शनिवार, २९ मे, २०१०

बाबा... लगिन!

"बाबा... लगिन.... " "बाबा... लगिन.... "
देवाच्या कृपेने, असं काही करायची वेळ आली नाही माझ्यावर.
रितसर जसं शिक्षण, नोकरी लागली, तसंच मग "आता 'नो' आहे तर 'छो'चंही बघां... कसें...?" असं म्हणणारे काही पुण्यवान लोक आमच्या तिर्थरुपांना( म्हणजे तिर्थरुप आणि तिर्थरुपा दोघांनाही) भेटले आणि गंगेत घोडं..............

नाही नाही नाही... काही गोष्टी असतात, ज्या इतक्या लवकर आणि सहज पुर्ण होतच नाहीत. त्यात तो "कावळा छाप" अशुभ कार्यक्रम प्रसिद्ध असला, तरी "ह्या शुभ" गोष्टीलाही "घडुन यायला" जितका वेळ लागतो, तितका इतर कुठेच लागत नसावा... उदाहरणच घ्यायचं झालं, तर ते "इंजिनीअरींगचं अ‍ॅडमिशन". किंवा "दहावी-बारावीचा निकाल" घ्या. किती वेळ लावावा? आता यापैकी निकालाबद्द्ल तितकी घाई नसते हा भाग निराळा, पण या कशाचीही तुलना, "बाबा, लगिन" शी होणार नाही, हे मात्र खरं!

मधल्या काळात मग असे बरेच पुण्यवान लोक घरी आले.
"काय? कधी येणार आहेत चिरंजीव??" असा त्यांचा ठरलेला प्रश्न.
"येणार आहे पुढच्या आठवड्यात.", पप्पा.
"अरे वा, वा वा. मग येणार आहे तेव्हा एकदोन कार्यक्रम करुन टाक म्हणावं, काय?", हसत हसत, पुण्यवान.
"अहो पण हे आपल्या हातात कुठे असतं?" मम्मी तेवढ्यात चहा घेऊन बाहेर.." अहो, आजकालची मुलं ही. आपलं काही ऐकणारेत थोडंच?"
"ते बाकी खरं बोललात हो..." पुण्यवान, "पण आपली मुलं तशी नाहीत हो... आपली मुलं कशी, तर संस्कारवाली! संस्कार चांगले असतात ना आपले! आपल्या मर्जीबाहेर नाहीत हो जाणार..."
"हे बाकी खरं हो..." मम्मी हसत गुड्डे बिस्कीट वगैरे देत...

पुढे मग मी गावी परत आलो असताना एकदा माझ्यासमोरच हा कार्यक्रम झाल्यावर, 'पुण्यवान' गेल्याची खात्री करुन मी त्यांना सांगितलंच.. "हे बघा मम्मी-पप्पा.." सगळ्यात आधी म्हणजे तुम्ही हे "आपले संस्कार!" वगैरे करुन उगाच घाबरवु नका. हमारे आदर्श, हमारे पुरखोंकी टींबटींब आणि हमारा खानदान, आन-बान-शान वगैरे सगळं चित्रपटातच बरं. दुसरं म्हणजे "आजकालची मुलं ही... आपलं थोडीच ऐकणार हॅहॅहॅ..." हा डायलॉग लय म्हणजे लयच जुना झालाय. तुमच्या वेळच्या कुठल्याही ७०सालच्या चित्रपटात जाऊन बघा.. ऋषी कपुरच्या वेळीदेखिल त्याचे तिर्थपालक "ये आजकलके नौजवान, हॅ हॅ हॅ" वगैरे म्हणत असली, तरी इतक्या वर्षात काडीचा फरक पडलेला नाहीये "मार्केटमधे"........ आईग्गं!!! "मार्केट" हा शब्द मी उच्चारला मात्र! त्यानंतर जे काही बघितलंय माझ्याकडं मम्मीनं.... पुढं बोलायचे सगळे मुद्दे त्या मुगाच्या लाडवांसोबत गिळुन गप्प बसलो...
ही नोकरी चालु झाल्यापासुन काहीतरी शब्द येतात तोंडात. आणि मग मी असं काही बोलुन गेलो की मम्मी लगेच.. "संस्कार.. संस्कार... चांगलं बोलावं... सगळीकडे नोकरी-बिझनेस नको.. "मार्केट" म्हणे..."

