बुधवार, २७ एप्रिल, २०११

अज्ञानात ???


जापान मधे 'ब्रेड' ला 'पान' म्हणतात. आणि तिथं 'आपलं' पान मिळत नाही.
त्यामुळे जापानात "जा पान ला" असं म्हटलं, तरी काही उपयोग नाही. खरंच नाही.
जपान्यांचं असलं सगळं मला काही केल्या कळत नाही.
- मी जापान सोडून येण्याच्या बहुविध कारणांपैकी 'पान' हे एक!
एकदा आमच्या एका जापानी क्लायंटाला भारतीय व्यंजनं खाण्याची लय हुक्की आली. मग आम्ही नेहेमीप्रमाणे
* इंटरव्युऽ करत करत खाणं उरकू लागलो. आता माणसानं गप खावं, जेवणानंतर त्या पां.शु. नॅपकिनला हात पुसावेत, निघावं. (बरं हात धुवावेत. पां.शु. नॅपकिननं म्हणावे तितके सोच्छ होत नाहीत..) पण नाही. मला पानाची आठवण यायलाच हवी होती. आणि ती क्लायंटाला बोलून दाखवायलाच हवी होती.
"चारेक वर्षाच्या मुलाला त्याचा हात पोचणार नाही इतक्या उंचीवरचा एक नेहेमी बंद असणारा कप्पा थोडासा किलकिला उघडा दिसावा आणि नेमकं तेव्हाच त्यावर प्रकाश पडून आतुन काहीतरी चमकावं!!!"
-ते बघताना त्या मुलाचा चेहेरा जसा चमकेल, अगदी तस्साच! क्लायंटाचा चेहेरा तसाच चमकला!
"नानीऽ !?" क्लायंट उवाच.
----> हा क्लायंट एक नंबरचा बायल्या होता. "नानीऽ" वगैरे अगदी लाडात म्हटला, तशी भितीच वाटली होती.
आता त्याच्या 'अगोबाईऽ ते काय आणिऽऽ!?'चं उत्तर सांगायला हवं.... पाऊण-एक सेकंदानंतर कपाळाला हात लागलाच होता.
"हाप्पानो नाकानी मासारा गा आरिमास! सोरेओ थाबेरु तो कुचीकारा आकाई ज्यु-स गा देमास!!! "
- माझ्या तेव्हाच्या जापानी ज्ञानाला शोभेल इतपत मी त्याला सांगितलं. एका अर्थाने चुनाच लावला.
कारण त्याचा शब्दशः अर्थ "झाडाचं पान असतं, ज्यात मसाला घातलेला असतो. ते खाल्लं की तोंड लाल होतं."
  1. म्हणजे रक्त येतं का रे भाऊऽ??
  2. ----> नाही!!! :|
  3. म्हणजे कुठलंही कच्चं पान खातात का रे भाऊऽ??
  4. ----> नाही. पान म्हणजे पानाचं पान. कुठलंही नाही.
  5. ओह! हम्म्म्म!! म्हणजे कच्चा तंबाखु का रे भाऊऽ??
  6. ----> नाही. पान म्हणजेऽ पानाचं पान. त्यात मग चुना असतो. कॅल्शिअम! कात असते. ते खाल्लं की खाल्लेलं पचतं.
  7. म्हणजे मेरुआना का रे भाऊऽ??
  8. ---->अरे तुझ्या!!? पचन आणि मेरुआनाचा काय संबंध?? थांब! इंटरनेटवर चल, दावतो तुला:- पान कशाशी खातात ते...
कंपनीत पोचेपर्यंत "नानीऽ" ची टकळी चालूच होती. देशात असतो तर ह्याच्या तोंडात पान कोंबून ती बंद करता आली असती, पण.... असो..
कंपनीत पोचलो. आणि थेट कंप्युटरजीला सांगितलं.. "गूगल" --> "पान" --> "इमेजेस"
*आता पुरावा नाही राहिला, पण तेव्हा आलेले फोटोही असले अतरंगी. :|
"मेरुआना~ मेरुआना~ " क्लायल्या टाळ्या पिटत ओरडू लागला. एकाला दुसरा सामिल झाला आणि मी त्या दिवशी तिथुन लवकर तोंड काळं केलं होतं...
