शनिवार, १५ जून, २०१३

निमाचा निमो

हितगुज - मायबोली दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित - 


निमोचा पिक्चर' पाहिल्यावर मी अगदी ठरवूनच टाकलं की बाबांना सांगायचं, "मला निमो पाहिजे!" म्हणून.

पण बाबांना सांगितल्यावर ते म्हणायला लागले, की "अगंऽ.. निमो तुझ्यासोबत रहायला आलाऽ, तर मग त्याच्या बाबांना चैन पडेल का? रात्र झाली की मग निमो इथे आपल्या घरात रडत बसेल आणि निमोचे बाबा तिकडे समुद्रात. मग???"

"होईल हो सवय त्यालाही" मी म्हटलं तसे बाबा अचानक उठून निघूनच गेले.

शनिवारी बाबाच मला शाळेतून परत घेऊन जायला आले. खरं तर ते खूप हसत होते पण हसत नसल्यासारखं दाखवत होते. तरीही मी ओळखलंच. आम्ही घरात शिरताच त्यांनी माझ्या डोळ्यावर असा हात धरला आणि आंधळी कोशिंबीर करत मला आत नेऊ लागले. "अहो काऽय बाबाऽ?" मी ओरडलेच, पण खोटंखोटं! मागल्या वाढदिवसालाही बाबांनी असंच केलं होतं. काहीतरी छानसं गिफ्ट द्यायचं असलं की बाबा असंच डोळ्यावर हात धरतात आणि आंधळी कोशिंबीर करून थेट गिफ्टपर्यंत नेऊन मग डोळे उघडवतात. 'वाढदिवसाला तर अजून एक महिना आहे. मऽग? की आधीच देणारेत गिफ्ट?' मला काही सुचेना. डोळे किलकिले करून बघायचा प्रयत्न केला, पण काहीच दिसत नव्हतं. त्यामुळं मी तशीच चालत राहिले. मला खरं तर खूप हसू येत होतं, पण मी हसत नसल्यासारखं दाखवत होते. बाबांनी ते ओळखलं तर नसेल ना?

आमची आंधळी कोशिंबीर थांबली ती बाथरूमसमोर. मी गुप्पचुप्प आजूबाजूला पाहून घेतलं, पण प्रेझेंट कुठ्ठेच दिसेना. मला थोडासा रागच येऊ लागला पण मी तसं दाखवलं नाही. मग बाबांनी पुढे होऊन दार उघडलं आणि आत बघते तर काय? 'निमोचं मोठ्ठं चित्र!' निळ्याशार समुद्रात निमोचे बाबा आणि त्यांच्या पंखांमधे छोटास्सा निमो. किती छान दिसत होते दोघे.
"आणि निमा, ह्यावर पाणी पडलं तरी काहीसुद्धा होत नाही, माहितीये?" बाबा सांगायला लागले.
"होऽ, म्हणजे वॉटरपूऽफ ना?" मी म्हटलं, आणि बाबा हसायलाच लागले. मी थोडी चिडलेच आणि आपलं-आपलं निमोकडे बघू लागले. निमोचा तो केशरी रंग मला फार फार आवडतो. मीही निमोसारखीच केशरी केशरी असते आणि त्याच्यासारखेच माझ्या अंगावरही केशरी-पांढरे-काळे असे चट्टेपट्टे असते, तर किती छान झालं असतं असं मला नेऽहेमीच वाटतं. पण मी ते बाबांना सांगितलं नाहीये. कारण मी काहीही म्हटलं तरी ते हसतात.

"बाबाऽ मला निमोचं चित्र खूऽप खूऽप आवडलं". रात्री झोपायला जाताना हे बाबांना सांगून टाकायचं असं मी ठरवलंच होतं. मी असं सांगितल्यावर बाबा परत हसले. "पण बाबाऽ, मला किनईऽ खराखरा निमो हवाय होऽ" मी मनातलं खरंखुरं सांगून टाकलं. पण बाबा चिडलेही नाहीत आणि नेहेमीसारखं "पुढच्या वर्षी बघूया हंऽ" वगैरेही म्हटले नाहीत. म्हणजे जर का मी परत 'टॉमी' किंवा 'मनी' पाळूया असं म्हटलं असतं, तर ते चिडलेच असते हंऽ बहुतेक.

