बुधवार, ७ जानेवारी, २००९

"थोडं कडू; पण खूप गोड..."

एक जानेवारी २००९ ला प्रस्तुत लेख छापून दिल्याबद्दल "सकाळ पेपर्स, पुणे" यांचे मनःपूर्वक आभार! लय-लय धन्यवाद! सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! :-)

(मुळ लिंक:- http://www.esakal.com/esakal/01072009/My_Pune3380B4EAC9.htm)

मी शाळेत असताना पुण्यात यायचो ते सुटीसाठी. नंतर शिक्षणासाठी येऊन राहिलो. पुढे नोकरीनिमित्त जपानला गेलो. त्या काळच्या पुण्याच्या खूप साऱ्या मस्त आठवणी आहेत. आज पुण्यात दिसणारा बदल सुखावतो; पण त्याचबरोबर थोडा खिन्नही करतो. आता मला पुणं वाटतं ते थोडं कडू; पण खूप सारं गोड...
कधी दिवाळीच्या, कधी मे महिन्याच्या सुट्टीत येणं व्हायचं मावशीकडे. कमला नेहरू पार्कसमोर. मावशीकडच्या भावंडांत मी सगळ्यात लहान. त्यामुळे नेहमी लाड! तिथंच मग लांब "नगर रोड'ला राहणारी दुसऱ्या मावशीकडची मंडळी यायची. मग काय? घरात चिवडा-लाडू, बाहेर जाऊन केक, कधी पेस्ट्री- पिझ्झा! नुसती मज्जा!! बाहेर गेलं की आई-वडीलही जरा चांगलं वागतात; म्हणजे विशेष ओरडत नाहीत, त्यामुळे आणखीनच मज्जा!

काका बॅडमिंटनचे कोच असल्याने सकाळी पी.वाय.सी. वर! बाहेर "गुपचूप' संतोष बेकरीचं पॅटीस खाऊन, जरा भटकून परत घरी उपमा खायला तयार! कधी कधी सकाळी वेळ मिळाला की दादा टेकडीवर घेऊन जात असे. पण तिथंही त्याला मैत्रिणी भेटायच्याच... चेकडी चढता-उतरता हाय-बाय व्हायचं... संध्याकाळी ताई (प्रत्यक्षात ताई, दादा कधीच म्हटलो नाही!) आली, की तिच्याबरोबर प्रभात रोडवर फिरायला...

मारुती एस्टिम, फियाट, उनो, कॉन्टेसा, मर्सिडीज या गाड्या तिच्याबरोबर फिरताना पहिल्यांदा बघितल्या. तेव्हाच्या माझ्या निरीक्षणाप्रमाणे, पुणं हे "सायकलीं'चं नसून कायनेटिक होंडाचं शहर होतं.
के.एन.पी. (कमला नेहरू पार्कला आजकाल म्हणतात म्हणे!)च्या शेजारच्या महाराष्ट्र बॅंकेच्या कट्ट्यावर, रात्री मित्र-मैत्रिणींची टोळकी बसलेली दिसत. काही जणांकडे "कायनेटिक होंडा'. माझ्याकडे तेव्हा सायकलसुद्धा नव्हती.
खूप राग यायचा, "कधी मोठे होणार? कधी कायनेटिक घेणार? कधी पुण्यात राहायला मिळणार?'
पाचवी-सहावीत होतो तेव्हा "शून्य अभ्यास, पूर्ण मजा' या द्विसूत्री कार्यक्रमामुळे "ओरिजिनली', मला पुणे तिथे काय उणे असं वाटायचं... नंतर ते अजून कोणालातरी सुचलं आणि फेमस झालं.

नंतर आलो ते कोल्हापूरहून एनसीसी कॅम्पसाठी. एकेक आठवड्याचा एटीसी कॅम्प. एकदा औंध, एकदा खडकी, असं दोन वर्ष आलो. शिक्षणाच्याच निमित्ताने त्याच खडकीला येऊ, असं तेव्हा वाटलं नव्हतं. भरपूर झाडं, मोकळी जागा, थंड वातावरण, बॉम्बे सॅपर्सचा एरिया... वगैरेमुळे खडकी छान वाटायचं.

तेव्हाचा अजूनएक बऱ्याचदा ऐकलेला पॅटर्न म्हणजे, "मुलगा कोल्हापूरमध्ये इंजिनिअरिंग करतो... पुण्यात नोकरी करू लागतो... आणि लव्ह मॅरेज करतो...'' खरंच बऱ्याचदा ऐकलेलं! आपला काही संबंध नाही, उगाच आठवलं म्हणून...