काय करणार दिसलेल्या सगळ्या फोटोंमधे पानाची शेतं दिसत होती. आणि पानवाले असे मिशीवाले उघडेबंब..
अधेमधे भारतवारी झाली की "पंधरा दिवसात अधाशाप्रमाणे असलं सगळं करून घेणं" नियमितपणं होत राहिलं.
हे म्हणजे त्या डीडीएलजे मधल्या सिमरन सारखं आहे.
बाऊजी : "जाऽ पुत्तर, जी ले अपणी जंदगी~~~ "
सिमरन : "बाऊजी!! पैरी पोना बाऊजी.."
... वगैरे.."
ह्या पंधरा दिवसात दाबेली, उत्ताप्पा, टोस्ट-कॉफी, माटला कुल्फी असं एकाच संध्याकाळी खाऊन झालं, की मग वेळ यायची ती पानाची!
मग बाकीचे खाण्याचे पैसे कोणीही दिलेले असोत! पान घेऊन देणार तो आमचा "सोमाणी!"
कॉलेज मधे असल्यापासूनची सवय. रविवारी रात्रीचं जेवण झालं की याची पावलं हळुहळू वळणार त्या पानवाल्याकडं.
"अबेऽ, आमच्या घरी दिवाळीला स्पेशल रसम असते, त्यात स्पेशल पान बनतं. आमच्या घरीच बनतं. ते सगळे खातातच. " ही एक वाक्याची कथा त्याच्याकडून हजारदा ऐकली तरी परत ऐकायचा मोह आवरत नाही, आणि वर हसण्याचाही.
--> "बनतं" म्हणजे आप्पोआप्प का रे भाऊऽ?? वगैरे पाचकळपणा चालू होतो.
तर सोमाणीबरोबर खाल्लेलं पान म्हणजे "कलकत्ता खुशबु चटनी"!
* ते अवतरण चिन्हातलं "चटणी" म्हणून वाचू नये.
बाकी वेळा घरी लोकांसाठी पान आणताना आणलं ते 'बनारस'! किंवा मग तोंडात टाकल्या क्षणी विरघळणारं "मघई!"
ते १२०-३०० वगैरे काय्तरी असतं! एवढी माहिती होती, पण पुढे कधी विचारावंसंही वाटलं नाही आणि खावं तर त्याहुन नाही.
हल्लीच देशात लॉङटर्म परत आलो आणि जीवाचं पुणं करं सुरु झालं. मग काय? रोज तुडुङ्ब जेवण आणि त्यावर 'फुलचंद' पान! स्मित
- देशात उकाडा फार वाढल्यामुळं अंगात उष्णता वाढते असं लक्षात आलं होतं, पण जेवणानंतर नेमानं खाऊ लागलेल्या त्या शीतल, सुगंधी, सुमधुर 'फुलचंद' पानामुळं जेवणानंतरचं चालणं सुसह्य होऊ लागलं होतं.
इथं बेसावध वाचकांना 'फुलचंद म्हणजे काय रे भाऊऽ?' असा इष्टप्रश्न पडलाच असेल.
----> 'फुलचंद' पान म्हणजे नेहेमीचंच पान, जोपर्यंत त्यात 'किवाम' टाकला जात नाही, तोपर्यंत!
किवाम म्हणजे "तेरे बातोंमे किवाम की खुशबु है, तेरा आना भी गरमीयों की लू हैऽ. कजरारे कजरारे तेरे कारे कारे नैना! " वाला किवाम.
** किवाम की किमाम असा एशी एक शंका आहेच...
तर हे फुलचंद विकत कसं घ्याचं? तर असं: -
फुलचंद हे ' सादा ' असतं, किंवा असतं 'नुसतं फुलचंद!'
सादा फुलचंद हे आपल्या मघई सारखंच. खाचं आणि गिळाचं... मी नेहेमी हेच घेतो.
'नुसतं फुलचंद' मात्र गिळलं की संपलं...
