शनिवार, १६ जानेवारी, २०१०

"मानसी!!" (रेईको लॉजः भाग २)

"रेईको लॉज"चा पुढचा भाग.

"...अशी वेळ आयुष्यात कधी येते का कोणाच्या?", अमित विचारात पडला होता..
लहानपणी ऐकलं होतं, 'कोकणात आजीनं तिच्या तरुणपणी असंच काही भुत पहिलेलं ती सांगायची....'
तेव्हा वाटायचं, "सगळ्या थापा आहेत... "
"तेव्हा दिवे नसायचे.. अंधारात काहीतरी सावल्या पाहुन लोकं घाबरायची, झालं...
खरोखर थोडीच काही असतं??"

पण आज? आज आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं... सारंच अतर्क्य...
ती 'हेल्पर बाई'.... ती आलीच नव्हती.... मग आपल्याला भेटली ती?
नकळत अमितने करकचुन ब्रेक लावला.... नशीब मागे दुसरी कुठली गाडी नव्हती..

त्यानं मानसीकडे पाहिलं... ब्रेकच्या धक्क्यानं तिलाही जाग आली होती..
"सॉरी.. झोप लागली होती का?"
"काय? नाही रे...." मानसी. "आपण काहीतरी गरम घेऊया का? चहा मिळतोय का बघुया ना चल..."
"बर. जरा थांब. पुढच्याच हॉटेलवर थांबवतो. " अमित.
झाल्या प्रकारात तिला फार मनस्ताप झाला होता.. आणि शारिरीकदेखील...
ताप वगैरे भरला नसला, तरी तीची दमणुक झालेली सहज लक्षात येत होती.


चहा मिळाला नाहीच. "चांगली आहे नाही?", कॉफी घेत मानसी म्हणाली...
"हो.. साखर जरा चालली असती..." अमित.
त्याच्या मनात मात्र एकच विचार चालु होता: -
'मानसीनं तिथुन निघाल्यापासुन एकदाही तिथला विषय काढलेला नाहीये....'
'आपण तिची एवढी चेष्टा करायचो घाबरट आणि काय काय पण एवढ्या प्रसंगातुन जाऊनदेखील हीनं केवढा धीर ठेवला आहे. एखादी असती तर...'
पण तोही काही बोलला नाही.
'तिला हवं आहे तसंच करुया. कशाला हव्या आहेत नाही त्या गोष्टींच्या आठवणी?'
"अजुन दीड-एक तासात पोहोचु आपण. मग नीट विश्रांती घेता येईल...", अमित.
'शनिवारी गँगपण येईल इंडीयाहुन.. केवढा आधार असतो नाही. कधी लक्षात नाही येत पण...', त्याच्या मनात विचार चालुच होते...


शनिवारी ठरल्याप्रमाणे सगळे लोक आले.
अमितने आधीच त्यांना सांगितलं होतं, 'फार जास्ती विषय काढु नका कसला.. उगाच परत त्रास नको..'
पण केतनला एवढं कुठलं समजायला?
आल्या आल्या त्यानं पहिलाच डायलॉग मारला, "वहिनी... मला सांगा ना गोष्ट..."
'गोष्ट??', ही काय मजा आहे काय? पण केतन असलेच प्रश्न विचारणार...
पण मानसीनंही काही विशेष न घडल्यासारखं सगळं सांगुन टाकलं..
अमितलाही आत्ता बरंच वाटलं.
'ठिकच आहे. सुट्टी संपेल लवकरच.
नंतर ही घरी एकटीच असेल. तिनं जास्ती त्रास करुन घेतला नाहीये, चांगलंच आहे... '


