बुधवार, ९ डिसेंबर, २००९

द मास्क!

द मास्क!

आज आवर्जून "द मास्क!" ची दाखल घ्यावी लागली...
नाही नाही..
"तो" चित्रपट नव्हे!
"मास्क ऑफ झोरो" पण नव्हे!

हा "मास्क" म्हणजे त्याच त्या "डुककर लोकांपासून चालू झालेल्या 'स्वाईन फ्लू" पासून रक्षण करणारा तो".

"तोहम??"
"कोहम? सोहम! सारखं,
"तोच तो" ला संस्कृत मधे काय म्हणतात हो?? (तदेव??) जाउदे...

तर सध्या थंडी भरपुर पडते आहे...
लोकांना सर्द्या-खोकले चालूच आहेत.

आमचा "ओनो" सान.. रोज ८:५० ला येतो ओफीस ला.
म्हणे..

मला माहीत नाही, कारण मी ९:१० ला जातो.
शक्यतो...

तो दोन दिवस झाले खोकत होता.. कफत होता..

परवाच त्याच्या बायकोचा फोन आला, "धनी.."
"'स्वाईन फ्लू' झाला हो.."
म्हणून तो ५ लाच निघून गेला होता..

त्याच्या लहान मुलाला आधीच झालाच होता...
शाळेत साथच आहे म्हणे..

आज "ओनो"चाही पत्ता नाही म्हटल्यावर लोकांनी ओळखलं...
साहेबांना पण डुककर चावलं....

जेवायला जायच्या १५ एक मिनिटं आधी फोन आला साहेबांचा...
आणि बातमी वार्‍यासारखी पसरली.

पाच मिनिटात एच. आर. च्या "फुकाओ" बाई यांची मेल:-
"३२-१२ प्रभागात एक स्वाईन फ्लू चा रुग्ण आढळला आहे... तरी अगत्य दक्षता घेणेचे करावे.."

बरोबर तीन एक्सेल फाइल्स चिकटवून मेल केली होती.
त्या एक्सेल मधे "अगत्य कसे करावे" याबद्दल यथासंग माहिती होती...

जेवून आलो, तर दारातच आमचा "ची-मु री-दो" (टीम लीड) "तुमिओका"सान वाट पहात होता..
"माफ करा पण हे घ्या. "
आयला... प्रेझेंट देताना कोणी "प्लीज!" म्हणतं का??
म्हणुनच जपानचं आकर्षण वाटतं मला...

छान निळ्या रंगाचा बॉक्स होता तो .. खुशीत बॉक्स उघडला!

"फटा बॉक्स, निकला मास्क!!!"

बाय द वे.. निळ्या रंगाचा अर्थ:- "फक्त पुरुषांसाठी!"
...........स्त्रियांसाठी गुलाबी असतो म्हणे...


"तुम्हाला आजार होऊ नये.. म्हणून आज हा मास्क आम्ही देत आहोत."
"पण.."
तुमिओका म्हणाला, "उद्यापासून सात दिवस, प्रत्येकाने आपला आपला मास्क घेऊन यावे."
"कळावे, ही विनंती..."


बोम्बला...... म्हणजे अजुन सात दिवस कम्पल्सरी "मास्क!"..
"आधी मस्का, मग मास्क..... "


"नाकातून हाना मिझु चा पूर आला तरी बेहत्तर... पण 'मास्क' लावायचा नाही!"
समोरून 'मास्क' लावून जाणार्‍या त्या जपान्यावर हसत, मी 'बाता' बरोबर शपथ घेतली होती..

आता हा 'मास्क' लावल्यावर "मैं बाता को काय मुंह दिखाउंगा???"

कारण "एटिकेट्‌स.. "
"आपली सर्दि इतरांना होऊ नये, यासाठी प्रसार प्रतिबंधक म्हणून जपानी लोक 'मास्क' वापरतात... "

"हे अजिबात करायचं नाही!" ही "भूमिका" होती...


मग काय?
समस्तांनी मास्क लावला.. एकमेकांकडे बघितलं...
उगाचच आजारी वाटतो चायला आपण मास्क लावला की..

मास्क लावला, आणि मला लक्षात आलं...
आता काही खरं नाही...