तरुणांमधे 'नुसत्या' फुलचंदचे किस्से फेमस आहेत. बेसावध लोकांवर कॉलेजच्या वयात असे फुलचंदचे प्रयोग केले जातात. ते गिळताच काही क्षणातच जादू होते आणि मग उचकी पासून, उलटी पासून नानाविध प्रकार घडतात. जे नंतर सांगून त्या बेसावधाला लाज आणता येते.. ह्यातली गोम म्हणजे त्यातला किवाम अर्थात भाजलेला किंवा तत्सम प्रक्रिया केलेला तमाकू!
- मीही हा प्रयोग अनुभवला आहे. :|
'पानात पडेल ते पवित्र मानुन खावं!' हे आमच्या साळंमदली शिकवण सांगते. घरीही नियमितपणं तोच चुना लावला गेला असल्याने 'पानात पडलेलं नेहेमीच गोड मानुन खात आलो आहे.. किंवा गिळत आलो आहे म्हणा.
परवा असंच झालं. अ-क्सा-श्रे-दे कंपनीबरोबर भ-र-पे-ट खाणं झालं. इतकं मस्त खाणं झाल्यावर मग पानाचा घाट घातला गेलाच. मी मागवलं 'फुलचंद सादा!' आणि मघई प्रमाणे पान पवित्र केलं.
मनातलं कुतुहल इष्टव्यक्तिंसमोर इष्टसमयी उघडं केलं, की हमखास उत्तर मिळतं हा अनुभव असल्याने 'अ' सरांना विचारणा केली.. "हे फुलचंद म्हणजे काय असतं?" खरं तर मला त्याला 'इन्व्हेण्टरचं नाव का रे भाऊऽ?" असं विचारायचं होतं.
ह्यातही व्हेटरन असलेल्या सरांनी सांगितलं, "फुलचंद म्हणजे तंबाखु वालं पान..."
"हो. ते म्हणजे किवाम वालं. माझं साधं आहे.." मी.
"नाही. " - अ. "फु. म्हणजे तं. त्यात कि. घातलं की अजून जास्ती तं."
........... मी ते फु. चावणं थांबवलं, आणि मघईगिरी तर त्याहून आधी!
"तरीच मगाचपासून म्हणतोय, काहीतरी वेगळं वाटतंय. जरा, ज~रा गरगरतंय... " पान थुंकत मी म्हटलं...
'अज्ञानात सुख असतं!' ऐकलं होतं. फुलचंद साहेबांमुळे नवंच समजलंय.
आता मी म्हणतो - 'अज्ञानात सुख नव्हे, अज्ञानात तंबाखू!' फिदीफिदी दिवा घ्या
- - - समाप्त - - -
गरगरण्याचं कारण मी लागलीच विषद वगैरे केलं होतं. पण अ-क्सा लोक ऐकून घेण्याच्या पलिकडे गेल्याने मी ते गिळून टाकलं.
कारणः - कधी कधी आपल्या आधी एखाद्याने किवाम वालं पान सांगितलं, आणि पान बनवणार्‍याने हात नीट न स्वच्छ करता आपलं पान बनवलं, तर आपण गरगरू शकतो.
उष्णता: - उन्हाळा उष्ण असतोच. त्याबरोबर कात आणि नकळत खाल्लेला तंबाखूदेखिल..
* इंटरव्युऽ : - बेसावध वाचकांसाठी link ची सोय करणेत येईल.

मंगळवार, १२ एप्रिल, २०११

आजा नच लेऽ नी आजा नच लेऽ!!!


काही काही मित्र कसे बोलावलं की लगेच येतात!
काही काही तर त्यांची मनातच आठवण यायचा अवकाश! कसे काय माहीत, पण लग्गेच येतात.
आपण मग 'आयला! आत्ताच तुझी आठवण काढली होती !"
......... पाऊस लेकाचा अगदी 'ये रे ये रे' म्हटलं तर 'हा आलो!' म्हणत शेवटी न येणारा मित्र.
म्हणजे दिसतंय त्याला की इथे उकाडा वाढलाय. दुपारी बाहेर निघवत नाहीये.
पण पाऊसच तो. तो काही असा स्वस्तात नाही येणार. मजा बघत बसणार!
मधेच मग शनिवारी किंवा रविवारी दुपारी वगैरे फुल्ल माहोऽल बनवणार, 'आता येतो! 'हं' काय रे? '
आपण काय? 'हं!' म्हणत वाट बघत बसतो. तो नेहेमीप्रमाणे आपल्याला टोपी लावून गुल!