"चला केतनराव. निघावं आता... काय म्हणता??" जेवण वगैरे झाल्यावर आळस देत गिरीश म्हटला..
"अरे थांब की! तिथे काय काय टाईम-पास केला सांग की अजुन जरा.... ", अमित.
"अरे सांगितलं की सगळं..." असं गिरिश म्हणताच, "अरे.... ह्यानं त्या पोरीला सांगितलं आहे ऑनलाईन येतो आत्ता म्हणुन घाई करतो आहे, बाकी काही नाही. ते बघ.. ते बघ... गुडघ्याला.. बघ, बाशिंग दिसलं का???", केतननं एका वाक्यात पितळ उघडं पाडलं .. "ए नाव सांग की... सांग की..."
"केत्या, हरामखोर! तुला काय सांगितलं होतं?" गिरीश वैतागलाच, "अ‍ॅक्चुअली खरंच आहे. सांगतो नंतर सगळं तुम्हाला.. आत्ता कशात काही नाही आणि हे येडं उगाच गावभर...."
यावर केत्याही येड्यासारखा हसायला लागला, आणि त्याला बाहेर ढकलत गिरीशही निघाला...
"चला वहिनी. ओत्सुकारेसामादेस! ओयासुमी नासाय..!" (गुड नाईट वगैरे...)
"चला.... या परत..... "



मग आजकालच्या सुशिक्षित तरुणांप्रमाणे 'बायकोला जेवणाचं आवरायला मदत करुया..' वगैरे विचार अमितच्या मनात आले, पण तेवढ्यात ते "अप्सरा आली" गाणं, त्याचा व्हीडीओ त्याला मिळाला आणि तो पहातच राहिला... मानसी आवरायला गेली.

तीनेक मिनिटांचं गाणं असेल. तिसर्‍यांदा ऐकुन झाल्यावर तो भानावर आला आणि त्यानं मानसीला हाक मारली, "मानसी.. हे बघ.. नवीन गाणं आलंय..."
मानसीनं 'ओ' दिली नाही.
पाण्याचा आवाज येत होता... पण पाणी नुसतंच वहात होतं बहुतेक. एकसंध, सरळ आवाज येत होता...
तो उठुन किचनमधे गेला. "मानसी.... मानसी???? हे काय करतीयेस??"
मानसीनं सिंकमधला नळ चालुच ठेवला होता..
शेजारीच गॅसवर तेल उकळत ठेवलं होतं आणि त्याच्याकडे एकटक पहात ती उभी होती....
"मानसी.." अमितच्या हाकेनं ती एकदम भानावर आली.
"अरे?? हे काय?? तेल??? " गॅस बंद करुन अमितकडे पहात ती म्हणाली.
अमित आ वासुन बघतच राहिला...

काहीही नं बोलता, त्यानं नळ बंद केला. तेलावर झाकण ठेवलं आणि मानसीला झोपायला घेऊन गेला...
काहीतरी गंभीर आहे, त्याच्या लक्षात आलं होतं.. अशा प्रसंगी घाबरणं, रडणं स्वाभाविक आहे. ही असलं काहीच करत नाही आहे. आपण डॉक्टरला दाखवायलाच हवं... उद्या सकाळीच जाऊ....

पण त्याला झोप काही येईना.
अस्वस्थ अवस्थेत मधुन मधुन तो घड्याळ पहातच होता. त्याच्या इलेक्ट्रॉनीक घड्याळ्यात दोन वाजताचं बीप-बीप त्यानं ऐकलं होतं, पण मधेच कधीतरी त्याला झोप लागली...

रात्रीच कधीतरी अचानक त्याला जाग आली, आणि बघतो तर काय? शेजारी मानसी नव्हतीच!
तो किचनमधे गेला. ती तिथे नव्हती. त्यानं धावत जाउन बाहेरच्या खोलीचा लाईट लावला.
तिथे रायटींग टेबलवर डोकं ठेवुन ती झोपली होती...
ए सी बंदच होता.... तिनं स्वेटरही घातलेला नव्हता..
पहाटे दोन-तीन टेंपरेचर असताना ही काय असं करतीये??
तिला उठवुन अमित बेडरुम मधे घेऊन जाऊ लागला.
"अं?? मी.. इथे???" मानसी.
"काही नाही... काही नाही... चल.. झोपुया...." अमित काहीच नं घडल्यासारखं तिला म्हणाला.
तिला झोपवुन, तो लाईट बंद करायला परत बाहेरच्या खोलीत गेला.. टेबलवर काही कागद आणि पेनं होती..
त्यातलाच एक कागद खाली पडला होता...
तो उचलुन वर ठेवता ठेवता त्यानं त्यावर लिहिलेलं वाचलं...
त्यावर जपानीमधे लिहीलं होतं, "रेईको लॉज, आकाकुरा..."

