मंगळवार, १२ एप्रिल, २०११

आजा नच लेऽ नी आजा नच लेऽ!!!


काही काही मित्र कसे बोलावलं की लगेच येतात!
काही काही तर त्यांची मनातच आठवण यायचा अवकाश! कसे काय माहीत, पण लग्गेच येतात.
आपण मग 'आयला! आत्ताच तुझी आठवण काढली होती !"
......... पाऊस लेकाचा अगदी 'ये रे ये रे' म्हटलं तर 'हा आलो!' म्हणत शेवटी न येणारा मित्र.
म्हणजे दिसतंय त्याला की इथे उकाडा वाढलाय. दुपारी बाहेर निघवत नाहीये.
पण पाऊसच तो. तो काही असा स्वस्तात नाही येणार. मजा बघत बसणार!
मधेच मग शनिवारी किंवा रविवारी दुपारी वगैरे फुल्ल माहोऽल बनवणार, 'आता येतो! 'हं' काय रे? '
आपण काय? 'हं!' म्हणत वाट बघत बसतो. तो नेहेमीप्रमाणे आपल्याला टोपी लावून गुल!
दुसर्‍या दिवशी हिरो मग परत आकाश भरून आणतो, पण आता आपण सरावलेलो असतो..
'मला माहितीये रेऽ. लय बघितलाय तुला. जा. 'गरजेल तो... ' बर बाबा! आलास की फोन कर.... '
मधेच मग तो दोनचार 'मिस्ड कॉल' देतो, पण त्या आपण त्या विजांनाही अंडरएस्टिमेट करतो आता. 'अरे हटा सावन की घटा!' म्हणत बाईकवर बाहेर पडतो.
संध्याकाळी ६.३० ची वेळ, नेहेमीपेक्षा जास्ती अंधारून आलेलं. अंधारून म्हणण्यापेक्षा सगळीकडे पिवळसर उजेड. परत एक मिस्ड कॉल! हा मिस्ड कॉल ऐकू येतोच, पण त्याआधी स्क्रीन फ्लॅश होते! मग दोन-एक क्षण तो पिवळसर उजेड अचानक फिका पडतो, आणि वीज कडाडून जाते!
आपण स्तब्ध! 'येतोय वाटतं आता खरंच!'...
'आलास मित्रा??' आपल्या मर्जीचा मालक तू! ये म्हटलं म्हणून येणारेस थोडाच?? आता येतोच आहेस तर ये, पण जऽरा थांब. घरी पोचायला थोडासाच वेळ लागेल. घरी पोचतो. मग बसु, गप्पा मारू! काय??
यातलं काहीही ऐकायच्या फंदात न पडता आपला हात धरून तो आपल्याला बाहेर खेचतो.
आता 'रेनकोट नाही!' हे काय खुद्द पावसाला सांगणार? का मग 'फार भिजलं की सर्दी होते अरे! ' म्हणणार? आणि मग उन्हात मरगळलेलं मन गार करण्याची संधी सोडणार?
आजही हिरो असाच आला खरा, येताना एका मित्राला घेऊन आला. मित्र गायक! पावसाचाच मित्र, तितकाच उत्साही! पाऊस खुशीत गडगडतो आणि लागलीच मित्र 'बाली सागू' गाऊ लागतो, "आजा नच लेऽ,
नी आजा नच ले~!" "चल, सरक पुढं, ट्रिपली जाऊ!" म्हणत पाऊस आपल्याला पटवतो, आणि आपणही एकूणच त्या 'माहोल' मधे 'खो'तो आणि गाडी थोडी जोरात मारु लागतो!
आता पाऊसही खुश, कारण आपणही त्याला भाव दिलाय! आता त्याची पाळी!
लग्गेच थोडा 'मृदगंध!' देतो सँपल म्हणून! पण थोडासाच कारण रस्ता डांबरी आहे.
"पाय्जे तर टाक त्या बाजूनं. गर्दीपण नाई आणि थोडा कच्चा रस्ता पण आहे. चिखलपण नाहीय. घाल-घाल"
आपण थोड्या खडबडीत रस्त्यावरून मृदगंधाचा फील घेत घराच्या दिशेने!
अर्धाच किलोमिटरचा रस्ता, पण लहानपणाची आठवण करून देतो. नॉस्टॅल्जिक बनवुन सोडतो!
आता हे लहानपण म्हणजे काही 'शाळेतलंच!' किंवा 'कॉलेजातलंच!' असं कोणी म्हणावं? आज आपण काल होतो त्यापेक्षा मोठेच नाही का? मग कालचं आठवलं तरी आजच्या तुलनेत 'लहानपणीचंच नाही का?' असो.
त्या अर्धा किलोमिटर कच्च्या रस्त्यावर जाता जाता मग रेनकोट आठवतात डकबॅकचे! पिवळे! घाणेरडे!
पावसात भिजले की पायाला चिकटणारे. आणि शाळेत जागा नाही मिळाली वाळत घालायला तर संध्याकाळी बाहेर काढले तर घाण वास येणारे. स्टाईल तेवढी 'शरलॉक्स होम्स' ची!