मी आणि मित्र पेईंग गेस्ट म्हणून राहायचो त्या काकूंकडे कधी कधी नाश्ता नसेल, तेव्हा मग बाहेर जाऊन "कच्छी दाबेली' खाऊन यायचो. बिबवेवाडीत तेव्हा गंगाधाम वगैरे अजून सुरू व्हायचं होतं. तिथं नुकतंच एक भेळेचं दुकान सुरू झालेलं. "विशेष चांगलं नसताना उगाच गर्दी होते... पुण्यातले लोक काहीही खातात!'' असं उगाचच त्या मित्राचं मत होतं... तेव्हा विद्यार्जन(!) करत असल्यामुळे आमची तेवढीच मजल होती. तिथं नवीन सुरू झालेलं एक हॉटेल होतं... रात्री अभ्यास (कधी कधी करायचो) करताना त्या हॉटेलकडे बघून म्हणायचो "नोकरी लागेल त्या रात्री इथे जेवायला येऊन सगळ्यात महाग आयटम खायचा!'' नोकरी लागल्यापासून एकदाही तिकडे जाता आलं नाही हा भाग वेगळा. बाकी "अभ्यास करायचा' पासून इतरही "बऱ्याच' विषयांवर "महाचर्चा' करून दमून बऱ्याचदा अभ्यास लांबच राहायचा. मग काय? परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यासात रात्री जागवल्या जायच्या. दर वर्षी चुकता देवाला "वाचव रे!' असायचंच. "सारसबाग', "शनिपार', "मोदी गणपती', "ओंकारेश्वर', "दगडू हलवाई' सर्वांनी नेहमीच कृपा केली आहे. अपरिहार्य असणारा निकाल लागला, तर तो पचवायला त्यांनीच शक्ती दिली आहे.

नोकरीसाठी नुसतं "कॉम्प्युटर ग्रॅज्युएशन' पुरणार नाही, इतरही काही असलेलं बरं, या विचारापोटी जपानी भाषेचा अभ्यास करायचं ठरवलं. तेव्हा फर्ग्युसन कॉलेज रोडवर खासगी क्लाससोबतच मदत झाली ती "रानडे इन्स्टिट्यूटची!' एवढं "बिझी शेड्यूल' कधीच नव्हतं. मी आणि मित्र सारखे कुठल्यातरी परीक्षेची तयारी करत असायचो. तेव्हाचे विरंगुळे होते :- "लेक्चरच्या ब्रेकमध्ये रानडे टपरीमधला चहा', "प्रियदर्शिनीचे ब्रेड-पॅटिस', "त्रिमूर्तीमधला सामोसा.' मध्ये मध्ये असायचे "वैशाली!' तिथं एखादी गोष्ट "सेलिब्रेट' करायला जायचो. सहसा तिघं जण असू. तीन कॉफी, एक बटर टोस्ट. कधी वेळ काढून "दुर्गा' कॉफी हौसला जायचो. अजून काही जागा म्हणजे "गुडलक' आणि "लकी'. "लकी' बंद झाल्यावर फार वाईट वाटलं होतं.

"रानडे'मध्येच मी आणि मित्राने काही जपानी मित्र बनवले. एकीने "तेंपुरा', दुसरीने "ओकोनोमी याकी' बनवून खायला घातले. त्यांच्याबरोबर औंधला "सर्जामध्ये!' त्यातल्या एकीने कॅम्पमधल्या "ब्लू नाईल'ची ओळख करून दिली. आज जपानमध्ये त्यांच्याशी भेट झाल्यावरही त्यांनी "सर्जा', "ब्लू-नाईल'ची आठवण काढलीच.

आता दोन वर्षं पुण्यापासून दूर राहतो आहे. मध्ये मध्ये पुण्याला गेल्यावर काही गोष्टी बघून चांगलं वाटलं आणि जरा वाईटही वाटलं... सिंबायोसिसजवळचं "आयसीसी' पुण्यातली कॉलेजेस, बिबवेवाडीचा आमचा रस्ता पॉश झालेला वगैरे बघून गर्वाने छाती फुलते. लोड शेडिंग कमी झाल्याचं ऐकलं की छान वाटतं; पण कार्बनडाय ऑक्साईडच्या कमाल पातळीची पर्वा करणारे वाहनचालक बघितले, सिग्नल तोडणारे लोक बघितले (यात लिंगभेद अजिबात नाही) की वाईट वाटते. रस्ते का सुधारत नाहीत? पुणं बकाल का होऊ लागलंय?

मुंबईसारखंच पुण्यातही सिग्नलवर कुटुंबच्या कुटुंब भीक मागू लागणं का सुरू झालंय? नुकतंच "आयटी'मुळे पुणं हे दहशतवादाचं केंद्रही बनलेलं ऐकून फार फार वाईट वाटलं. यावर उपाय मलाही सुचू शकतात. मग सरकारला काय झालंय? त्यांना वाटत नाही का, हे आहे "माझं पुणं?'

३ टिप्पण्या:

miyu म्हणाले...

hey very very nice ... athavan ali ekdam punyachi !!!! :(

Unknown म्हणाले...

mast lihlays !! malahi athvla maz pune ! :(

Rainbow Traveller म्हणाले...

itakya changlya blog war comment mee karoo shakat nahi.....meri itani awkat kahaann....awkat sodali tar Punekar chowkat martil....Kshamaswa.....!