंय तु(म्हा)ला ?कोल्हापूर.. पुण्यात म्हणताय का? स्वारगेट... "अरे.. इनको लास्ट मे ड्रोप करो. ".... "अरे" ला.."काय??? " "बाकी लोगोनको छोडके आपको छोडेन्गे.. " मला ना कळल्यासारखं काकू म्हणाल्या.."आखिर क्यों ?" मी विचारलं... "मला अजुन ५-६ तास प्रवास करायचा आहे. तुम्हाला १५-२० मिनिटं उशीर झाला तरी काय फरक पडेल??"ते:- "नाही नाही..." आता मी सगळ्यांचा वैरी झालो होतो..."एवढा प्रवास आहेच... अजुन एखादा तास... काय? हेहेहे.... " मी १ ते शंभर आकडे मोजत होतो...पाचशे मोजले तरी वैताग कमी होत नव्हता.. जाग आली तेव्हा एकजण खाली उतरला होता.. रस्त्यावर एकाला विचारात होता.."यहाँ लेडीज हॉस्टेल कहाँ है?? " प्रश्न विचारलेला माणूस नापास होऊन निघून गेला. जाता जाता काहीतरी पुटपुटत गेला. "अरे.. मैं प्रोफेसर हु.." "प्रोफेसर हॉस्टेल भी वही हैं".... का असं काही बोलत होता... तो उतरता झाला, आणि आमच्या गाडीला सिंगापुरकर साहेबानी "चलो कोथरूड" असा संदेश दिला..चांदणी चौक ला पण लोकं कोथरूड म्हणतात... "इथनं आत घ्या. हां.. आता डावीकडून उजवीकडे... तिसरी गल्ली."... आता थोडंच राहिलं.. ..........हां. ह्या गल्लीत शेवटचं घर.. हा. ही बिल्डींग. बास.. " "नाही.. कितव्या मजल्यावर घ्यायची तेही सांग..... " मी म्हणणार होतो...काकूनीही असाच गोंधळ घातला. पण माझा पेशन्स संपला होता. मी झोपलो ते डायरेक्ट स्वारगेट आल्यावर.ट्रॅवेल्ज़ चा बुकिंग केलं. घरी फोन केला. अजुन पंधरा मिनिटं होती गाडी सुटायला..पटकन चहा पीऊया... आणि.... जवळजवळ १० महिन्यांनी मी भारतात पहिल्यांदा चहा पिला.(/ प्यायला.)बघतो तर काय? शेजारी बटाटेवडा. बटाटे-दुग्ध-शर्करा योग! लगेच भूक भागवुन घेतली.चहावाल्याने २ रुपये परत केले. " अरे??? "... बदलानबद्दल मी उत्सुक असतो.. पण एवढा बदल?? मी नाही हे बघून भारत सरकारनं दोन रुपयांचं नवीन नाणं छापून(पाडून) घेतलं?? पण जरा गरीब नाणं दिसत होतं.. एक रुपयासारखं.. ते खरं आहे असं वाटतंच नव्हतं... नंतर कळलं की त्यावरून वादही झाले म्हणे.... त्यावर क्रॉस असल्यामुळे... अवघड आहे...तासाभराने गाडी सुटली. डायरेक्ट कोल्हापुरला पोचता पोचता जाग आली.. "पंचगंगेला" .. "वेशीवरच्या कमानीला" आणि "अंबाबाई -ज्योतीबाला" नमस्कार करून कोल्हापुरात प्रवेश केला..स्टंडवर आईबाबा वाट बघत होते.. बाबांचं टिपिकल " वेलकम तो कोल्हापूर" आणि आईचं टिपिकल "दमला असशिल.. हे घे (यळगुड छाप सेण्टेड) दूध..." झालं... आणि थोड्याच वेळात घरी पोचलो... भाग २ : - परत जाताना : - (पुढच्या शनिवार लिहिणार) अर्थात : - क्रमशः...
यात्रा भाग २ इथे वाचा : )
यात्रा भाग २मंगळवार, ४ मार्च, २००८

"घर-घर"

अपेक्षा : २ बी एच के.
बजेट : क्ष क्ष लाख. (स्वतःची थोडीफार जी काय लायकी आहे ती अशी चारचौघात हे सांगून घालवून घ्यायची इच्छा नाहीये. सबब " क्ष क्ष " )
बरोबर समजलात. घर घेण्याचा कर्तव्य आहे...
या "क्ष क्ष "ची किम्मत, जी २५ पर्यंत होती, ती किती वाढावी याला काही मर्यादा?"कोणी देइल का हो? त्याच पहिल्या किमतीत घर?"
मला आजकाल पटु लागलंय, की घर घेताना जी काही घर घर होते, ती सोसल्यावर माणूस बहुतेक वेडा होतो, आणि मग येइल त्याला आपला घर दाखवून दाखवून वीट आणतो. मी अजुन घर घेतला नाही आहे, नुसत्या "साईट्स", "लोकेशन्स", "प्लान्स" आणि "सैम्पल फ्लैट" पाहून, हा ब्लॉग लिहितोय. त्यावरुन मी म्हनू शकतो, "लक्षण दिसू लागालियेत.." अजुन एक लक्षण म्हणजे, "कधी आलास पुण्यात"चं उत्तर मी "कोथरुड किंवा सिंहगड़ रोड किंवा तत्सम काही" देऊ लागलो आहे..