१. मास्क लावल्यावर फार उकडतं...
२. मास्क लावला असताना शिंक आली की अवघड होतं..
३. मास्क लावला असताना जांभई आली की अवघड होतं..
४. कानावर उगाच काहीतरी अडकलं असल्यमुळे अवघडल्यासारखं वाटतं. कान दुखु लागतो..
५. काम करताना चुइन्ग गम खाण्याची सवय असणार्‍या माणसांना चुइन्ग गम थुंकलं खरं..
पण गेलं कुठं असा प्रश्न एकच सेकंद पण हमखास पडू शकतो.
६. काहीतरी खायचं म्हटलं की "अर्र...."
मास्कचं जरा नंतरच आठवतं..
७. चहा कॉफी पिताना मास्क थोडासा बाजूला करून प्यावी म्हटलं तरी कॉफी सांडू शकते..
... आणि शर्टावर डाग पडु शकतो.
८. सर्वसाधारण मास्क हा फक्त ९७ टक्के वेळाच वायरस पासून बचाव करू शकतो....
.सर्वात स्वस्त मास्क, हा साधारण ५० रुपयांना एक या दराने पडतो.

हे सगळं मला नवीन होतं, पण बाकीच्यांना??

तो "कोबायाशी"सान..
तो आयुष्यभर मास्क लावून फिरत असतो...
सुट्टी मात्र घेत नाही..
"किती काम करशील बाबा?"

सारखा शिंकतो..

"हानामिझु गा तोमारानाकुते सा..."
(नाकातून सारखं पाणी येतय बघा...."
"सा" ला काही अर्थ नाही...
जपानी भाषेत कुठल्याही गोष्टीला शब्द आहेत..
फार गंमत येते शब्दांची मजा समजली की..
हाना :- नाक.
मिझु :- पाणी.
हानामिझु:- सर्दी वगैरे झाली की नाकातून येणारे पाणी!

आणि हे सांगताना कोणालाही कसलीही लाज वाटत नाही.
आपल्या इथे म्हणजे "नाक गळतय..." वरुन आम्ही रुष्याची इतकी चेष्टा करायचो...
)

तर आज मी मास्क लावून त्रस्त झालेलं, कोबायाशीनं बघितलं होतं, हे मी बघितलं होतं..
त्याला मला काही सांगायचं असावं.. सारखा बघत होता..

मला ते गाणं आठवलं....

"काय तुझ्या मनात..
सांग माझ्या कानात?? "
वगैरे..

पण नको! या कोबायाशीला असं काही म्हटलं तर तो म्हणेल..

"काम असे रे फार राहीले...
वेळ असे पण बिल्कुल ना..
मी तर येतोच आहे कामा...
सांग तुही मग येतोस का?



या कोबायाशी टाईपच्या "अतिकाम" करणार्‍या लोकांना बघून मला खरंच वाटतं: -
भारताने एका गोष्टीचं उगाचच क्रेडिट घेतलं आहे...

आपल्या देशात इतके कामचुकार लोक असताना, "काम-सूत्र" भारतात कसं बनू शकेल??
हे मुळचं जपानी असावं...

बर. ते जाऊदे.

मीच त्याला विचारलं, का रे बाबा तुला "जिम कॅरी" इतका का आवडतो????
त्रास होत नाही का "मास्क" चा?

"थंडीत होते सर्दी मजला...
उन्हाळ्यात हा "काफून श्यो-..."
आर्त कहाणी असे आमची..
आज तुम्हासे ऐकवितो..." ... कोबायाशी बोलत होता...


"आयला... हे स्वाईन वरुन "काफून शो" कुठे?? "
माझ्या मनात विचार आला..

पण बिचारा मनापासून सांगत होता... ऐकू म्हटलं..

"तू मार्च मधे होतास ना इथे?? "
"हो.. "
"कसं होतं आठवतय?"
"हो" मी म्हटलं..

"मार्च एप्रिल मधे एकदम छान वातावरण असतं..
फुलं मस्त फुललेली असतात. ".. मी म्हटलं..

"बरोब्बर!" कोबायाशी म्हटला,

"हाच असे तो काळ, गड्या रे....
फुले छान ती फुललेली..
आम्ही असु पण शिंकत खोकत..
मास्क लावुनी रडवेली... "

आयला.... हे काय एकदम??