आता तसा काय मी दिसायला वाईट नाहीये, बरा आहे. म्हणजे तसा चांगलाच आहे. मीच कसं म्हणु हो, की फारसा देखणा वगैरे नाही? आता आहे सावळा. उंची चांगली असली, तरी तब्येत बेताची आहे. पण काय बिघडलं त्यात? असतात सामान्य प्रकृतीचे लोक... नसतात उजळ.. सगळ्यांनीच हृतिक असायला हवं असं थोडीच आहे?? त्यात आमचे धाकटे बंधु! दिसायला माझ्याहुन बरेच चांगले, उजळ आणि मस्त बोलबच्चन! त्यांनी १२वीमधेच एक सुंदर पोरगी कटवली.. म्हणजे त्याचं आणि तिचं, दोघांची सुंदर संस्कार झालेली मनं जुळली. मग ते घरीही कळलं.. आणि त्यांचा प्रश्न सुटला.. आता हे पहाता मम्मीचं म्हणणं तसं अगदीह चुक नाही, की "आजकालची मुलं..." पण मी त्यातला नाही हे तिला का कळत नाही? का तिला नक्की काय हवंय??

आता, पुण्यवान लोकांच्या पुण्यावर विश्वास नाही असं नाही, पण हा 'सेकंड ओपिनीअनचा' जमाना असल्यामुळे, मित्रांच्या ओपिनिअनप्रमाणे मी "ऑनलाईन विवाह संस्थांकडे" वळलो. तीन पर्याय होते. "शादी डॉट कॉम", "मराठी मॅट्रीमनी" आणि "जीवनसाथी". त्या शनिवारी संध्याकाळी ऑफिसमधुन लवकर निघालो आणि पंक्याबरोबर बाहेर गेलो. तोच म्हटला होता, लवकर निघुया म्हणुन. ऑफिसपासुन लांब असलेल्या इंटरनेट कॅफेमधे घेऊन गेला. तिथंच त्यानं सांगितलं. "हे बघ... आजकाल हे असं असतं. साईट्सवर.... ह्या तीन मेन साईट्स आहेत. आजकाल "शनिवारी संध्याकाळी" आणि "रविवारी दुपारी" सगळ्या 'लग्नेच्छुक' सुंदर सुंदर पोरी कुठे असतात, तर "इथे" असतात..
* 'लग्नेच्छुक'! काय शब्द आहे! चारचौघात कोणी उच्चारत असेल का हो? "मी सध्या लग्नेच्छुक आहे!"
हा शब्द पंक्यानं उच्चारावा हे ऐकुन मी त्याला 'आपल्या दोस्तीला तलाक तलाक ' म्हणणार होतो. मला असे विचित्र शब्द वापरणार्‍या लोकांचा खुप राग येतो. पण इथं तो मदत करत होता. म्हणुन तलाक कॅन्सल केला..

"तुला खरं सांगतो रे... ", पंक्या म्हणाला... "जितक्या 'सुंदर पोरी रस्त्यावर दिसतात तितक्या इतर कुठेच दिसत नाहीत...' ना कॉलेजमधे. ना क्लासमधे. ना ऑफिसमधे. म्हणुन आता ही साईटच आपली तारणहार आहे बघ... " पंक्या एकदम सेंटी होत म्हणाला होता, " त्यामुळे आता तुझं काही होणार असेल, तर 'इथेच' "! लगेच अकाऊण्ट बनव!
....... "अबे! फोटो लाऊ नकोस!" तो ओरडुन म्हणाला....
......................जाऊदे. आपलाच मित्र आहे बिचारा.. आणि आपल्याच चांगल्यासाठी सांगतोय..