दुसर्‍या दिवशी हिरो मग परत आकाश भरून आणतो, पण आता आपण सरावलेलो असतो..
'मला माहितीये रेऽ. लय बघितलाय तुला. जा. 'गरजेल तो... ' बर बाबा! आलास की फोन कर.... '
मधेच मग तो दोनचार 'मिस्ड कॉल' देतो, पण त्या आपण त्या विजांनाही अंडरएस्टिमेट करतो आता. 'अरे हटा सावन की घटा!' म्हणत बाईकवर बाहेर पडतो.
संध्याकाळी ६.३० ची वेळ, नेहेमीपेक्षा जास्ती अंधारून आलेलं. अंधारून म्हणण्यापेक्षा सगळीकडे पिवळसर उजेड. परत एक मिस्ड कॉल! हा मिस्ड कॉल ऐकू येतोच, पण त्याआधी स्क्रीन फ्लॅश होते! मग दोन-एक क्षण तो पिवळसर उजेड अचानक फिका पडतो, आणि वीज कडाडून जाते!
आपण स्तब्ध! 'येतोय वाटतं आता खरंच!'...
'आलास मित्रा??' आपल्या मर्जीचा मालक तू! ये म्हटलं म्हणून येणारेस थोडाच?? आता येतोच आहेस तर ये, पण जऽरा थांब. घरी पोचायला थोडासाच वेळ लागेल. घरी पोचतो. मग बसु, गप्पा मारू! काय??
यातलं काहीही ऐकायच्या फंदात न पडता आपला हात धरून तो आपल्याला बाहेर खेचतो.
आता 'रेनकोट नाही!' हे काय खुद्द पावसाला सांगणार? का मग 'फार भिजलं की सर्दी होते अरे! ' म्हणणार? आणि मग उन्हात मरगळलेलं मन गार करण्याची संधी सोडणार?
आजही हिरो असाच आला खरा, येताना एका मित्राला घेऊन आला. मित्र गायक! पावसाचाच मित्र, तितकाच उत्साही! पाऊस खुशीत गडगडतो आणि लागलीच मित्र 'बाली सागू' गाऊ लागतो, "आजा नच लेऽ,
नी आजा नच ले~!" "चल, सरक पुढं, ट्रिपली जाऊ!" म्हणत पाऊस आपल्याला पटवतो, आणि आपणही एकूणच त्या 'माहोल' मधे 'खो'तो आणि गाडी थोडी जोरात मारु लागतो!
आता पाऊसही खुश, कारण आपणही त्याला भाव दिलाय! आता त्याची पाळी!
लग्गेच थोडा 'मृदगंध!' देतो सँपल म्हणून! पण थोडासाच कारण रस्ता डांबरी आहे.
"पाय्जे तर टाक त्या बाजूनं. गर्दीपण नाई आणि थोडा कच्चा रस्ता पण आहे. चिखलपण नाहीय. घाल-घाल"
आपण थोड्या खडबडीत रस्त्यावरून मृदगंधाचा फील घेत घराच्या दिशेने!
अर्धाच किलोमिटरचा रस्ता, पण लहानपणाची आठवण करून देतो. नॉस्टॅल्जिक बनवुन सोडतो!
आता हे लहानपण म्हणजे काही 'शाळेतलंच!' किंवा 'कॉलेजातलंच!' असं कोणी म्हणावं? आज आपण काल होतो त्यापेक्षा मोठेच नाही का? मग कालचं आठवलं तरी आजच्या तुलनेत 'लहानपणीचंच नाही का?' असो.
त्या अर्धा किलोमिटर कच्च्या रस्त्यावर जाता जाता मग रेनकोट आठवतात डकबॅकचे! पिवळे! घाणेरडे!
पावसात भिजले की पायाला चिकटणारे. आणि शाळेत जागा नाही मिळाली वाळत घालायला तर संध्याकाळी बाहेर काढले तर घाण वास येणारे. स्टाईल तेवढी 'शरलॉक्स होम्स' ची!
मग ते आणलेले जॅकेट पँट! सकाळी पाऊस पड्लेला असल्यानं, घरातून १० ला निघताना जॅकेट-पँट घालूनच निघायचं. आणि हा लेकाचा काही येत नाही. त्यात उकाडा!