अमितचं डोकं गरगरायला लागलं होतं.. त्यानं परत कागद पाहिला.
"रेईको लॉज, आकाकुरा..." इकीताई.... हायाकु इकीताई... उरागिरारेता....
"रेईको लॉज, आकाकुरा..." तिथं जायचं आहे..... लवकर जायचं आहे...... धोका ...

तिथं नकाशासारखंही काही दिसत होतं...

हे कोणी लिहीलं??? मानसीला तर जपानी लिहिणं शक्य नाही.. आणि नकाशा???
गिर्‍या?? केत्या? पण असली चेष्टा???? नक्कीच केत्या असणार. त्याला जरा बघितलाच पाहिजे..
सकाळीच फोन करु.
कागद टेबलावर ठेवुन त्यानं लाईट बंद केला. बेडरुमकडे जायला वळणार तोच पाठीमागेच मानसी उभी दिसली.. अंधारात... "मानसी!" अमित जवळजवळ ओरडलाच!
"काय झालं??", "तु दिसला नाहीस म्हणुन बघायला आले.." मानसी..
अमितची छाती जोरजोरात धडधडायला लागली होती...
"क..काही नाही... लाईट चालुच राहिला होता म्हणुन.... चल... केला बंद.... "


दोघं परत बेडरुम मधे आले. मानसीनं लाईट बंद केला..
अमितनं घड्याळ पाहिलं... तीन केव्हाच वाजुन गेले होते...
त्यानं मनोमन देवाला नमस्कार केला. सगळं नीट व्हावं म्हणुन प्रार्थना केली आणि झोपायचा प्रयत्न करु लागला...


कसल्यातरी पुटपुटण्यानं परत अमितला जाग आली.. मानसीच होती.
"रेईको लॉज, आकाकुरा..." इकीताई.... हायाकु इकीताई... उरागिरारेता....
"रेईको लॉज, आकाकुरा..." इकीताई.... हायाकु इकीताई... उरागिरारेता....
अमितला काहीच कळेनासं झालं होतं.. हे मानसी कसं बोलु शकेल... तिला कुठे वाचता येतं हे ??
"का??".. "नाही. हे कसं शक्य आहे???" अतर्क्य गोष्टींनी केव्हाच त्याच्या मनात प्रवेश केला होता, पण तो विश्वास आता अधिकच दृढ होत चालला होता...
नीट ऐकावं म्हणुन तो तिच्या थोडासा जवळ गेला. ती सतत हेच बोलत होती... एकाच संथ, गुढ स्वरात.. त्यामुळे ते अधिकच भयाण वाटत होतं... अमित नीट ऐकावं म्हणुन थोडासा पुढे सरकला आणि अचानक! मानसीनं डोळे उघडले!
अमित तिच्या अगदी जवळच होता. तिनं अत्यंत ताकदीनं अमितचा गळा पकडला! करारी आवाजात,
"रेईको लॉजए हायाकु कोई. मात्तेरु कारा.. तेत्सुदात्ते.. ओनेगाई दाकारा... हायाकु कोई..." , ती म्हणाली!
इतकं बोलुन मानसी कुस बदलुन झोपी गेली.


अमित उठुन उभा राहिला.. तिच्या त्या ताकदीवर त्याचा विश्वास बसेना.. दहा सेकंद असतील?? पण....
आता तो प्रचंड घाबरला होता..
आता मात्र त्या बेडवर झोपणं त्याच्यासाठी केवळ अशक्य होतं...
तो तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडं पहात विचार करत राहिला....
मानसी असं का म्हणतीये? "रेईको लॉजला या. मदत करा.. लवकर..."
सर्वात आधी त्याच्या मनात मानसीबद्दल विचार आले.
हे काय होऊन बसलं आहे सारं?
आपण हिला घेऊन आलो टोक्योला एवढं ठिक, पण पुढचं सगळं का व्हावं??? हीची जी काही अवस्था झाली आहे त्याला जबाबदार कोण??
का मी तिला म्हणालो "बर्फात जाऊ..." ? मी चांगल्या ठिकाणचं बुकींग का नाही केलं अ‍ॅडव्हान्समधे??
तिला एकटं का सोडलं?