त्याच्यासमोर 'पोरी नव्हे मुली' बघायला लाज वाटल्यामुळे पुढच्या शनिवारी एकटाच गेलो. लाज वाटायचं कारण सरळ आहे. 'एखादा पोरी बघतो आहे' असं कोणाला समजलं की त्यानं जणु काही "पोरं बघतो आहे" अशा आवेशात चारचौघात खोपच्यात घेऊ पहातात. अरे... मला समज आली तेव्हापासुन मी पोरी बघतो. शाळेत. कॉलेजात. रस्त्यावर. सगळीकडे. त्याचीच पुढची स्टेप म्हणजे 'रितसर पोरगी पहाणे'. यात एवढं खोपचेमे काय घ्यायचंय? बर.. आठवड्यात अधेमधे लवकर घरी गेलो की "कांपोका? कांपोका??" अर्थात "कांदा-पोहे कार्यक्रम?" असं विचारतात. '­­पोरी बघु लागलेल्या' माणसानं कधीतरी सहज लवकर घरी जाऊच नये काय?

तर हो. "वेबस्पेस इंटरनेट कॅफे, युटीआय चौक"! गुपचुप गेलो. तिथे पोचता पोचताच पंक्याचा एसेमेस, "तुम नही सुधरोगे पठ्ठे! बघितलं गुपचुप निघताना.. चालुद्या. पण कोणी कडक पोरगी भेटली, तर तिला तश्याच चारपाच धाकट्या कडक बहिणी आहेत का विचारुन घे.. काय? आपल्यालाही चॉईस हवा. नाईका? "
हो! हे सांगायचं राहिलंच. स्वतःची चारचार लग्नं झाल्याप्रमाणे पंक्या मला सांगायचा...
आम्हाला उपदेश करणार्‍यांना स्वतः लय भारी असायची गरज नाही. आम्हाला कोणीही उपदेश करु शकतात...
पण कडक पोरगी हवी आहे वगैरे डायलॉग म्हणजे पंक्याच! त्याचा एसेमेस पाहुन हसत नेटकॅफेमधे शिरलो.

"किती?" मी आत शिरताच, नेटकॅफेमधली पोरगी म्हटली.
"अर्धा तास. नंतर एक्स्टेंड करता येईल का? " मी
"हो. इथं नाव लिहा.अर्धा तास १० रुपये. एक तास १५ रुपये. "
"हो.. थँक्स.."
"पैसे नंतर द्या, जाताना... कुठ्ला कॉम्प पाहिजे?"
"तो कोपर्‍यातला.. "
"बर... मार्स नाव आहे त्याचं.."
"बर... मार्सवर जातो..."

मग कोपर्‍यातल्या त्या 'मार्सवर' गेलो. एकेक करुन तिनही साईटवर लॉगिन केलं. तब्बल १५ प्रस्ताव आले होते! प्रत्येकी पाच प्रमाणे! त्या पोरींची प्रोफाईल पाहिली... सगळ्यांना आपलं ७-८ लाख पॅकेजवाली पोरं हवीत.. पोरींना कळत नाही का? 'आयटीबुम' वगैरे असली, तरी भारतातले लाखो तरुण आयटीमधे काम 'न' करणारे आहेत हे? आणि इतके पगार नसतात आयटेतर लोकांना २६-२७व्या वर्षी हे?
बंद! न्युनगंड येण्याचा आधीच ह्या सगळ्या प्रोफाईल्स बंद करुन टाकल्या. कारण आमच्या बाबतीत तरी अशा गोष्टींमधे उत्साह आणि न्युनगंड यात सदैव न्युनगंडाचा विजय होतो हा इतिहास आहे.

आपणच मस्त पोरगी शोधु म्हटलं मग... चला. वय= .. , उंची= .. , शिक्षण= .. , नोकरी= ..
* आपल्याला 'रंग' ह्या गोष्टीवर शोध घेण्याचा काहीही हक्क नाही हे मला आधीच समजल्यामुळे तो ऑप्शन मी लावलाच नाही. तीनही साईट्सवर हे सगळं सेट करुन "सर्च" बटण दाबलं.........
तब्बल १५ पोरी!
आयला! ह्या त्याच 'प्रस्ताव' वाल्या पोरी होत्या. साईटवर रजिस्ट्रेशन केल्यावर "आपली आवड" का काय मधे त्यांनी बरेच प्रश्न विचारले होते, त्यात जे लिहीलं होतं त्यावर आधारित असाच तो 'प्रस्ताव' संदेश आला होता..
लॉगाऊट करुन साईट बंद.