मग ते आणलेले जॅकेट पँट! सकाळी पाऊस पड्लेला असल्यानं, घरातून १० ला निघताना जॅकेट-पँट घालूनच निघायचं. आणि हा लेकाचा काही येत नाही. त्यात उकाडा!
आणि मग पोचल्यावर आपण सरे आऽम, सबके साऽमने, सगळ्यांसमोर ती पावसाळी पँट काढायची. घाण!
मग तेही सुटलं.सुटसुटीत जॅकेट आणि त्यावर मॅचिंग कॅप!
कॉलेजही दूरच होतं तसं, पण तिथे जातानाही केवळ जॅकेट! पावसाळी पँट बंद म्हणजे बंदच! साधी पँट ओली झाली तरी तसंच बेंचवर बसायचं, दोनेक तासात कोरडी! मग हेच लॉजिक जॉबच्या वेळी पहिल्या कंपनीत! कंपनीतल्या एसीने घात केला आणि हुडहुडी भरलेली ! सगळं आठवून गेलं एवढ्याश्या अर्धा किमी अंतरात!
"महाराज, गाडी जरा सांभाळून! वाढवतोय थोडी धार! म्हणजे धारा रेऽ! " - पाऊस! वात्रट लेकाचा. डबल मिनिंग!
बरं आहे. म्हणजे मी धार वाढवतो, आणि तुम्ही त्यात भिजा! 
त्यानं म्हटल्याप्रमाणे धारा वाढतात, आपण चिंब!
अजून बरंच अंतर जायचंय म्हंणत 'चहाची टपरी' शोधणारी नजर पाऊस हेरतोच.
"अबे ऐक. आधी घरी पोचूया, मग कर काय ते चहा/कॉफी वगैरे वगैरे."
त्याला "अरे थंडी!" म्हणावं तर "थांब, मजा बघ! चल! " म्हणत पुढे घेऊन जातो.
भिजत जाणार्‍या पोरी दाखवतो. तिथे जवळ पोचताच जलधारा वाढवतो आणि मजा आणतो!
त्यांची त्रेधा बघुन मग आपणही खुश!
'साला हम अकेलेही ऐसे येडे नहीं | बहुत है यूँ, बरसा मे भिगनेवाले!" स्मित
गाडीचा वेग थोडा वाढवून आपणही खुशीत! ऑईल सांडलं नाहीये ना लक्ष ठेवत हळूहळू मार्गक्रमण!
मधेच हात सोडावेसे वाटतात पण फार वेळ नाही, गर्दी आड येते.
'बाली' बरोबर गावंसं वाटतं! गाऊन घ्यायचं मग! हेल्मेट तर आहेच! शिवाय पाऊस आहे, कोणाला ऐकू जाणारे?
थोडं नाचूनही! पिक्चरमधे हिरो लोक नाचतात तितपत! पण माफकच! उरलेलं मनात!
तेवढ्यात बालीचं घर येतं, तर पावसानं पुढच्याला बोलावून ठेवलेलं असतं. त्याला ट्रीपली घेऊन 'तुम से ही' म्हणत पुढे! मग 'इब्न-ए-बतुता', 'जब मिला तु', 'इसी उमर मे!' एकेक मित्र पण ह्याचे!
घर जवळ येत जातं तसं मग थंडी वाढत जाते. हे मानसिक असावं, पण जाणवतं खरं!
मग घरही येतं! आता काहीतरी गरमागरम!
"चल की घरी!" म्हणावं तर हसतो नुसता!
"परत येईन!" म्हणतो.
आता ह्याला आग्रह तरी काय करावा? हात हलवावा तर हा परत धार वाढवून कुरापत काढतो. गडगडाटी हसतो आणि 'चल भेटू परत....' म्हणून निघुन जातो.
पावसाबरोबर कंपनी ते घर गाडीवर -> चेक!
घराजवळ पोचल्यावर वडाप्पाव (२ नग) -> चेक!!
घरी आलं घालून चहा! --> चेक!!!
चहा घेऊन परत गॅलरीत जाऊन पावसाला हात करावासा वाटतो. 'धन्यवाद मित्रा!' म्हणावसं वाटतं.
बाहेर यावे तो लेकाचा परत अंगावर हलकेच जलधारा सोडतो.
मन हसतं! म्हणतं,
"बेटा! चल, नच ले! आज नच लेऽ!
आजा नच लेऽ नी आजा नच लेऽ!!!"

२ टिप्पण्या:

jagrut म्हणाले...

lai bhaari re...!! shala-raincoat vagire ekdam perfect varnan han.. aaila..jam vaitag yaycha han tya raincoat cha..chan..maja aali vachtana...aani yevdha motha gap nako ghet jaus...mahiti e tu far busy asto te..

ऋयाम म्हणाले...

खरंच वैताग होते रेन्कोटस्
लिहीत जाईन रे नियमित.

@आभार्स! :)