आता अविश्वसनीय खर्‍या, पण सत्यामधे ज्या घटना घडत आहेत त्यात काहीतरी रहस्य असलंच पाहिजे..
आणि ते सोडवायची गरज आहे आता.. कारण ते कळेपर्यंत मानसी....
उद्या रवीवार आहे. सकाळीच गिर्‍या, केत्याला बरोबर घेऊन परत जाउया.. रेईको लॉजला...

"हॅलो गिर्‍या.... ऐक...." त्यानं लगेच फोन लावला...
गिरिशचा विश्वास बसेना पण मैत्रीमधे, आणि असल्या वेळी असले प्रश्न विचारायचे नसतात. "ओके", तो म्हणाला.


"गाडीनं जाणं शक्य नाहीये आत्ता. आपण ट्रेनने आकाकुराला जाऊया. तिथुन त्या मालकाला सांगुया झाल्या प्रकाराबद्दल. त्याची मदत लागेलच. खरं तर आपण त्याचीही मदत करतो आहोत... मला काही कळेनासं झालंय बग गिर्‍या.." अमित म्हणत होता.
"बघुया काय होतंय..", गिरीश, "जास्ती काळजी करु नकोस.. होईल सगळं व्यवस्थित...मानसी तयार झालीये ना पण?? "
"हो. ती घाबरलीये, पण..."

सकाळी सगळे निघाले. दरम्यान अमित मालकाला फोन करत होता, पण अजुन तो दुरुस्त झालेला नव्हता बहुतेक, संपर्क होत नव्हता.. "जाऊदे. हॉटेलवर भेटु डायरेक्ट... ", केतन. घरातुन निघतानाच गिरिशनं केतनला "गप्प" रहाण्याबद्दल सांगितलं होतं. त्याप्रमाणे तो जरा बरा वागत होता..
"हे बघा." ते खरडलेलं आणि तो नकाशा, या दोघांना दाखवत अमित म्हणाला.
दोघे बघतंच राहिले..


चौघे लॉजवर पोहोचले तेव्हा साधारण १० वाजत आले होते.
दार उघडंच होतं.. "गोमेन कुदासाय......." अमित म्हणाला पण काही उत्तर आलं नाही..


अमितला ते मागच्या वेळी रेईको लॉजवर आले होते तेव्हाचं सगळं आठवलं..
त्याला मालकाने दिलेला गरम चहा आठवला. "चांगला आहे बिचारा मालक... वाईट झालं पण..."


लॉजमधे आत शिरल्यावर गिरीश काऊंटरवर ठेवलेल्या गोष्टी पाहु लागला..
केतन तिथेच लावलेले फोटो बघु लागला. मानसी दमल्यामुळे कोचवर बसली...


"अमित!" अचानक गिरीश ओरडला, "तो नकाशा बघु?"
"का?" नकाशा काढत अमित बोलला..
"हे बघ.. " हॉटेलच्या रुम्स साठीचं पाम्फ्लेट... "इट मॅचेस मॅन!" , गिरीश.
"काय बोलतोस??" अमित.
"चल. बघुया काय आहे. काहीतरी आहे नक्की!", गिरीश.
"कोणी नसताना जायचं??"
"सात-आठ खोल्याच तर आहेत. दहा मिनीटांचं काम. अजुन एक-दोनदा हाका मारुया. नाही आले तर दोन जण बाहेर थांबुन दोन जण शोधुया. कोणी आले तर सांगायचं 'वासुरेमोनो'... " "विसरलो आहे ते शोधतोय." गिरीश.
अमितला काही हे पटत नव्हतं पण... शेवटी तोही हो म्हटला..