"हे घ्या. "
"अर्धाच तास? एक्स्टेंड नाही करत का?"
"नाही... विशेष कोणी भेटलं.. आयमीन.... म्हणजे, एक 'इम्पॉर्टण्ट मिटिंग' आहे...हे घ्या. धन्यवाद..."
"बर.. धन्यवाद..."
:| चित्रपटात बघितलेले डायलॉग वापरायची वाईट खोड आहे मला. 'शनिवारी संध्याकाळी 'इम्पॉर्टण्ट मिटींग' म्हणे... जाऊदे.. आपल्याला कुठे तिला परत भेटायला जायचंय....
पुढचा महिनाभर कामात घाईघाईत गेला.

मधे परत एकदा कॅफेवर गेलो... इथेही एक कोपर्‍यातलं मशीन बघुन तिथे बसलो.
तिथे एका मुलीशी भेट झाली. 'अस्मिता' का कायतरी नाव होतं.... सगळे क्रायटेरिआ एकदम फिट्ट! तासभर चॅटींगही झालं. तीनं फोटो लावला नव्हता. म्हटलं आपणही नाही लावलेला. रिस्क दोन्हीकडं सेम आहे. अजुन अर्धा तास बोलणं झालं.. मस्त! मग म्हटलं, आता बास! गुपचुप सीडी बाहेर काढली. त्यात राईट करुन घेतलेला माझा फोटो, दिला पाठवुन...
पुढे एकदा असच, दुसर्‍या एकीशी बोललो. सेम. फोटो नव्हता पाठवला. मग म्हटलं बघु. तिला म्हटलं फोटो पाठव.
म्हणुन तिनं तिचा फोटो पाठवला. तेव्हा समजलं की तीनं "वजन" मधे काही का लिहीलं नव्हतं... जाऊद्या.. दुसर्‍यांबद्दल जास्ती बोलु नये. मी लॉगाऊट केलं. जेणे करुन तिला वाटावं, 'कनेक्शन गेलं का काय!'
आणि लगेच ट्युब पेटली! त्या दिवशी त्या अस्मिताच्या इंटरनेटचं कनेक्शन कसं गेलं ते...

दरम्यान त्या लग्नसाईट्सनी मात्र उच्छाद मांडला. रोज एकदोन एकदोन रिश्ते येत राहिले. मी काही रोज इंटरनेट कॅफेला जात नसल्याने कधी आठपंधरा दिवसातुन एकदा गेलं की हा ढिग इमेल्सचा!
पण ह्या साईट्स बनवणारे मात्र खरंच जीनीअस आहेत. बरोब्बर विवाहेच्छुक लोकांच्या "दुखति रत पे हाथ" वगैरे ठेवतात...

सर्वात आधी म्हणजे "फुकट!" "अहो या तर खरं... हॅहॅहॅ..... " असं लिहीलेलं असतं साईट्सवर...
घाबरत घाबरत जायचं आपण. आणि दुसर्‍या दिवसांपासुन त्यांचं इमेल चालु: - "त्याचं कसं आहे, की तुम्ही आलात खुप चांगलं केलंत. पण मुख्य प्रश्न भरवशाचा आहे. तुम्ही जोवर पैसेच भरत नाही, तोवर तुम्ही खरेखुरे वि.च्छुक आहात हे तिकडच्या पार्टीला कसं समजणार!?"
आपण संभ्रमात! पंक्या होता म्हणुन पैसे वाचले. नाहीतर मी लगेच पैसे भरले असते. पण शेवटी ते वाचले नाहीच म्हणा.. पंक्याला दिलेल्या पार्टीत ते गेलेच. असो...

मग, १४ फेब्रुवारीला त्यांचं इमेल आलं. "काय ABC4321? काय विशेष? सगळं जग आज व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहे. तुमचं काय? तुम्ही काय करणार आहात? तुम्ही एकटे तर रहाणार नाही ना? आजच लॉगिन करा. हा तुमचा युआयडी आणि हा तुमचा ************.(पासवर्ड). "
चांगली आयडीया आहे. बरोब्बर व्हॅ. डे. ला गुलाबी रंगात संदेश.....
पण मग चालुच झालं हो. होळी, रंगपंचमी, दसरा, दिवाळी, ३१ डिसेंबर..
रंग बदलुन मजकुर तोच... "तुमचं काय? तुम्ही काय करणार आहात? तुम्ही एकटे तर रहाणार नाही ना? "