"बरं, उद्या बोलूया हंऽ", म्हणून ते मला थोपटायला लागले. त्यांच्या एकसारख्या थोपटण्यानं मला खूप छान वाटायला लागलं. एकदम गारगाऽर.. मला झोपच लागणार होती, तेवढ्यात मला निमोची हाक ऐकू आली. तो मला खेळायला बोलावत होता. मी चटकन उठले आणि पोहत पोहत त्याच्या मागे निघाले. "फार लांब जाऊ नका". बाबा मला पंख हलवून सांगत होते. मी आणि निमो दोघेही हसलो, आणि त्यांना बायबाय करून निमोच्या घराकडे खेळायला निघालो. मला खूऽप मज्जा वाटत होती.

* * * * *

सकाळी उठल्यावर मी दात घासायला गेले, आणि तिथे अचानक माझा 'निमोच' दिसला. अशी कशी मी!! विसरूनच गेले होते त्याच्याबद्दल. आणि "उद्या बोलूया हंऽ " म्हणून बाबा म्हटले होते, ते!!
'चला!' म्हणून मी उड्या मारतच बाहेर गेले. बाबा पेपर वाचत होते.
"बाबाऽ"
माझ्याकडे पहात "आधीऽ दाऽत घास. तोंड धूऽ" म्हणून बाबा मोठ्यानेच बोलले तशी मी परत बाथरूममधे गेले आणि पटकन दात घासून, तोंड धुऊन बाबांकडे आले.

"बाबाऽ"
"तोंड नीट पुसलं नाहीयेस. आरशात बघ. जा पूस आधी" बाबा म्हणाले तसं मला फार वाईट वाटलं. बाबांना ते कळलं का काय माहित, त्यांनी मला उचलून घेतलं आणि स्वतःच माझ्या तोंडावरून पाण्याचा हात फिरवला आणि नॅपकीननं तोंड पुसलं.

"बरं, निमो आणूया आपण. पण त्याची काळजी कोण घेणार?" बाबा म्हणाले.
"हे बघा बाबा. सोप्पं आहे. ते सगळं मी करीन. मी जेव्हा जेव्हा खाईन तेव्हा तेव्हा त्यालाही खायला देईन. पाणी तर ते आपले आपण पितील ना?" मी म्हटलं.
"बरं, पण त्यांचं शीशुविहार कोण करणार?" असं बाबा म्हटले आणि मला फारच घाण वाटलं. "ईईऽ शीशुविहार मी नै हं करणार बाबा. ते लहान आहेत तोपर्यंत तुम्ही आणि ते मोठे झाले की आपलं आपण करतील. मी फक्त खायला देणार.." मी सांगून टाकलं.
"आणि ते आजारी-बिजारी पडले तर?" बाबांनी मला विचारलं.
"म्हणजे तापबीप ना? सोप्पं आहे. तुमच्याकडूनच कॅप्सूल घेऊन त्यातल्या गोळ्या देईन." मी सांगितलं आणि बाबा परत उगाचच हसायला लागले. मी दुर्लक्षच केलं. "सांगा ना बाबा, कधी आणूया मग निमोला?"

* * * * *
"बाबाऽ, उद्या माझा वाढदिवस आहे ना? मग मला लवकर उठवा हंऽ" मी बाबांना सांगून ठेवलं. ते हो म्हणाले.
सकाळी बाबांनी एक हाक मारताच मी उठले. मला लक्षात होतं, की आज माझा वाढदिवस आहे ते. बाबांनी मला उचलून घेतलं आणि माझी एक पप्पीच घेतली. मी बाबांच्या गळ्यात हात घालून हसत होते. म्हणजे त्यांना ते दिसत नव्हतं, पण मी हसत होते. त्यांनी जे मला उचललं ते थेट बाहेरच्या खोलीत घेऊन गेले. 'आज ब्रश करायला सुट्टी देतील तर काय मज्जा येईल!' मला वाटत होतं.