"बर मानसी, तु आणि केतन इथे थांबा. आम्ही.. ", अमित कोचकडे वळुन म्हणाला पण...
मानसी तिथं नव्हतीच!
"मानसी!" त्यानं हाका मारायला चालु केलं. ती बाहेर तर गेली नव्हती.. केतन तिथंच होता कारण.. त्याला समजलं असतं.. तो त्या मजल्यावरच्या रुम्स मधे बघुन आला. टॉयलेट्स बघुन आला. तिथेही गेली नव्हती..
"केतन. इथेच थांब. गिर्‍या, तु वरच्या मजल्यावर जा. मी खाली बघतो. या मजल्यावर नाहीये ती..."
सापडली की लगेच कॉल कर.."
"बर.."


गिरीश घाईघाईत वर गेला. सगळ्याच खोल्यांना कुलुपं होती. शोधणं शक्य नव्हतं, कारण तिथं जाणंच शक्य नव्हतं... तो खालच्या मजल्यावर आला. "बेसमेंट मधे जातो रे मीही..", केतनला म्हणत तोही खाली गेला..


अमित बेसमेंटमधल्या सगळ्या खोल्या एकेक करुन बघत होता. ती दिसली नाहीच.
अचानक त्याला स्कीईंग कीट वाली ती 'खानसो~शित्सु' आठवली. ड्रेस घ्यायला मागे तो तिथे गेला होता.
आत्ता मात्र गेलाच नव्हता...
तेवढ्यात गिरीशही आला. "वर नाहीये ती.."
"इथेही नाहीये. तिथे मागे 'खानसो~शित्सु' आहे बघ. तिथे बघायचं राहिलं आहे.. " अमित.
"चल..", गिरीश.


लाईटच्या स्वीचची जागा अमितला लक्षात होती.
त्यानं लाईट लावला आणि..
मानसी. तिथं डोळे मिटुन मानसी बसलेली त्यांना दिसली.
"मानसी... मानसी... ", अमितनं हाका मारल्या पण तिनं प्रतिसाद म्हणुन आपल्या हातातले काही कागद पुढे केले. त्यात काही फोटोही होते..
"मानसी...", गिरीश म्हणाला..
तिनं अचानक डोळे उघडले. गिरीश दचकुन मागे झाला.
"कोनो खामी.. ताइसेत्सुनि शिते...." "कोनो खामी... ओनेगाई दाकारा..."
गिरीशचा आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता. तो आ वासुन तिच्याकडे बघत होता.
त्यानं कागद हातात घेतले.
विस्फारलेल्या अवस्थेत तो तिथुन बाहेर पडला.
गिरीश कागद चाळु लागला. ती 'यात महत्त्वाचं वगैरे काय म्हणत होती' त्याला शोधायचं होतं..


मानसी तशीच बसुन होती.
अमितनं तिला उठवायचा प्रयत्न केला तशी ती उभी राहिली. पण खुप दमल्यासारखे तिचे डोळे बंदच होते..
"मानसी.. बरं वाटतंय का?" तिला हलवत तो म्हणाला.
"हो..." हळुहळु डोळे उघडत ती म्हणाली.
ती बोलताना बघुन अमितलाही बरं वाटलं..
"चल." तो म्हणाला.
पण ती हललीच नाही... अमितनं थोडी ताकद लावली, पण नाही...
अचानक, "अरिगातो ने... खिते कुरेते... आनो खामी.. ताईसेत्सुनी शिते ने... ओनेगाई दाकारा..." ती म्हणाली..
अमितने धीर एकवटुन मान हलवली. तो घाबरला होता..
त्यानं तिच्या डोळ्यात पाहिलं.. तिच्या डोळ्यात त्याला दोन आकृत्या दिसल्या..
त्या ओळखणं त्याला कठीण नाही गेलं...
तिच्या डोळ्यात दिसतायत म्हणजे,... त्या आपल्या पाठीमागे तर उभ्या नाहीत ना?? त्यानं वळुन पाहिलं..
पण मागे कोणीही नव्हतं.... त्यानं मानसीकडं पाहिलं.. काहीच न झाल्यासारखं ती "चल.. जाऊया." म्हणाली..
'बहुतेक त्या दोघींना जे हवं होतं ते झालं असावं... आता सारं सुरळीत होईल...' अमितला वाटलं,
पण आल्याबद्दल त्या आभार मानत होत्या.. म्हणजे त्या कागदात काही महत्त्वाचं आहे....