त्यांनी वर्षभर वाट पाहिली. आणि मग मात्र इमेलः - "तुम्ही खरंच लग्न करणार आहात का? जर खरंच लग्न करणार असाल तर नियमित लॉगिन करत रहा. पैसे भरु नका. पण किमान नियमित लॉगिन करणं हीदेखिल एक महत्त्वाची गोष्ट आहे." काय जीनीअस आहेत ना? ह्याची गम्मत अशी आहे, की आपण एकमेकांशी संपर्क साधायचा झाला की ह्यांना पैसे दिल्याशिवाय करु शकत नाही. म्हणुन शेवटच्या क्षणापर्यंत हे मार्केटिंग करत रहातात... खोटं वाटेल, पण शेवटी शेवटी तर त्यांनी "रिअल इस्टेट" चंदेखिल मार्केटींग सुरु केलं. "तुम्ही लग्न कराल. पण रहाल कुठे? सादर आहे.........." वगैरे वगैरे..
मग मात्र विशेष इथं जाणं बंद केलं. सोय फार चांगली आहे. पण असं फार अंगावर आलं की मला ते आवडेनासंच होतं....

मधल्या काळात अजुनही काही पोरी बघितल्या. आणि परत न्युनगंड जिंकला. आता सारखं न्युनगंड न्युनगंड वगैरे वाचुन तुम्हाला वाटेल, "इतना डरेगा, तो जिएगा क्या?" तर "जिण्याच्या ठिकाणी जितोच हो आम्ही. उगाच नाही ते काहीतरी मागं लागलं की नकोसं होतं. इतकंच....
पण काय अपेक्षा हो एकेकीच्या?
पॅकेज तर आहेच. परत स्वतंत्र रहायचंय.... अहो पण घराच्या किमती किती झाल्यात!!!
वर सासु सासरे नकोत. किंवा असले तरी गावी राहुदेत. दिवाळी दसर्‍याला आम्हीच त्यांच्याकडे जाऊ असा सुर...
मी हापिसातल्याच एका मैत्रीणीला विचारलं, "काय गं, हे काय आहे? सगळ्या अशाच पोरी असतात का? सॉरी मुली...?" "हे बघ..." ती म्हणाली, "सगळ्या प्रकारचे लोक असतात. तितके त्यांचे स्वभाव, विचार अन आवडीनिवडी. आणि हे मुलं आणि मुली दोघांच्याही बाबतीत लागु होतं. त्यामुळे अव्वाच्या सव्वा अपेक्षा असणार्‍याही मुली असतात हे खरं. पण दोघं मिळुन सगळं उभं करु असं मानणार्‍या मुलीही असतात. सासुसासरे हवे-नको वगैरे प्रकाराबाबतीतही असंच. त्यामुळं ज्यांना ते हवं आहे त्यांना ते मिळो. आम्हाला माफ करा म्हणुन तिथुन निघावं. त्यांना शिव्या घालण्यात तरी काय अर्थ आहे? आपण आपलं बघावं... "
........."तुलाच एखादी कडक धाकटी बहिण आहे का गं" असं विचारणार होतो खरं तर...
किती मस्त उत्तर दिलं होतं हिनं! तर तीच म्हणाली माझ्या चुलतबहिणीशी बोलताना हाच विषय झाला परवा..
लग्गेच, "शर्माना छोड डाल, हाल दिलका खोल डाल आजुबाजु मत देख आय लव युअर चुलतबहिण बोल डाल..."
पण नाहीच जमलं..... "कुठं असते?" इतकं मात्र विचारलं. "युटीआय चौकाजवळ घर आहे.." म्हणाली...

अशातच मग तो 'सिझन' गेला. आणि मी परत कामात बुडालो...
बघा बघा.. आई लोकांचं हे बरं आहे. स्वतः तेवढं 'सिझन' वगैरे म्हणतात. आणि आम्ही मात्र "मार्केट" म्हटलं की डोळे मोठे... असो.. मुद्दा काय तर सिझन गेला. आणि मी शांत झालो...