बाहेरच्या खोलीत येऊन पहाते तर काय!! समोरच्या टेबलावर एक छोटूसा फिशटँक ठेवलेला दिसत होता. आणि आत होता माझा 'निमो'. त्याच्या बरोबर त्याचे दोन काळे-पांढरे पट्टेरी उंचाडे मासे आणि दोन गोल्डफिश मित्रपण होते. फिशटँकमधे रंगीबेरंगी सागरगोटे आणि छोटुले शिंपले दिसत होते. एक काळं बुडबुडे यंत्रही दिसत होतं. बाकीचे सारे इकडेतिकडे फिरत होते, पण माझा निमो मात्र एकसारखा त्या बुडबुडे यंत्राकडे जात होता. मी तिकडे टकटक केलं तसा तो घाबरला आणि दुसरीकडे जाऊन पोहायला लागला. मला खूप मज्जा वाटली.

त्या चट्टेरी-पट्टेरी काळ्यापांढर्‍या माशांमधला एक मोठा गमत्या होता. बाकी सगळे पुढेपुढे जात होते, आणि हा मात्र वेडूसारखा मागेमागे जात होता. मी त्याला ओरडून ओरडून सांगत होते, की अरे वेड्या, असा मागेमागे नाही, पुढेपुढे पोहत जा. पण त्याला कळतच नव्हतं वाटतं. ते गोल्डफिश मात्र छान पोहत होते. बाबा उगाचच हसत होते.

मी त्यांना सगळ्यांना ब्रेडचे तुकडे खायला दिले. गोल्डफिशने लग्गेच खायला सुरु केलं. काळेपांढरे बिच्चारे असं काय करत होते काय माहित? एकदा ते घास थोडासा तोंडात घ्यायचे, मग तो परत बाहेर काढायचे. मग परत तेच... शेवटी मला समजलं की त्यांना छोटे घास करून द्यायला हवेत ते. म्हणून मी छोटेछोटे घास करून टाकले. पण तेही लगेचच येऊन त्या गोल्डफिशनेच खाऊन टाकले. निमो मात्र थोडंसंही खात नव्हता. मी बाबांना विचारलंही. ते म्हणाले, की त्याचं पोट खराब असेल. बाबा काहीतरीच बोलतात. निमोनं काहीच खाल्लेलं नव्हतं, म्हणून अजून थोडंसं खायला देऊन मी तिथून निघाले.


* * * * *

रात्र झाली तशी मी निमोला बायबाय करायला गेले. निमो तिकडेच बुडबुड यंत्राजवळ बसला होता. बाकीचे चौघे इकडे तिकडे करत होते. मी टकटक केले तर परत निमो तिथून धूम पळाला. मला बाबांचं बोलणं आठवलं. 'त्याला एकटं वाटत असेल तर??' मला तर रडूच यायला लागलं. मी धावत धावत बाबांकडं गेले आणि त्यांना सगळं सांगितलं.

बाबा निमोला बघायला आले. त्यांनी सगळ्यांकडं नीऽट बघितलं. हाताच्या बोटांवर काहीतरी मोजल्यासारखं केलं आणि अचानक "अरेच्च्या!" म्हणाले. "काय झालं बाबा?" मी विचारलं. तर बाबा म्हणाले, "मीठ!"
"काय?" मी म्हणाले.
"मीठ गं मीठ! खडामीठ!"