आणि मग पोचल्यावर आपण सरे आऽम, सबके साऽमने, सगळ्यांसमोर ती पावसाळी पँट काढायची. घाण!
मग तेही सुटलं.सुटसुटीत जॅकेट आणि त्यावर मॅचिंग कॅप!
कॉलेजही दूरच होतं तसं, पण तिथे जातानाही केवळ जॅकेट! पावसाळी पँट बंद म्हणजे बंदच! साधी पँट ओली झाली तरी तसंच बेंचवर बसायचं, दोनेक तासात कोरडी! मग हेच लॉजिक जॉबच्या वेळी पहिल्या कंपनीत! कंपनीतल्या एसीने घात केला आणि हुडहुडी भरलेली ! सगळं आठवून गेलं एवढ्याश्या अर्धा किमी अंतरात!
"महाराज, गाडी जरा सांभाळून! वाढवतोय थोडी धार! म्हणजे धारा रेऽ! " - पाऊस! वात्रट लेकाचा. डबल मिनिंग!
बरं आहे. म्हणजे मी धार वाढवतो, आणि तुम्ही त्यात भिजा! 
त्यानं म्हटल्याप्रमाणे धारा वाढतात, आपण चिंब!
अजून बरंच अंतर जायचंय म्हंणत 'चहाची टपरी' शोधणारी नजर पाऊस हेरतोच.
"अबे ऐक. आधी घरी पोचूया, मग कर काय ते चहा/कॉफी वगैरे वगैरे."
त्याला "अरे थंडी!" म्हणावं तर "थांब, मजा बघ! चल! " म्हणत पुढे घेऊन जातो.
भिजत जाणार्‍या पोरी दाखवतो. तिथे जवळ पोचताच जलधारा वाढवतो आणि मजा आणतो!
त्यांची त्रेधा बघुन मग आपणही खुश!
'साला हम अकेलेही ऐसे येडे नहीं | बहुत है यूँ, बरसा मे भिगनेवाले!" स्मित
गाडीचा वेग थोडा वाढवून आपणही खुशीत! ऑईल सांडलं नाहीये ना लक्ष ठेवत हळूहळू मार्गक्रमण!
मधेच हात सोडावेसे वाटतात पण फार वेळ नाही, गर्दी आड येते.
'बाली' बरोबर गावंसं वाटतं! गाऊन घ्यायचं मग! हेल्मेट तर आहेच! शिवाय पाऊस आहे, कोणाला ऐकू जाणारे?
थोडं नाचूनही! पिक्चरमधे हिरो लोक नाचतात तितपत! पण माफकच! उरलेलं मनात!
तेवढ्यात बालीचं घर येतं, तर पावसानं पुढच्याला बोलावून ठेवलेलं असतं. त्याला ट्रीपली घेऊन 'तुम से ही' म्हणत पुढे! मग 'इब्न-ए-बतुता', 'जब मिला तु', 'इसी उमर मे!' एकेक मित्र पण ह्याचे!
घर जवळ येत जातं तसं मग थंडी वाढत जाते. हे मानसिक असावं, पण जाणवतं खरं!
मग घरही येतं! आता काहीतरी गरमागरम!
"चल की घरी!" म्हणावं तर हसतो नुसता!
"परत येईन!" म्हणतो.
आता ह्याला आग्रह तरी काय करावा? हात हलवावा तर हा परत धार वाढवून कुरापत काढतो. गडगडाटी हसतो आणि 'चल भेटू परत....' म्हणून निघुन जातो.
पावसाबरोबर कंपनी ते घर गाडीवर -> चेक!
घराजवळ पोचल्यावर वडाप्पाव (२ नग) -> चेक!!
घरी आलं घालून चहा! --> चेक!!!
चहा घेऊन परत गॅलरीत जाऊन पावसाला हात करावासा वाटतो. 'धन्यवाद मित्रा!' म्हणावसं वाटतं.
बाहेर यावे तो लेकाचा परत अंगावर हलकेच जलधारा सोडतो.
मन हसतं! म्हणतं,
"बेटा! चल, नच ले! आज नच लेऽ!
आजा नच लेऽ नी आजा नच लेऽ!!!"