पण तितक्यात आमच्या उतावळ्या बंधुंनी बॉम्ब फोडला, "हिच्या घरी म्हणतायत, अजुन थांबुन चालणार नाही... लोक काय म्हणतील... लग्न करायला हवं आता..."
साला. "हिच्या" घरी म्हणे... अजुन लग्न तरी होऊदे. आणि सगळं सेट झालंय ना? मग गप म्हण की सासर्‍याला...
"असं नसतं रे दाद्या..." तोच मला म्हटला... "एकदा लग्न होऊदे. तोपर्यंत काही खरं नाहीये." "पण तु घाबरु नकोस. आपण तुझंही काहीतरी बघु..." ही गंगा उलटीच का वाहते हो?? पण मग म्हटलं की बघु. धाकटा तर धाकटा. त्याची मदत घेऊ. त्याच्या सगळ्या मैत्रिणींमधे कुठलीही कडक मैत्रिण शिक्कल नसल्याने त्यानं तोच "इंटरनेटवर शोध घे" चा सल्ला दिला. पुढची पिढी फास्ट असते ऐकलं होतं. पण २ वर्षांनी छोटी पिढीदेखिल इतकी पुढे असावी??? त्याला घेऊनच परत त्या कॅफेमधे गेलो.

"किती?" आम्ही आत शिरताच, नेटकॅफेमधली तीच पोरगी म्हटली.
"दोघंजण आहे. पण एकच कॉम्प द्या. तोच कोपर्‍यातला.. "
आम्ही जागेवर बसलो आणि चिडुन धाकट्यानं माझ्याकडं बघितलं...
"डोळे फुटले का दाद्या तुझे?"
मला थोडासा राग आला, पण काही समजलं नाही....

.............................
.............................
.............................

आज आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. "मार्सवालीबरोबर" संसार सुखानं चालु आहे. बरोबर.. हीच ती ऑफिसातल्या बोध देणार्‍या मैत्रिणीची चुलत बहिण. "युटीआय चौकातली." बोलबच्चन धाकट्यानं हिच्याशी ओळख काढली. आणि हळुहळु बरोब्बर आमचं सेटिंग लावलं. त्या मैत्रिणीनंदेखिल मैत्रीला जागुन बरोबर साक्ष दिली आणि सासरेबुवांना माझी महती आणि माझ्याशिवाय तुमच्या पोरीला तारणहार नाही हे पटवुन दिलं.

पंक्याचंही बरोबर आहे. सुंदर पोरी रस्त्यावरच दिसतात. पण आपण लग्न करायचं म्हटलं की त्या तो रस्ता टाळतात. इंटरनेटवरही असु शकतात. पण इथं "कनेक्शन जाउ" शकतं मधे कधीतरी.. आणि उगाच जास्त काही कडक-बिडक पोरगी शोधायला जाऊ नये. आपण किती कडक आहोत हेही बघावं.
म्हणुन लग्नाच्या बाबतीत आम्ही जे काही शिकलो, ते म्हणजे, शेवटी ह्यात नशिबाचाही भाग आहे बहुतेक. ते त्याचा भाग खेळत राहतं. आपण बाकी समोर जे दिसतंय, तिथं बघावं, मग इकडेतिकडे. आपण उगाच पृथ्वीवर चुकीच्या ठिकाणी शोधत बसतो. आपली "मार्सवाली" जवळच कुठेतरी असु शकते!

------------------------------------------------ * समाप्त * --------------------------------------------------------
काल्पनिक.
पिंच ऑफ सॉल्ट. स्मित

४ टिप्पण्या:

jagrut म्हणाले...

Mayur...mast zalay ekdam... majhya bhavnana tu shabdat chan pakdlyat ;)
specially "8-10 lakh pacakge" line jamli e ekdam :)

Maithili म्हणाले...

Bharrii..mastach zaliye post...!!!
( Atyantik aagaupana :- Dada mala ek vahini aan...!!! Vichar kar lawkar hya war... ;D )

सागर म्हणाले...

मस्त आवडल..

ऋयाम म्हणाले...

धन्यवाद jak.
बघ ना. पण हे "ज्यांना कळायला पहिजे त्या" अर्थात पोरींना कळायला हवं ना? :)

धन्यवाद मैथिली ताई.
किती हा आगाऊपणा. :) बर. तु म्हणतीच आहेस तर.... :)

दवबिंदु,
:) धन्यवाद मित्रा!

धन्यवाद सागर!