"अमित.. अमित.. "
गिरीश त्याला हाका मारत होता..
त्याचे कागद बघुन झाले होते.. अवाक होऊन त्यानं ते अमितला वाचायला दिले...
ते वाचुन अमितही गिरीशकडे बघतच राहिला....

बाहेर पडल्यावर त्यांनी लगेच पोलिसांना फोन केला...
अमित, गिरीश सगळ्यांचा पत्ता आणि सगळ्या डिटेल्स लिहुन घेऊन त्यांना तुर्तास घरी जाऊ देण्यात आलं...


आणि दुपार होता होता टिव्हीवर बातमी झळकली. "रेईको लॉजचे रहस्य!"


सोमवारी सुट्टीचा शेवटचा दिवस होता.. रवीवारी सगळे अमितकडेच राहिले होते.
सकाळी अमितनं बातम्या लावल्या.
"रेईको लॉज" ची बातमी "ब्रेकींग न्युज" मधे झळकत होती..


३१ डिसेंबर २००९ रोजी, जगभरात सगळेजण नवीन वर्षाचे स्वागत करत असताना, नीईगाता प्रिफेक्चर मधील आकाकुरा स्कीईंग एरीआ मधे असलेल्या रेईको लॉजमधे वेगळाच प्रकार घडला..
याच दिवशी हॉटेल मालकाची पत्नी आणि त्यांची छोटी मुलगी रेईको यांचा अपघाती मृत्यु झाला.
खरेदीसाठी बाहेर निघालेल्या या दोघींच्या गाडीचे ब्रेक्स फेल झाल्यामुळे गाडीवरचा ताबा सुटुन जबर धडक झाली. त्या जागीच ठार झाल्या. मालकालाही एक महिन्यापुर्वी अशाच प्रकारे अपघात झाल्याचे समजते.

मात्र कालच आलेल्या माहितीनुसार, हा अपघात नसुन कट असावा असे सुचवणारे धक्कादायक पुरावे पोलिसांकडे आहेत. रेईको लॉज मधेच सापडलेल्या काही कागदपत्रे आणि फोटोंवरुन रेईको लॉजचा मालक आणि त्याची पत्नी यांचे परस्पर संबंध बिघडलेले असुन मालकाला तिच्यापासुन वेगळे होण्याची इच्छा असल्याचे दिसते. त्याच्या पत्नीने आपल्या मैत्रिणीला या संदर्भात लिहीलेली काही पत्रे, जी ती पोस्टच करु शकली नाही ती पोलिसांच्या हाती लागली आहेत. मालकाचा अशाच पद्धतीचा अपघात खरा होता का बनाव होता असाही संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस मालकाची चौकशी करायला गेल्यावर तो हॉटेलमधे नसुन, त्यांच्या हॉटेलमधे कामाला असलेल्या हेल्पर बाईबरोबर सापडल्यामुळे तिच्यावरही संशय व्यक्त केला जात आहे....
या संदर्भात पोलिस तपास चालु आहे..."

अशक्य.. केवळ अशक्य.. कोणी दुसर्‍यानं सांगितलं असतं तर विश्वासही बसला नसता...
"आपण मात्र हे वर्ष विसरणार नाही कधी.. नाही?? " चॅनल बदलुन मानसीकडं बघत अमित म्हणाला..
"होन्तो~ दा ने!!" (खरंच..) मानसी म्हणाली..
अमित, गिरीश, केतन आ वासुन बघतच राहिले!!!
"तेवढं येतं मिस्टर" या तिच्या बोलण्यानं ते भानावर आले...
"सो~देस ने.. सो~देस ने.. (खरंच.. तेवढं येतं तुला......) अमित....

२ टिप्पण्या: