रविवार, १६ मे, २०१०

कारण आता मी मोठी झाले...

मी, आई, आजोबा, बाबा,
डाट्टव, शुती. अऊप दादा. आदिती मावशी, आबा, आजी...
भा काकु. भा काका.
रतनचंद.
पालिशवाला.

मावशीच्या लग्नाला कोणकोण जायचं? प्रश्नाचं हे उत्तर.

-----------------------------------------------

पात्रांची ओळख : -

'मावशी' म्हणजे इथल्या 'मी' च्या आईची बहिण.
'बाबा' म्हणजे माझा(लिहीणार्‍याचा!) मित्र. आणि तिथले आई, आजोबा हे (अर्थातच) 'मी'चे कुटुंबिय.

"डाट्टव" पासुन चालु झालेली रांग हे 'मी' चे सख्खे शेजारी.
"डाट्टव" पासुन थेट नात आजींपर्यंत.
डाट्टव म्हणजे डॉक्टर. त्यांच्या बायकोला 'मी', डायरेक्ट 'शुती' वगैरे म्हणते.
* आणि नंतर बाबाकडुन मारही खाते. मग थोडा वेळ बाबाला 'बाबा, लांब... बाबा लांब...'

भा काका आणि भा काकुही त्याच बिल्डींगमधले.

रतनचंद म्हणजे मागचा महिनाभर "डाट्टव" आणि भा कुटुंबाकडे सुतारकामाचं कंत्राट घेतलेला माणुस.
आणि पालिशवाला म्हणजे पालिशवाला.

आमच्या बिल्डींगमधे सध्या गाजत असलेलं हे पात्र: - 'मी'... वय वर्ष २.

-----------------------------------------------

सकाळी ८ च्या दरम्यान आंघोळ करुन घरातुनच लोकांना हाका मारणं चालु.
कधीही कोणाचंही दार वाजवुन घरात घुसणार.
नुसतं तिखट खायला हवं.
रंगीबेरंगी कपडे घालुन मिरवायला हवं.
सर्वांना एकेरीत हाक.
आजकाल नवीन म्हणजे 'आमच्याकडं'.... 'आमच्याकडं'.... : म्हणजे सगळ्यांनी त्यांच्या घरी येऊन बसायचं...
हीच्या आईनं सगळ्यांना 'चा' करुन द्यायचा...
काही दिवसांपुर्वीपर्यंत 'जिन्यात'... 'जिन्यात'... म्हणजे 'जिन्यात बसायचं..' आणि ही जाणार्‍या येणार्‍या सगळ्यांची हजेरी घेणार...

-----------------------------------------------

हे सगळं मला इथं टोक्यो मधे बसुन समजायचं कारण म्हणजे आज मी घरी फोन केला त्यामुळं.
तेव्हाच नवी प्रगती समजली.. आज घरून आलेलं पार्सल नीट पोचलं आणि खाण्याचे पदार्थ कसे झालेत वगैरे बोलणं झालं. तेव्हा मातोश्रींनी सांगितलं, की पार्सल पोस्टात द्यायला निघालो तेव्हा 'ही मावशी' मागे लागली,
"मी पन...", "मी पन..."
तिला सांगितलं होतं, की "मऊल काकाला खाऊ द्यायला जाऊन येतो....", पण ऐकेना..
मग म्हणे बरोबर पोस्टात आली. तिथे गेल्यावर, आणि परत येईपर्यंत एकदम शांत.
आणि घरी आल्यावर आईला विचारते कशी, "मऊल काका? कुते??"
"मी तिथे आहे समजुन तिथे आली होती" याचं वर्णन करता करता आईची मात्र हहपुवा झाली...

त्याच फोनवर अजुन एक मज्जा!
तिला फोनवर बोल म्हटलं की रोमोट हातात घेउन घरभर फिरत काहीतरी बोलत असते म्हणे....
म्हणुन मग नेमकी तिथेच होती, म्हणुन माझ्याशी बोलायला फोन दिला... प्रॉम्प्टिंग चालुच होतं...

म्हण... "मी आता बाटलीनं दुदु पीत नाई..."
'मी': - बातली.. दुदु.. पीत नाई.
म्हण..."मी मोठी झाले..."
'मी': - मोठी...
म्हण... "आता मी कपातुन दुदु पीते..
'मी':- नाई... दुदु नाई चा!!! आता.. आता मी मोती झाले.. (शेवटचं वाक्य कोणीही प्रॉम्ट केलं नव्हतं... )


-----------------------------------------------


तर सध्या बाई मावशीच्या लग्नाला गेल्या आहेत. तीनचार दिवस झाले असतील. दिवसभर सगळे असतात तेव्हा दंगा करते. पण रात्र झाली की सगळ्यांच्या आठवणी काढत बसते म्हणे... "पायजे... पायजे..."

दोनचार दिवस तेवढीच शांतता.. परत आली की परत चालुच होईल...
"आमच्याकडे.. आमच्याकडे... डाट्टव... शुती... भा काका... भा काकु... "


तसं म्हटलं तर, सगळीच मुलं मोठी होतात... प्रत्येकाचं वागणं कुठे तरी काहीतरी गमतीशीर असतं.... त्यात एवढे काय लिहायचंय??
"माझ्या आजुबाजुचे सगळे माझे... सगळे मला 'पायजेत' वगैरे सारं ऐकलं, "लग्नाला कोणकोण जाणार" मधे 'पालिशावाला'! आला आणि त्यातच मग मउल काका ला पार्सल द्यायला म्हणून पोस्टात जायचं आणि दिसतो का बघायचं वगैरे ऐकलं, प्रत्यक्ष 'नाइ... दुदू नाइ, चाहा' ऐकलं की खरंच कौतुक वाटतं... "


आणि आपण वयानं लय मोठं असल्यासारखं "अशीच अजुन मोठी हो..." वगैरे म्हणावसं वाटतं....

४ टिप्पण्या:

Bhagyashree म्हणाले...

mastch lihila ahe lekh!! lahan mul kharach khup cute astat.

Maithili म्हणाले...

Hehe...Khoop cute...!!! pharach mast zaliye post....!!! :)

ऋयाम म्हणाले...

dhanyawaad bhagyashree ani maithili :)

Maithili म्हणाले...

Majhya blog varachya comment baddal thanks aani mi tuzya comments chi suddha khoop manapasun vaat baghat aste barr ka... :)