बाबांनी कपाटाचा कप्पा उघडला आणि आतून ते मोठ्ठं मोठ्ठं खडा मीठ काढून माझ्या हातात दिलं. "बघ, मूठ दोन मूठ टाक", मला म्हणाले. "अहो खारट होईल ना पण मग ते!" असं मी बाबांना चिडून म्हणणार एवढ्यात मला आठवलं, की हे जर समुद्रातले मासे असतील तर ह्यांना खारट पाणीच हवं असणार. कारण समुद्राचं पाणी खारट असतं. मी दोन मूठ भरून मीठ टाकलं आणि तिथंच बसून राहिले. मी टाकलेल्या मीठातून छोटुले बुडबुडे तयार होऊन वरवर जात होते. हे खडामीठ तळाशी जाऊन पटलं, तसं ते अगदी समुद्रात बर्फ पडल्यासारखं दिसत होतं. मला खूऽप मज्जा यायला लागली.


बर्फ विरघळू लागला तशी मी तिकडेच पहात बसले. तेवढ्यात माझं लक्ष निमोकडं गेलं. खार्‍या पाण्यात निमोही पोहू लागला होता. बहुतेक निमोला हळूहळू आमच्या फिशटँकची सवय होऊ लागली होती..

रविवार, ९ जून, २०१३

मैं पल दो पल का ब्लॉगर हुं…

परवाच एका न्यूज च्यानेलावर चर्चा चालू होती... "पाचसहा वर्षांपूर्वी अचानक ब्लॉगर्सचं पीक आलं होतं. आता कुठे गेले सारे!?", त्यातल्या एकांचं मत पडलं.

मला प्रश्न बरोबरच वाटला. मी स्वतः देखील लय ब्लॉगरगिरी करायचो. आता कुठला ब्लॉग आणि कसचं काय!? साहिर लुधयानवींना मनोमन  नमस्कार करावाच लागला,

मैं पल दो पल का ब्लॉगर  हुं…
पल दो पल मेरी कहानी है …
पल दो पल मेरी हस्ती है…
पल दो पल मेरी ….

… गाणं काही सालं पूर्ण करवेना. जिंकलात साहिर शेट ! म्हणजे परत फिरून वयाकडेच! आपलं वय वाढावं असं कधीच, कोणालाही  वाटत नसतं, पण ते वाढतं खरंच. बहुतेक मग  ब्लॉगचंही वय असावं, आणि तरुणपणीचा उत्साहही.. ब्लॉगचंही वय वाढत असेल, तर ब्लॉगही परिपव्क व्हायला हवा. चायला, पण म्हणजे काय म्हारा ब्लॉग म्हातारा  हो गयेला है की क्या? काय समजावं??

प्रत्येकाची ब्लॉग सुरु करण्यामागची कारणं अनेक, तशीच तो बंद पडण्याचीही अनेक असतील. माझं कारण? काय माहित?! ब्लॉगर्स ब्लॉक वगैरे शहाणपणा ….  नको! ते राहुदेच .....

जूनचा महिना आहे, पहिला पाऊस नुकताच झाला. हुशार्गीरी करत काहींनी फेसबुकाव म्हणून घेतलं, "पळा पळा नाह्यत पावसाळी कवितावाले येतील! "
लेकाच्यांनो!?!? तुम्हीही त्यातलेच एक होतात! विसरलात ???

मी पा. क. ही पाडली नाही आणि बोंबही मारली नाही. ब्लॉगचं बंद होणं म्हणजे हेही आहेच की… बरं, प्रत्येकवेळी शहाणपणाच सुचायला आम्ही काही आयन्स्टायनाचे चुलतेपण नव्हेत!

पण ते  काहीही असो, घेतला वसा टाकायचा नाही वगैरे म्हणत तूर्तास मनात इतकंच आहे, की परत पुर्वीसारखं व्हायचं. पावसाला एकट्याने पडून नदीनाल्यात मिसळू द्यायचं नाहीच! पावसाचे तरंग मनावर उमटले तर मनातच ठेवायचे नाहीत. हा पाऊस वाया घालवायचा नाही. साहिरशेटचा शेवटच खरा करायचा…

मैं हर एक पल का ब्लॉगर  हुं…
हर एक पल मेरी कहानी है …
हर एक पल मेरी हस्ती है…
हर एक पल मेरी जवानी है …