"घर घेतोय्स?" "पुण्यात??" "आत्ता नको घेउस.. अजुन "*अ" महीने थाम्ब!! अशा कीमती कमी होतात की बघ.."
"*अ :- अ म्हणजे नक्की किती? असंख्य?"
मागच्या वर्षी विचार केला, "थोड़े थाम्बुया.. "अ" महीने झाले की घेउया.."
साधारण "अ + अ + अ " महीने होउन गेले. आता "अबब " म्हनाय्ची वेळ आली.
आता हे सांगणारया माणसांची तरी काय चुक आहे, त्यांना कोणीतरी जे सांगेल ते ते आपल्याला सांगतात.
चांगलं आहे. पण असा सांगनारे परस्परविरोधी भाकित करून आपल्याला गोत्यात आणतात..
ह : "आता रिअल इस्टेट सारखी गुन्तवणुक करायची गोष्ट नाही !!! "
ळ : "रिअल इस्टेट मधे काय गुन्तवणुक करतोयस?? त्यापेक्षा "द" मधे टाक..ऐक!"
मी : "अं??"

घराच्या कीमतीचा आकडा थोडाफार ऐकून होतो, पण "प्रत्यक्ष बिल्डर कडून" ऐकताना ज्ञानेश्वरांना " प्रत्यक्ष रेड्याकडून " ऐकताना जे फिलिंग आलं असेल तेच मला आलं! (मी ज्ञानेश्वर नाही, आणि जे म्हटलं गेलं त्यात काही साम्य नाही. कोणी म्हटलं त्यात थोड़ा साम्य वाटलं, इतकंच..)

बिल्डर!!!"
:- व्यायाम न करता , "विटा माती दगड" यात नाचणारा आणि नंतर आपल्याला त्याच्या तालावर नाचवणारा..
"घर घ्यायचन" म्हटल्यावर हा दूसरा बिल्डर भेटला. अर्थात तो भेटला नाहीच. "शेक्रेटरी म्यादम" भेटल्या..
म्यादम म्हणायचं कारण असं, की "म्या काहीही बोलायला लागलो की त्या दम द्यायच्या.."

"या. घर कोणाला .घ्यायचय??"
"मला."
"तुम्हाला?? एक मोठा पॉज.... बर, बसा.."
(मला वाटलं, उभ्या-उभ्याच ऑडिट काढणार का काय?)
"बजेट किती आहे? "
"क्ष + ज्ञ "(लाख आद्ध्याह्रुत असतो.. )
"मग तुम्हाला या फ्लैटची माहिती कशाला हवी आहे? हा तुमच्या बजेटच्या बाहेर आहे.. "
"मित्रासाठी पण चौकशी करतोय.. " (साफ झूठ!)
"("वाटलंच मला" या सुरात..) ठीक आहे, मित्राला पण यायला सांगा."
"हो सांगतो. येइल तो. (वाट बघा.)

"आत्ता आपल्यासमोर जो आहे तो "अ ब क ज " एक अ-भारतीय नाव"!! "
(मी ) "खरंच??"
"हो हो अगदी खरं. पुर्वेला दार. पश्चिमेला पण आहे..) "
(किती बोलतायत...)" तुम्ही बसला आहात, तिथे प्ले ग्राउंड ! तुमच्या मागे स्विमिंग पूल. इथे डावीकडे मंदीर. उजवीकडे ब बिल्डिंग. त्याच्यामागे क ड इ अणि ...एक छोटा पॉज "
"फ" (हेही तीच म्हणाली. ते मी म्हणावा अशी अपेक्षा होती का काय माहिती? )
"इथे ह्यँव आहे आणि त्यँव आहे. अमुक तर ओब्वीयसली आहेच, पण तमुक पण आहे.... "
"पाणी घेणार काय?"(असं मी बोलणार होतो... )
"अजुन आत्ताच सरान्नी सांगितलंय.. :- हेही अणि तेहि देणार आहे.. किम्मत तीच!!!"
( अगदी "द्या टाली" च्या सुरात... )
"11 व्या मजल्यावरून व्यू छान दिसतो."
"एकंदर लग्ज़ूरियस आहे म्हणायचा.." (मी हसत)
"(हसा तो गिर्हाईक फ्सा )"तीही हसली..

"तुमच्या " " प्रोजेक्ट ची माहिती सांगाल का? "

(एक किलर कटाक्ष टाकून..) "आधी सांगते आहे ते तर ऐका..."
"तर कुठे होते मी?"
"11व्या मजल्यावर.. "

माझ्या मनात दुसराच विचार चालू होता. स्कीम्सना असली "आंग्ल" किंवा "अ-भारतीय" नावं का द्यायला हवीत??
शोभतं तरी का?? पत्ता कसा होईल??
उदा. नाव: सौ. ऐश्वर्या. राहणार: "४२० , शू हाइम", भोसरी, पुणे.
किंवा मग, श्री. हृतिक. राहणार: "३२, मोंटे विल्ला ", वारजे, पुणे .

अशा तर्हेने त्या म्यादम चा दम खाऊन "आत्ता एक काम आहे, ते करून, उद्या परत येतो" म्हणून तिथून निघालो...

बघू
..
"राहीले अनंत तैसेची राहावे.." असा काहीतरी विचार करीत गाडीला कीक मारली... (क्रमशः)