खरं आहे पण....
ते दोन तीन महिने बरेच लोक मास्क लावून येत होते..

मग मात्र..

"काय असे हे गुपित बाबा
सांग अरे कोबायाशी...
नवी फुले ही जन्मा येती,
त्याची कसली आलर्जी?"

"सायडर!!!"
कोबायाशी उद्गारला, आणि एकदम माझी ट्यूब पेटली!!

एक पुस्तक वाचलं होतं : "डॉग्स अँड डिमन्स ऑफ जपान"
त्यात होतं "सायडर प्लँटेशन" बद्दल......

"सायडर प्लँटेशन बाय द जापनीज गवर्न्मेन्ट गिव्ज बर्थ टू अ न्यू- डिजीज, "काफुनशो-"

इंडस्ट्रीयलायझेशनच्या काळात जपानने जास्तीत जास्त लाकुड देणारी म्हणून ही सायडर ची झाडे लावली...
खूप लाकुड मिळालं..
पण त्या झाडान्पासुन मार्च एप्रिल मधे उडणारे बिजाणु...
त्यांच्यापासून होतो, "काफुनशो.-"
"वीस वर्षांपूर्वी "काफूनशो-" नावाचा शब्दही अस्तित्वात नव्हता.. आणि आज.... "
कोबायाशी डोळे पुसत होता...
का "हानामिझु" काय माहीत?

"आज ही मल्टि मिलियन डॉलर इंडस्ट्री आहे..."

"काय?"
ही नवीच माहिती होती...

"हो. लोकांना याचा इतका त्रास होतो, की ते गोळ्या खातात..
लिक्विड औषधं घेतात, "मास्क" लावतात.
त्यातून गवर्मेन्ट ला टॅक्स पण मिळतो...
मग कशाला त्या झाडान्वर कार्यवाही होते रे?? "...

वाईट वाटलं...

टीम मधल्या एकाला "स्वाईन फ्लु" झाल्यामुळे हा "मास्क" घातला, तेव्हा अचानकच हे "काफुनशो-" पुराण ऐकायला मिळाल...

आज "मास्क" घालून जाण्याचा चौथा दिवस...

कंपनीत पोचलो, तर सगळे हसत बसले होते...
"ओनो बारा झाला म्हणे.. येईल पुढच्या आठवड्यापासून..."
"टॅमी फ्लू" घेतली म्हणे...

आयला.. भारीच की....

पण परत कंपॅरिज़न आलीच..
एक ही गवर्न्मेन्ट.. आणि एक आपली....

स्वाईन-फ्लु म्हणजे काही "असाध्य रोग" असल्याप्रमाणे परिस्थिती झाली आहे..
साधे मास्क पण मिळत नव्हते म्हणे...

आणि आपले लोक पण काय?
ऐन "स्वाईन फ्लु" मधे "गणपती मिरवणुकीत" जायची धडपड...
कसं व्हायचं??

"मास्क कशाला? रुमाल बास आहे."
बरोबर आहे त्यांचं पण...
अचानक 'मास्क' लावा म्हटलं की "हॅट"च म्हणणार..

"मास्क" काही फुकटात नाही येत.
आणि रुमालासारखा "धुवून वापरला" असाही प्रकार नाही..

पण इकडे लोक छान बरे होतायत!
इथल्या गवर्न्मेन्ट ने वेळेत 'टॅमी फ्लू' उपलब्ध केली!
डॉक्टर लोकांनी फटाफट "निदान" केलं...
लोकांनी "काफुनशो-" च्या निमित्ताने सवयच असल्याने मास्क लावले, आणि प्रसार त्यातल्या त्यात रोखला..
मोठ्या प्रमाणावर होऊ शकणार्‍या मृत्यूवर तरी आळा घातला गेला..
खरंच.. "मास्क"नी वाचवलं राव...

असं हवं..
मी हसून "ओनो"च्या रिकाम्या खुर्चीकडे बघितलं...
पुढच्या आठवड्यात येईल परत कामाला...
'मास्क' लावून...

पण मग त्याच्या शेजारीच "कोबायाशी" बसतो..

होता आपल्या जागेवर बसलेला..
'मास्क' लावलेला,
तरीही काम करत असलेला...
मला परत "काफून शो-" आठवला, आणि परत थोडा विचारात पडलोच...